पुणे : जिल्ह्यातील एका नगरपंचायतीतील चार प्रभाग आणि सहा ग्रामपंचायतींतील दहा जागांसाठी मंगळवारी (१८ जानेवारी) मतदान होणार आहे. या दिवशी संबंधित क्षेत्रातील मतदारांना मतदानासाठी राज्य सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. मतमोजणी बुधवारी (१९ जानेवारी) केली जाणार आहे. इतर मागासवर्गाचे (ओबीसी) राजकीय आरक्षण रद्द झाल्यामुळे खुल्या गटासाठी झालेल्या या जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील ९५ नगरपंचायती, दोन जिल्हा परिषद आणि त्याअंतर्गत प्रत्येकी सात पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुका ; तसेच सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेची पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील एक नगरपंचायत आणि दहा  ग्रामपंचायतींचा समावेश असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देहू नगरपंचायतीतील १३ प्रभागांसाठी २१ डिसेंबर २०२१ रोजी मतदान झाले आहे. उर्वरित चार प्रभागांसाठी मंगळवारी मतदान होणार आहे. या प्रभागात १२ उमेदवार उभे असून त्यासाठी ३५७० मतदार मतदान करणार आहेत. निवडणुका होणाऱ्या जिल्ह्यातील दहा ग्रामपंचायतींपेकी पुरंदर तालुक्यातील कोऱ्हेवाडी, पिंपरी, पिंगोरी आणि पांडेश्वर अशा चार, आंबेगाव तालुक्यातील तांबडेमळा आणि गिरवली अशा दोन, शिरुरमधील निरवी, मुळशीमधील भूगाव, जुन्नरमधील आर्वी आणि भोर तालुक्यातील वाघलवाडी अशा एकूण सहा तालुक्यांमधील दहा जागांसाठी मतदान होणार आहे.  या दहा जागांसाठी २३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यासाठी ५८६१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यामध्ये २७४७ महिला मतदार आणि ३११४ पुरुष मतदार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Voting today one six gram panchayats ysh
First published on: 18-01-2022 at 00:47 IST