‘युनिक फीचर्स’तर्फे आयोजित चौथ्या मराठी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर भूषविणार आहेत. नाशिक येथील कुसुमाग्रज स्मारक सभागृह येथे २४ मार्च रोजी हे संमेलन होणार आहे.
२४ मार्च रोजी होणाऱ्या उद्घाटन कार्यक्रमानंतर जगभरातील मराठी साहित्य रसिकांसाठी हे संमेलन खुले होणार आहे. मुलाखत, चर्चा, गप्पा, कविसंमेलन, मुक्त कट्टा अशा विविध गोष्टी लिखित मजकुराबरोबरच ऑडिओ-व्हिडिओ स्वरूपात या संमेलनात असणार आहेत. अनेक मान्यवर साहित्यिक या संमेलनात सहभागी होत आहेत. रसिकांना घरबसल्या या संमेलनाचा आस्वाद घेता येणार असून त्यामध्ये सहभागीही होता येणार आहे. जगभरातील मराठी रसिकांसाठी ही मेजवानीच ठरणार आहे. रत्नाकर मतकरी, ग्रेस आणि भालचंद्र नेमाडे यांनी यापूर्वी ई-साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले आहे.
मराठी साहित्यविश्व समृद्ध करणाऱ्या लेखक-कवींचे वेब डॉक्युमेंटेशन हा उपक्रम गेल्या वर्षी सुरू करण्यात आला आहे. त्या अंतर्गत दहा दिवंगत साहित्यिकांचे वेब डॉक्युमेंटेशन यंदाच्या संमेलनातही मराठी आणि इंग्रजी भाषेत उपलब्ध केले जाणार आहे. हा उपक्रम केवळ या संमेलनापुरताच मर्यादित नसून मराठी साहित्य आणि साहित्यिक यांना माहितीच्या या व्यासपीठावर स्थान असावे या उद्देशातून भविष्यातही सुरूच राहणार आहे. www.uniquefeatures.in या संकेतस्थळावर हे संमेलन वाचकांसाठी खुले राहणार असल्याचे युनिक फीचर्सचे संपादक-संचालक सुहास कुलकर्णी आणि व्यवस्थापकीय संचालक आनंद अवधानी यांनी कळविले आहे.