पुणे : करोनाच्या संसर्गात अर्थचक्राला खिळ बसली होती. टाळेबंदीत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले. मात्र, राज्य वखार महामंडळाने टाळेबंदीत मोठ्या प्रमाणावर गोदामे भाडेतत्त्वावर घेतल्याने साठवणूक क्षमतेत वाढ झाली आणि त्यामुळे वखार महामंडळाला २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात ११० कोटी ७३ लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला.

वखार महामंडळास २०२० ते २०२१ या आर्थिक वर्षात ४२२ कोटी ४८ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. गेल्या आर्थिक वर्षात (२०१९ ते २०२०) ३४० कोटी ६२ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. त्या वेळी महामंडळास ६६ कोटी ३६ लाख रुपये नफा मिळाला होता. टाळेबंदीत सरकारकडून तूर, कापूस, हरभरा, उडीद डाळींची मोठ्या प्रमाणावर खरेदी करण्यात आली. वखार महामंडळाच्या गोदामांची साठवणूक क्षमता १८ लाख टन एवढी आहे. गोदामांमधील साठवणूक क्षमता कमी पडत असल्याने अन्य ३७० गोदामे भाडेतत्त्वावर घेऊन साठवणुकीची क्षमता २३ लाख टनांपर्यंत वाढविण्यात आली, अशी माहिती महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे यांनी दिली.

राज्यात वखार महामंडळाची नऊ विभागीय केंद्रे आहेत. त्यात १२५० गोदामे आहेत. २०२० ते २१ या आर्थिक वर्षात वखार  महामंडळाने १२ नवीन गोदामे बांधली आहेत. त्यामुळे साठवणूक क्षमतेत वाढ झाली  आहे.