scorecardresearch

जलमापकांमुळे पाणी कमी दाबाने; महापालिकेकडे नागरिकांच्या तक्रारी; मूळ उद्देशालाच हरताळ फासल्याचे स्पष्ट

शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बहुतांश ठिकाणी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे.

पुणे : समन्यायी पद्धतीने आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत बसविण्यात येत असलेल्या जलमापकांमुळे शहरातील बहुतांश ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. तशा शेकडो तक्रारी पाणीपुरवठा विभागाकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे यासंदर्भात महापालिकेच्या स्तरावर बैठक आयोजित करण्यात येणार आहे. जलमापकांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा होत असेल, तर समान पाणीपुरवठा योजनेच्या मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार असल्याचेही स्पष्ट होत आहे.

शहरात गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून बहुतांश ठिकाणी कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा होत आहे. कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. काही भागात सोसायटय़ांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. याबाबत अनेक माजी नगरसेवकांबरोबरच नागरिकांनीही महापालिकेकडे तक्रारी केल्या आहेत.

समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत निवासी आणि व्यावसायिक मिळकतींना जलमापके बसविण्याची प्रक्रिया महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. पाण्याचा वापर किती झाला, हे कळण्यासाठी जलमापके बसविण्यात येत आहेत. मात्र या जलमापकांमुळेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याचा ठपका नागरिक आणि नगरसेवकांनी ठेवला आहे. जलमापकांमुळे पाणी कमी दाबाने येत आहे, अशा तक्रारी आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत त्याबाबत महापालिकेच्या स्तरावर बैठक घेतली जाईल आणि त्यातून मार्ग काढला जाईल, असे महापालिका आयुक्त आणि प्रशासक विक्रम कुमार यांनी सांगितले.

शहराला समन्यायी आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने तब्बल अडीच हजार कोटी रुपये खर्च करून ही योजना हाती घेतली आहे. योजनेअंतर्गत जुन्या जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलण्याबरोबरच १ हजार ६०० किलोमीटर लांबीच्या जलवाहिन्या नव्याने टाकण्यात येणार आहेत. तसेच पाण्याचा वापर किती झाला, हे कळण्यासाठी जलमापके बसविण्यात येणार आहेत. पहिल्या टप्प्यात निवासी आणि व्यावसायिक मिळकतींमध्ये किमान तीन लाख जलमापके बसविण्याचे नियोजित आहे. तसेच शहराच्या विविध भागात ८७ ठिकाणी पाण्याच्या साठवणूक टाक्यांची उभारणी करण्यात येणार आहे.

राजकीय वरदहस्ताने देण्यात आलेले अनधिकृत नळजोड जलमापके बसविताना उघडकीस येतील या भीतीपोटी योजनेअंतर्गत जलमापके बसविण्यास सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी आणि सर्वपक्षीय नगरसेवकांनी त्याला कडाडून विरोध दर्शविला होता. काही ठिकाणी तर नागरिकांनी बसविलेली जलमापके तोडून टाकण्याचे प्रकारही घडले होते. आताही जलमापकांमुळेच पाणी कमी दाबाने येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे पाणीपुरवठा विभागाकडूनही या तक्रारींची दखल घेण्यात आली आहे. त्यासाठी बैठक आयोजित करून आढावा घेण्यात येणार आहे.

कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. मात्र जलमापकांबाबतच्या तक्रारी फारशा नाहीत. जर्मन कंपनीकडून जलमापके घेण्यात आली असून त्याची तपासणी करण्यात आली आहे. वितरण व्यवस्थेतील तांत्रिक दोषांमुळेही कमी दाबाने पाणीपुरवठा होत असण्याची शक्यता आहे. मात्र तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जलमापके बसवितानाच मिळकतधारकासमोर पाण्याचा दाब मोजता येईल, अशी यंत्रणा पुढील महिनाभरात कार्यान्वित करण्यात येईल.

– नंदकुमार जगताप, प्रमुख, समान पाणीपुरवठा योजना

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Water problem municipality citizens argument water supply project ysh

ताज्या बातम्या