लोकमान्य टिळकांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकरांनी कर्वे रस्त्यावर ज्या ठिकाणी विदेशी कपडय़ांची होळी केली होती ते ठिकाण महापालिकेतर्फे स्वातंत्र्यवीरांचे स्मारक म्हणून विकसित करण्यात आले असून या स्मारकाच्या पुढील टप्प्याचे अनेक वर्षे रखडलेले काम आता सुरू झाले आहे. येत्या तीन महिन्यांत दुसरा टप्पा पूर्ण होणार असून त्यानंतर लगेच पुढच्या टप्प्यातील कामेही सुरू केली जाणार आहेत.
विदेशी कपडय़ांच्या होळीचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या या जागेवर महापालिकेने २००५ मध्ये स्मारकाचे काम पूर्ण केले. तत्कालीन नगरसेविका प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या प्रयत्नातून ही योजना साकारली होती. त्यानंतर मात्र स्मारकाच्या विकासासाठी आखलेल्या अनेक योजनांना पुरेसा निधी उपलब्ध झाला नाही आणि निधी उपलब्ध झाला तोही अपुरा होता. त्यामुळे स्मारकाचा पहिला टप्पा मार्गी लागल्यानंतर पुढील कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. गेली काही वर्षे मागणी करूनही महापालिकेच्या अंदाजपत्रकात या स्मारकासाठी पुरेशी तरतूद झाली नव्हती. परिणामी दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू होऊ शकत नव्हती.
अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर आता मात्र स्मारकाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी व अन्य कामांसाठी नव्वद लाखांचा निधी उपलब्ध झाला असून त्यातून आवश्यक कामे सुरू झाली आहेत. दुसऱ्या टप्प्यात स्वा. सावरकर यांच्या जीवनाची ओळख करून देणारी दहा मिनिटांची एक फिल्म या वास्तूमध्ये दाखवण्याची योजना आहे. एका वेळी शंभर ते सव्वाशे प्रेक्षक ही फिल्म पाहू शकतील. त्यासाठी प्रोजेक्टर वगैरे यंत्रणा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच तेथे व्याख्याने व अन्य कार्यक्रम घेणे सोयीचे व्हावे या दृष्टीने उच्च प्रतीची ध्वनियोजना करून घेतली जाणार आहे. सावरकरांच्या जीवनप्रसंगांवरील विविध चित्रेही लावली जाणार असून तिसऱ्या टप्प्यात कायमस्वरूपी वस्तुसंग्रहालय उभारण्याची योजना आहे.
स्वा. सावरकर स्मारकाचे दुसऱ्या टप्प्यातील काम सध्या सुरू झाले असून तीन महिन्यांत हे काम पूर्ण होईल. अन्य कामांबरोबरच सुशोभीकरण व आवश्यक तेथे दुरुस्ती तसेच अन्यही कामे केली जात आहेत. काही आवश्यक सुविधा व्हाव्यात यासाठी देखील पाठपुरावा करावा लागला. मात्र, सर्व मागण्या मान्य झाल्यामुळे स्मारक लवकरच निश्चितच चांगल्या स्वरूपात पाहायला मिळेल.
माधुरी सहस्रबुद्धे
स्थानिक नगरसेविका