लोकसभेच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७२ जागांवर आज(दि.२९) मतदान होत आहे. सर्वत्र मतदानाचा उत्साह दिसत असताना पिंपरी-चिंचवडमधून एक कौतुकास्पद वृत्त हाती आलं आहे. येथे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी अमेरिकेची सुनबाई असलेल्या अपर्णा देशमुख यांनी तब्बल २४ तास प्रवास करून पिंपरी-चिंचवड शहरात मतदानाचा हक्क बजवला आहे. त्यांनी पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात असणाऱ्या नूतन महाविद्यालयात येऊन शिरूर मतदार संघासाठी मतदान केले. मतदानाच्या वेळी अनेक तरुण तरुणी या मतदान न करता सुट्टीचा आनंद घेत सहल काढतात त्यामुळे ते मतदानापासून वंचित राहतात, त्यांनी आवर्जून मतदान करावे असं आवाहन अपर्णा यांनी केलं आहे.

अपर्णा देशमुख या मूळच्या पिंपरी-चिंचवडच्या असून त्यांचा विवाह अमेरिकेत (कोलंबस) येथे कार्यकरत असलेल्या धनाजी यांच्याशी मे महिन्यात झाला होता. धनाजी हे कमिन्स नावाच्या कंपनीत उच्च पदावर आहेत. अपर्णा यांचं मतदान हे पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली येथे असून त्या शिरूर मतदार संघात येतात. सातासमुद्रापार २४ तासांचा प्रवास करत अपर्णा रात्री उशिरा पिंपरी-चिंचवड शहरात आल्या. वर्ष भर सुट्ट्या खूप येतात, मात्र मतदानाच्या दिवशी फिरायला न जाता युवा पिढीने मतदान केलं पाहिजे. देशासाठी युवा नेतृत्व महत्वाचं असल्याचं देखील अपर्णा म्हणाल्या. यावेळी त्यांनी बहीण अर्चना बाबर, वडील दिलीप देशमुख, आई सुरेखा देशमुख आणि भाऊ अविनाश बांदल यांच्यासह मतदानाचा हक्क बजवला. 

आज (दि.२९) राजस्थान-उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ०८, महाराष्ट्रातील १७, मध्य प्रदेश-ओडिशातील ०६, बिहारमधील ०५ आणि झारखंडमधील ३ जागांवर मतदान होतं आहे. १२ कोटीहून अधिक मतदार आज मतदानाचा हक्क बजावणार आहे. महाराष्ट्रातील मतदानाचा आज अंतिम टप्पा आहे तर मध्य प्रदेश आणि राजस्थानातील पहिला टप्पा आहे.