कसबा पेठेतील शिंपी आळीतील सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीच्या शिंदेवाडय़ाची शंभर फुटांची भिंत शेजारच्या बैठय़ा वाडय़ावर पडून आजी व नातीचा झोपेतच मृत्यू झाला. आवाज आल्यानंतर बाहेर पळाल्यामुळे तिघांचा जीव वाचला. भिंत पडल्याने वाडय़ात अडकलेल्या बारा जणांची अग्निशामक दलाच्या जवानांनी सुटका केली. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास ही घटना घडली.
वैष्णवी अविनाश पतंगे (वय १७) आणि सुधा रमेश पतंगे (वय ७५, रा. शिंदेवाडा, कसबा पेठ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. अग्निशामक दलाकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा पेठेतील शिंपी आळी येथे यशवंत शिंदे यांच्या मालकीचा सत्तर ते ऐंशी वर्षांपूर्वीचा तीन मजली वाडा आहे. या वाडय़ाचे काम लाकडी आहे. त्याच्या शेजारी दोन मजली पाटसकरवाडा असून या ठिकाणी पतंगे कुटुंबीय भाडय़ाने राहतात. बुधवारी पहाटे चारच्या सुमारास शिंदे वाडय़ाची शंभर फुटी भिंत शेजारच्या पाटसकर वाडय़ावर पडली. या वाडय़ात वैष्णवी, तिचे वडील, बहीण, भाऊ आणि आजी हे झोपलेले होते. वैष्णवी आणि तिची आजी हे पाठीमागील बाजूस झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास भिंत पडण्याचा आवाज आल्यानंतर पतंगे कुटुंबातील तिघे जण बाहेर पळाले. मात्र, झोपेत असलेली वैष्णवी आणि तिची आजी यांच्या अंगावर भिंत पडली. नागरिकांनी कळवताच अग्निशामक दलाची एक गाडी, रेस्कू व्हॅन आणि रुग्णवाहिका दाखल झाली. जवानांनी भिंतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोघींना बाहेर काढले. त्यांना तत्काळ ससून रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. भिंत पडल्यामुळे या वाडय़ात अडकलेल्या पाठीमागील बाजूने शिडी लावून बाहेर काढण्यात आले. या कारवाईमध्ये केंद्रप्रमुख शिरीष गिलबिले, मुबारक शेख, मेहबूब शेख, छगन मोरे, ढमाले, राहुल माने, संदीप घडसी, मोहिते, आवळे, दत्ता गायकवाड यांनी भाग घेतला. दीड तास चाललेल्या कारवाईत बारा जणांची सुटका करण्यात आली. अविनाश पतंगे यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. वैष्णवी ही बारावीचे शिक्षण घेत होती. तर तिची मोठी बहीण ही नोकरी करते.
पुण्यात वाडा व भिंती पडून सहा बळी
गेल्या आठ दिवसांत शहरात विविध ठिकाणी वाडय़ाची व इतर ठिकाणची भिंत पडून सहा बळी गेले आहेत. गेल्या गुरुवारी कसबा पेठेतील डेरे वाडय़ाची बांधकाम पाडत असताना एका कामगाराचा मृत्यू झाला होता. तर रविवारी रात्री दांडेकर पुलाजवळ सुवर्णनंदा सोसायटीची संरक्षक भिंत पडून तीन महिलांचा मृत्यू झाला होता. शिंदेवाडय़ांची भिंत पडून बुधवारी पहाटे दोन महिलांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून संततधार पावसामुळे शहरातील मध्यवस्तीच्या जुन्या वाडय़ाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.