राखी चव्हाण
वन्यप्राण्यांच्या गणनेसाठी वापरण्यात येणारी मचाण पद्धत बंद झाल्यानंतर जनजागृतीच्या उद्देशाने वनखात्याने सुरू ठेवलेला मचाण उपक्रम वादाला निमंत्रण देतो आहे..
पारंपरिक प्राणी-गणना कशी होती?
जंगलातील प्राण्यांची आकडेवारी मिळवण्यासाठी पाणवठ्याजवळ उंच जागी/ झाडांवर मचाण उभारून त्यावर बसणे आणि येणाऱ्या वन्यप्राण्यांची नोंद तसेच पाऊलखुणांवरून प्राण्यांची ओळख अशी पद्धत दशकभरापूर्वीपर्यंत वापरण्यात येत होती. सात दिवसांच्या या गणनेत वनकर्मचारी दररोज सकाळी व सायंकाळी जंगलाच्या विविध क्षेत्रात फिरून, प्लास्टर ऑफ पॅरिसच्या द्रावणातून प्राण्यांच्या पाऊलखुणांचे ‘प्लास्टरकास्ट’ काढत. बोटांतील अंतर, पंजाची गादी, बोटाचा आकार, गादीचा आकार, संपूर्ण पंजाचा आकार याचा विचार करून निष्कर्ष निघत, मात्र यानंतरही त्रुटी राहात आणि गणना नेमकी होत नसे.
गणनेसाठी मचाण कशाला?
पाणवठ्य़ावरील गणना हा पारंपरिक व्याघ्रगणनेचाच एक प्रकार. वर्षातून एकदा बुद्धपौर्णिमेला हा उपक्रम राबवला जात होता. या प्रगणनेत जंगलातील पाणवठ्यांजवळ मचाण उभारून चंद्रप्रकाशात प्राणी न्याहाळून त्यांची नोंद होई. त्यामुळे पाणवठ्यावर रात्रीच येणाऱ्या या वन्यप्राण्यांना हेरून दिलेल्या नमुन्यात टिपणे करावी लागत. पाणवठ्यावर कोणता प्राणी किती वाजता आला, कोणत्या दिशेने आला, पाणी प्यायल्यानंतर तो कोणत्या दिशेने गेला याची इत्थंभूत माहिती त्या नमुन्यात सुरुवातीला गांभीर्याने नोंदवली जात होती.
हेही वाचा >>> ‘हेपिटायटिस ए’ रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ, १२ जणांच्या मृत्यूनंतर केरळमध्ये अलर्ट; हा संसर्गजन्य आजार किती घातक?
ती पद्धत बंद का झाली?
स्वयंसेवींच्या साहाय्याने होणाऱ्या या प्रगणनेत मचाणावर बसण्यासाठी चढाओढ करणाऱ्या हौशे-नवशे-गवशे यांनी घातलेल्या गोंधळामुळे त्यातले गांभीर्य हरवले. या प्रगणनेतून मिळणाऱ्या आकडेवारीत नेमकेपणा नसे. बुद्धपौर्णिमेला होणारी पाणवठ्यावरील प्रगणना (मचाण-गणना) आणि पाऊलखुणांच्या साहाय्याने होणारी प्रगणना यांत अचूक आकडेवारी मिळत नसे. याचे उत्तम उदाहरण म्हणजे, सारिस्कासारख्या अभयारण्यात वाघ जवळजवळ पूर्णपणे नाहीसे झालेले असतानादेखील त्या ठिकाणी २०-२५ वाघ असल्याची नोंद झाली! तपासाअंती हा प्रगणनेतील दोष असल्याचे सरकारच्या लक्षात आले आणि मग ही पद्धतच देशभरात बंद करण्यात आली.
मग नवी पद्धत काय?
भारतीय वन्यजीव संस्था आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण या दोन्ही संस्थांनी प्राणीगणनेसाठी ‘ट्रान्झिट लाइन मेथड’ ही वैज्ञानिक पद्धत तयार केली. २०१० मध्ये पहिल्यांदा या पद्धतीचा वापर करून देशभरात एकाच वेळी प्राणीगणना करण्यात आली. ही गणना चार टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष जंगलात जाऊन हरित आच्छादन व मानवी हस्तक्षेप तसेच वन्यप्राण्यांचे दर्शन, त्यांची विष्ठा, झाडावर चढताना प्राण्यांच्या नखाद्वारे होणारे ओरखडे, ठसे अशा अप्रत्यक्ष नोंदी घेतल्या जातात. त्यानंतर जीपीएस रीडिंग घेऊन मग ही माहिती एकत्र करून त्याचे विश्लेषण केले जाते. मग दर १०० चौरस किलोमीटर क्षेत्रामागे दोन्ही बाजूने कॅमेरे लावले जातात. प्राण्यांच्या छायाचित्रांचे विश्लेषण ‘एमस्ट्रीप’ या सॉफ्टवेअरद्वारे करून निष्कर्ष काढले जातात.
हेही वाचा >>> कोव्हिशिल्डनंतर आता कोवॅक्सिनचे दुष्परिणामही समोर आल्याने चिंता वाढली आहे का?
या उपक्रमाचे व्यावसायिकीकरण कसे?
मचाण गणना बंद झाली असली तरीही ‘जंगल आणि वन्यप्राण्यांबाबत लोकांना शिक्षित करण्याच्या उद्देशाने’ बुद्धपौर्णिमेच्या रात्री ‘निसर्गानुभव’ याच नावाने मचाण उपक्रम सुरू ठेवण्यात आला. मात्र, वनखात्याने या उपक्रमासाठी थेट पाच हजार रुपयापर्यंतची आकारणी सुरू केली. वनखाते एवढ्यावरच थांबले नाही तर खात्याची पुस्तके, टी शर्ट अशा वस्तू उपक्रमात सहभागी होणाऱ्याच्या हातात सोपवल्या जातात. बरेचदा या वस्तू त्यांना नको असतात. इतर व्याघ्रप्रकल्पांत खाण्याची सुविधा प्रशासन करते, पण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर असणारा ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प तेदेखील करत नाही.
‘निसर्गानुभव’ नावाला आक्षेप का?
मचाण उपक्रमालाच आता वनखात्याने ‘निसर्गानुभव’ असे नाव दिले असले तरी, प्रत्यक्षात ‘निसर्गानुभव’ हा उपक्रम काही वर्षांपूर्वी ‘निसर्ग पर्यटन मंडळा’ने (इको टूरिझम बोर्ड) प्रायोगिक तत्त्वावर राबवला होता. यात जंगलालगतच्या गावांतील आश्रमशाळा तसेच जिल्हा परिषदेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांकडून कोणतेही पैसे न आकारता त्यांना जंगल आणि वन्यप्राण्यांची ओळख करून दिली जात होती. जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी ही पिढी तयार व्हावी हा उद्देश त्यामागे होता. जंगलालगतचे गावकरी आणि वनखाते यांच्यातील दुरावा कमी व्हावा. मानव-वन्यजीव संघर्ष कमी व्हावा, जंगल आणि वन्यप्राण्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी त्यांनी वनखात्यासोबत यावे, या उद्देशांनी सुरू झालेला तो उपक्रम बंद पाडून आता तेच नाव महागड्या पर्यटनासाठी वापरले जाते आहे.
rakhi.chavhan@expressindia.com