बोधगया बॉम्बस्फोट हा धर्म, संस्कृती आणि परंपरेवर केलेला वार आहे. हे एक प्रकारचे युद्ध असून, त्याविषयी केंद्र सरकार गंभीर नाही, असा आरोप योगगुरू रामदेव बाबा यांनी मंगळवारी केला. तपासी यंत्रणांना आपसामध्ये झुंजविण्याचे काम सुरू असून, या स्फोटांमागे नरेंद्र मोदी असल्याचे कोणाच्या तरी तोंडून वदवून घेण्याचे काम चोखपणे पार पाडले जाईल, असेही ते म्हणाले. मुद्दय़ांच्या आधारे नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला असल्याचेही त्यांनी सांगितले. 
काँग्रेस पक्षाच्या हाती देश सुरक्षित नाही. अर्थव्यवस्था कोलमडली असून, अर्थमंत्री हे तर अनर्थमंत्री ठरले आहेत. रुपयाचे अवमूल्यन झाले असून, आणखी सत्तेवर राहिल्यास काँग्रेस पक्ष देशाला गहाण ठेवेल. एक हजार वर्षांत आक्रमकांना जे जमले नाही, तेवढे काँग्रेसने ६७ वर्षांत देशाला लुटले आहे. काळा पैसा असलेल्या एक हजारहून अधिक लोकांची नावे जर्मनीने केंद्र सरकारकडे दिली आहेत. पण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही काँग्रेसने यापैकी एकाचेही नाव जाहीर केले नाही. याउलट काळा पैसा जमा करणाऱ्या बँकांना संयुक्त पुरोगामी आघाडीने परवाने दिले आहेत, याकडे रामदेव बाबा यांनी लक्ष वेधले.