पर्यावरण रक्षणाच्या उद्देशातून राबविण्यात येत असलेल्या ‘रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्य़ा घ्या’ या अभिनव योजनेला पुणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. ही योजना सुरू झाल्यापासून २५ दिवसांत ४५ टन रद्दी जमा झाली असून या रद्दीच्या मोबदल्यात उत्कृष्ट प्रतीच्या २० हजार वह्य़ांचे वाटप करण्यात आले आहे. पुणेकरांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे ही योजना सुरूच ठेवण्यात येणार आहे.
महाराष्ट्र सहकारी मुद्रणालय आणि आनंद पब्लिकेशन्स यांच्यातर्फे २० एप्रिलपासून या योजनेला प्रारंभ झाला. या योजनेत सहभागी होताना किमान १५ किलो रद्दी आणि त्यानंतर ५ किलोच्या पटीमध्ये रद्दी आणण्याचे आवाहन करण्यात आले होते. १५ किलो रद्दी देणाऱ्यास १०८ पानांच्या १० वह्य़ा किंवा १८८ पानांच्या ७ वह्य़ा किंवा १०८ पानांच्या ७ मोठय़ा आकाराच्या वह्य़ा किंवा १५६ पानांच्या ४ मोठय़ा आकारातील वह्य़ा देण्यात आल्या. या योजनेमध्ये कोणताही आर्थिक व्यवहार नाही. केवळ रद्दीच्या मोबदल्यात वह्य़ा हीच देवाण-घेवाण असल्यामुळे नागरिकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला. या योजनेमध्ये महापालिका शिक्षण मंडळाच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आले होते. यामध्ये १५ शाळांनी सहभाग घेतला असून साडेसात टन रद्दी शाळांमधून संकलित झाली आहे. मात्र, शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ही योजना कार्यान्वित झाल्यामुळे त्याला शाळांकडून पुरेसा प्रतिसाद मिळू शकला नाही, अशी माहिती महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाचे अंकुश काकडे आणि आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.
महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाबरोबरच सिंहगड रस्ता, शिवाजीनगर, बोपाडी, कोथरूड आणि नारायण पेठ अशा ठिकाणी रद्दी संकलन केंद्र सुरू करण्यात आली होती. त्यामुळे नागरिकांची सोय झाली. कोणत्याही नागरिकाने रद्दी आणल्यानंतर त्याचे वजन केले जाते. वह्य़ा, पुस्तके, मासिके आणि वर्तमानपत्र असे वर्गीकरण करण्यासाठी चार जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. एका पेपर मिलबरोबर सामंजस्य करार करण्यात आला असून ही रद्दी दुसऱ्या दिवशी रवाना केली जाते. तेथे उत्तम प्रकारच्या वह्य़ांची निर्मिती करण्यासाठीचा कागद तयार केला जातो. कोणत्याही नागरिकाने ९५९५५८५१४६ या मोबाईल क्रमांकावर दूरध्वनी केल्यास त्याला व्हाईस कॉलच्या माध्यमातून या योजनेची माहिती दिली जाते. ती व्यक्ती त्यानंतर आपला अभिप्रायही नोंदवू शकते, असे जितेंद्र कोठारी यांनी सांगितले.
 ‘रद्दी द्या, वह्य़ा घ्या’ योजनेचा राज्यव्यापी विस्तार होणार
‘रद्दी द्या, नव्या कोऱ्या वह्य़ा घ्या’ या योजनेला पुण्यामध्ये मिळालेल्या यशाच्या पाश्र्वभूमीवर या योजनेचा राज्यभर विस्तार करण्यात येणार आहे. राज्यभरातील विविध ठिकाणांहून दूरध्वनी येत असून आमच्याकडेही ही योजना सुरू करावी, अशी मागणी सातत्याने होत आहे. लोकांची गरज ध्यानात घेऊन पुढील आठवडय़ात जळगाव येथे ही योजना सुरू करण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने राज्यभर राबविण्याचा मानस असल्याचे जितेंद्र कोठारी यांनी सांगितले.