ससून सर्वोपचार रुग्णालय आणि बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय येथे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची तब्बल ३८२ पदे रिक्त असून सध्या सेवेत असलेल्या कामगारांवरच कामाचा अतिरिक्त भार पडत आहे. अतिरिक्त काम करायला कर्मचारीच नसल्यामुळे रुग्णालयात स्वच्छता आणि रुग्णसेवांशी संबंधित इतर सेवांवर ताण पडतो आहे.
रुग्णालयात स्वच्छतेचा अभाव जाणवत असून रुग्णांच्या नातेवाइकांनाही अस्वच्छ वातावरणातच बसावे लागत असल्याचे चित्र आहे. रुग्णांनी ओपीडीसाठी रांग लावण्याच्या जागेत, तसेच पॅसेजेस आणि जिन्यांमध्येही अस्वच्छता आहे. गेल्या दहा वर्षांत रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली असून प्रत्येक वॉर्डमध्ये सुमारे ७० ते ८० रुग्ण दाखल असतात. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे या सर्व रुग्णांची कामे एकाच कर्मचाऱ्याला करावी लागत असल्याचे कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी सांगितले. रुग्णांना एका जागेहून दुसरीकडे हलवणे, सफाई करणे, वॉर्डबॉयची इतर कामे करणे ही सर्व कामे एकाच कामगारावर पडत असल्याचे या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.
रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात रिक्त पदांच्या समस्येमुळे अनेक अडचणी येत आहेत. स्वच्छता व इतर सेवांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांवर ताण पडतो आहे. रिक्त पदे भरणे आवश्यक असून त्याबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने सरकारकडे प्रस्ताव पाठवला आहे. पदे भरण्याबाबतची प्रक्रिया सुरू असल्याचे ऐकिवात असले तरी अजून प्रत्यक्ष पदे भरली गेलेली नाहीत.’’
रुग्णालयात सरळ सेवेने भरायची ७३७ पदे मंजूर झाली होती. यांपैकी ४७७ पदे भरली आहेत तर २६० पदे रिक्त आहेत. पदोन्नतीने भरावयाच्या १०१ मंजूर पदांपैकी ८१ पदे भरली आहेत आणि २० पदे रिक्त आहेत. बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची १७१ पदे मंजूर करण्यात आली होती. यांतील १०२ पदे भरली गेली असून ६९ पदे रिक्त आहेत. तर, रुग्णालयाच्या इन्फोसिस विभागात शस्त्रक्रिया गृह सहायक, प्रयोगशाळा परिचर, कक्षसेवक अशा प्रकारच्या कामांसाठी मंजूर झालेल्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या एकूण ३२ पदांपैकी केवळ एकच पद भरले गेले असून ३१ पदे रिक्त आहेत.
बदली कामगारांच्या प्रश्नाचेही भिजत घोंगडे
रुग्णालयात सध्या ७९ बदली कामगार आहेत. पुणे औद्योगिक न्यायालयाने २०१० मध्ये बदली कामगारांना सेवेत कायम करून घेण्याबाबत निर्णय दिला असल्याचे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे शहर कार्यकारिणी सदस्य सुनील आटोळे यांनी सांगितले. ‘रिक्त पदांमुळे बदली कामगारांवर अतिरिक्त ताण पडत असून रजा मंजूर नसल्यामुळे हे कामगार आजारी पडत आहेत. या कामगारांना पेन्शनही मिळत नसल्यामुळे त्यांना नोकरीची सुरक्षितता नाही,’ असे त्यांनी सांगितले. बदली कामगारांच्या प्रश्नावर आठ दिवसांत उत्तर न मिळाल्यास ‘काम बंद’ आंदोलन सुरू करणार असल्याचे पत्र संघटनेतर्फे रुग्णालय व्यवस्थापनाला देण्यात आल्याचे आटोळे म्हणाले.
संग्रहित लेख, दिनांक 4th Sep 2013 रोजी प्रकाशित
ससूनमधील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर
रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजात रिक्त पदांच्या समस्येमुळे अनेक अडचणी येत आहेत. स्वच्छता व इतर सेवांच्या बाबतीत कर्मचाऱ्यांवर ताण पडतो आहे.
First published on: 04-09-2013 at 02:38 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vacancy in fourth grade workers at sassoon