वैद्यकीय उपचार घेताना रुग्णांना आणि ते देताना डॉक्टरांना खटकलेल्या गोष्टी जगासमोर आणण्यासाठी आता एक हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. रुग्णालयांमधील गैरसोई, उपचार देताना डॉक्टरांकडून झालेली दिरंगाई, कट प्रॅक्टिस अशा गोष्टींबाबतच्या तक्रारी आपली ओळख जाहीर न करता मांडण्यासाठी एक संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर काही डॉक्टरांनी अधिक चांगल्या वैद्यकीय परिणामांसाठी आपल्या अनुभवांमधून शोधून काढलेले उपायही या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याची संधी त्यांना मिळणार आहे.
रुग्ण, डॉक्टर आणि रुग्णालये अशा तिघांनाही आपल्या बाजू मांडण्यासाठी जागा देणारे http://www.patienteverywhere.com/ हे संकेतस्थळ ‘मेडिमेज सिस्टिम्स’ या कंपनीने बनवले असून ते विनाशुल्क वापरता येणार आहे. ‘युनिव्हर्सल हेल्थ कव्हरेज’ दिवसाच्या निमित्ताने शुक्रवारी या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. ‘वैद्यकीय क्षेत्राविषयी या संकेतस्थळावर लिहिता येणार असले, तरी रुग्ण आणि डॉक्टर यांच्यात भांडणे लावण्यासाठी किंवा त्यांचे वैयक्तिक तंटे सोडवण्यासाठी ते नाही. वैद्यकीय क्षेत्रातील ठळक समस्या समोर याव्यात आणि त्यावर उत्तरे शोधण्याचा प्रयत्न सुरू व्हावा, असा या संकेतस्थळाचा उद्देश आहे. मते व्यक्त करणाऱ्या रुग्ण आणि डॉक्टरांची नावेही जाहीर केली जाणार नाहीत,’ अशी माहिती संकेतस्थळाचे निर्माते डॉ. राजीव जोशी यांनी दिली.
वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या आरोग्यविषयक बातम्या, लेख यांच्या तसेच वैद्यकीय ब्लॉग्जच्या ‘लिंक’ देखील या संकेतस्थळावर वाचण्यासाठी उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे डॉ. जोशी यांनी सांगितले.

विविध रुग्णालयांतील उपचारांचे दर समजणार
खासगी रुग्णालये कोणत्या सेवेसाठी किती दर घेतात हे रुग्णांना या संकेतस्थळावर कळू शकणार आहे. डॉ. राजीव जोशी म्हणाले, ‘‘कोथरूड, बिबवेवाडी, डेक्कन, औंध अशा विविध भागात वैद्यकीय उपचार वेगवेगळ्या दरात मिळतात. रुग्णांना सर्व रुग्णालयांचे दर एकत्र पाहायला मिळाल्यास कुठे उपचार घ्यावेत हे ठरवणे त्यांना सोपे जाईल. रुग्णालयांनी पुढाकार घेऊन दर जाहीर करणे अपेक्षित आहे. पण तसे न झाल्यास ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’सारख्या संस्थांच्या माध्यमातून त्यांना तसे आवाहन करता येईल.’’