पुणे : राज्यात सध्या काही भागांत पावसाळी वातावरण निर्माण झाले असतानाच विदर्भात पुन्हा तापमानवाढीचे संकेत देण्यात आले आहेत. सध्या उत्तर भारतापासून देशाच्या बहुतांश भागांत पावसाळी स्थिती असून, दोन दिवसांनंतर उत्तर भारतातील तापमानात २ ते ३ अंशांनी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
एप्रिल महिन्यात तीन ते चार वेळा उष्णतेच्या लाटा आल्यानंतर मे महिन्याच्या सुरुवातीला विदर्भ आणि मराठवाडय़ातील तापमानात काही प्रमाणात घट झाली आहे. या विभागांसह पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाळी स्थिती तयार झाली आहे. काही भागात पावसाने हजेरी लावली. विदर्भातील अकोला, चंद्रपूर आणि वर्धा या तीन जिल्ह्यांत काही भागांत दोन दिवसांत पुन्हा उष्णतेच्या लाटेचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
तापभान..
राज्यात दोन दिवसांनंतर कमाल तापमानात पुन्हा काही प्रमाणात वाढ होणार आहे. सध्या मध्य महाराष्ट्रात काही भागांत तापमानात वाढ दिसून येत आहे. बुधवारी नगरमध्ये राज्यातील उच्चांकी ४४.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान उष्णतेच्या लाटेच्या स्थितीप्रमाणे होते.

देशात काय?
देशात सध्या बहुतांश भागांत वादळी पावसाची स्थिती आहे. पंजाब, हरियाणा, चंडीगड, दिल्ली आदी भागात गारपिटीचाही अंदाज आहे. राजस्थान, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, ओडिसा, आंध्र प्रदेश, तेलंगणा, केरळ आदी राज्यांत पावसाळी वातावरण आहे. दक्षिणेकडील किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यताही हवामान विभागाने व्यक्त केली आहे