बंदिस्त नसलेल्या लोकनाटय़ात हजरजबाबीपणाचे दर्शन घडविणारे निळूभाऊ.. एरवी नम्र असलेले मात्र, रंगमंचावर दरारा असलेले.. सहकारी कलाकारांना सांभाळून घेणारे.. ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधाच्या गाठी शनिवारी उलगडल्या.
राष्ट्र सेवा दलाच्या निळू फुले अकादमीतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी यांच्या हस्ते ज्येष्ठ लोककलावंत वसंत अवसरीकर यांना निळू फुले पुरस्कार प्रदान करण्यात आला. अभिनेते प्रमोद पवार, डॉ. सतीश देसाई, सिंधू काटे, श्रीराम रानडे, सुरेश देशमुख, दीपक रेगे या प्रसंगी उपस्थित होते. उत्तरार्धात अकादमीतील विद्यार्थ्यांनी दोन एकांकिका सादर केल्या.
अवसरीकर म्हणाले, रंगमंचावर काम करून रसिकांना आनंद देऊ शकतो. पण, मला बोलता येत नाही. निळूभाऊंसारखी मंडळी पाठीशी होती म्हणूनच हा वसंत अवसरीकर घडला. ११ वर्षे आम्ही रंगमंचावर एकत्र काम केले. कला ही उपजत असावी लागते असे मला वाटते.
लीला गांधी म्हणाल्या, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाटय़ामध्ये निळूभाऊ यांच्यासमवेत काम करण्याची संधी लाभली. रंगमंचावर त्यांच्यासमोर उभे राहताना घाबरायला होत असे. पण, बरोबरच्या कलाकाराला सांभाळून घेणे ही त्यांची खासियत होती.