scorecardresearch

शहरात आज ३६६ केंद्रांवर लसीकरण; मुलांसाठी स्वतंत्र १७८ केंद्रे

शहरातील अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या आणि पंधरा ते अठरा वयोगटाच्या शनिवारच्या लसीकरणासाठी महापालिकेने एकूण ३६६ केंद्रे निश्चित केली आहेत.

शहरात आज ३६६ केंद्रांवर लसीकरण; मुलांसाठी स्वतंत्र १७८ केंद्रे

पुणे : शहरातील अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या आणि पंधरा ते अठरा वयोगटाच्या शनिवारच्या लसीकरणासाठी महापालिकेने एकूण ३६६ केंद्रे निश्चित केली आहेत. यातील पंधरा ते अठरा वयोगटासाठी स्वतंत्र १७८ केंद्रे असतील. अठरा वर्षांवरील सर्व नागरिकांच्या लसीकरणासाठी एकूण १८८ केंद्रे असून त्यामधील १७८ केंद्रांवर कोविशिल्ड लशीची मात्रा दिली जाईल. तर दहा केंद्रांवर कोव्हॅक्सिन लशीची मात्रा दिली जाईल.

कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिनच्या १८८ केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, आरोग्य कर्मचारी आणि आघाडीच्या कर्मचाऱ्यांना वर्धक मात्रा देण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. पंधरा ते अठरा वयोगटासाठीच्या प्रत्येक केंद्रांना कोव्हॅक्सिन लशीच्या प्रत्येकी शंभर मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यातील पन्नास टक्के मात्रा ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केल्यानंतर तर उर्वरित पन्नास टक्के मात्रा थेट केंद्रात नावनोंदणी केल्यानंतर दिली जाईल.

अठरा वर्षांवरील नागरिकांच्या लसीकरणासाठी कोविशिल्डची १७८ तर कोव्हॅक्सिनची १० केंद्रे असतील. तेवीस ऑक्टोबरपूर्वी किंवा पहिली मात्रा घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना उपलब्ध लशीपैकी २० टक्के मात्रा देण्यात येईल. ऑनलाइन नोंदणी शनिवारी सकाळी आठ वाजता सुरू होईल. कोव्हॅक्सिनच्या दहा केंद्रांना प्रत्येकी शंभर मात्रा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अठरा डिसेंबरपूर्वी किंवा पहिली मात्रा घेऊन २८ दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना दुसरी मात्रा दिली जाणार आहे.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 15-01-2022 at 01:51 IST

संबंधित बातम्या