जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने फॅमिली डॉक्टर्स रस्त्यावर उतरून स्वच्छतेचा जागर करणार आहेत. पुणे डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्टतर्फे रविवारी (६ एप्रिल) ‘वॉकेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात पाच किलोमीटर पायी चालून ‘स्वच्छतेसाठी चाला’ असा संदेश देण्यात येणार आहे.
रविवारी सकाळी साडेसहा वाजता सारसबाग येथे जमून या फेरीला सुरूवात करण्यात येईल. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते फेरीचे उद्घाटन करण्यात येणार आहे. महापौर चंचला कोद्रे या वेळी उपस्थित राहतील. ‘सत्यमेव जयते’ या कार्यक्रमात सहभागी होऊन कचरावेचकांची बाजू मांडणाऱ्या ‘स्वच्छ’ या संस्थेच्या सरूबाई वाघमारे या देखील या फेरीत सहभागी होणार आहेत. पुणेकरांनी अधिकाधिक संख्येने या उपक्रमात सहभागी व्हावे आणि स्वच्छतेचा प्रचार करण्यासाठी चालावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. संताजी कदम यांनी पत्रकार परिषदेत केले. संस्थेचे पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
डॉ. कदम म्हणाले, ‘‘गेल्या वर्षीच्या वॉकेथॉनची संकल्पना ‘चांगल्या आरोग्यासाठी चाला’ अशी होती. या वर्षी आम्ही स्वच्छतेचा मुद्दा उचलून धरणार आहोत. वॉकेथॉननंतरही वर्षभर संस्थेतर्फे शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने आणि आरोग्य शिबिरे आयोजित करून त्याद्वारे स्वच्छतेचा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच झोपडपट्टया व सोसायटय़ांमध्येही स्वच्छतेचे विविध उपक्रम राबवले जातील.’’
वॉकेथॉनला सुरूवात करण्यापूर्वी सारसबाग येथे काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात शंखध्वनी आणि त्याचे आरोग्यसाठी असणारे महत्व, शारीरिक सौष्ठवाची प्रात्यक्षिके, स्केटिंग प्रात्यक्षिके, हास्याचे विविध प्रकार अशा कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात येईल. संस्थेतर्फे राबवलेल्या मोफत औषध योजनेतील औषधे या वेळी जिल्हा आरोग्य प्रमुखांकडे पुढील वितरणासाठी सुपूर्द करण्यात येतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत मतदान करण्याची शपथ घेण्यात येणार आहे.