अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं योगदान हे मोठं आहे, बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ असल्याचं वक्तव्य अभिनेते शरद पोंक्षे यांनी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात केलं आहे. ते, मी सावरकर वक्तृत्व स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहळ्यात बोलत होते. पोंक्षेंच्या या वक्तव्यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यताही बोलून दाखवली जात आहे.
“अस्पृश्यता निवारणात सावरकरांचं मोठं योगदान आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुलेंपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ आहे. आंबेडकर आणि महात्मा फुले हे त्या त्या जातीत जन्माला आल्याने त्यांना अपमानाचे चटके बसले. त्यामुळे विद्रोह करत प्रवाहाविरोधात लढले. मात्र अपमानाचा कोणताही चटका बसला नसतानाही सावरकर ब्राह्मण विरोधात उभे राहतात. समाजातील जातीच्या भिंती फोडण्यासाठी आयुष्य व्यतीत करतात”, त्यामुळे दोन्ही राष्ट्रपुरुषांपेक्षा सावरकर श्रेष्ठ असल्याचा दावा पोंक्षे यांनी केला.
शरद पोंक्षे म्हणाले की, “हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्रच आहे. आम्हाला हिंदुस्थान हे हिंदू राष्ट्र आहे हे कुणीही सांगण्याची गरज नाही. या हिंदुस्थानने सगळ्यांशी बंधुत्वाचं नातं जोडलं आहे. वीर सावरकरांनी जात कधीच मानली नाही. परिणामी वीर सावरकरांना सनातन हिंदू धर्म मान्य आहे. त्यामुळे आजच्या काळात सावरकरांना समजून घेतलं पाहिजे. मात्र ज्या भूमीत सावरकर जन्माला आले, त्या भूमीतील लोकांना सावरकर आजवर समजलेच नाही” अशीही खंत शरद पोंक्षे यांनी बोलून दाखवली. ज्या वीर सावरकरांनी या देशातील जाती मोडण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले. त्यांना कायम एका चौकटीत अडकवलं गेल्याचेही पोंक्षे यांनी म्हटलं आहे.