वॉट्स अॅपचा पोलिसांना देखील कामाच्या दृष्टीने किती फायदा होऊ शकतो याचा अनुभव शनिवारी पुणे पोलिसांना आला. दागिने पॉलिश करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणारी टोळी वारजे माळवाडी परिसरात सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर या टोळीबाबतची माहिती वॉट्स अॅपवरून नागरिकांना देण्यात आली. त्यामुळे दिवसभरात एकही दागिने पॉलिसच्या बहाण्याने फसवणुकीचा प्रकार घडला नाही. ही माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. शहाजी सोळुंके यांनी सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहून गस्त वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या.
शहरात सोनसाखळी चोरी आणि दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने फसवणुकीच्या घटना या पोलिसांची डोकेदुखी ठरल्या आहेत. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांकडून सतत प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांच्या या प्रयत्नाला शनिवारी वॉट्स अॅपमुळे चांगली मदत झाली. शहरात दागिने पॉलिश करून फसवणूक करणारी उत्तर प्रदेशातील एक टोळी सक्रिय झाल्याची माहिती शुक्रवारी पोलिसांना मिळाली. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी सर्व पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. पुण्यातील माळवाडी परिसरात ही टोळी असल्याची माहिती समजल्यानंतर या भागातील गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्या बरोबर अशी टोळी सक्रिय असल्याची माहिती वॉट्स अॅप ग्रुपच्या माध्यमातून नागरिकांना दिली. हा संदेश विविध वॉट्स अॅपच्या विविध ग्रुपवर टाकण्याच्या सूचना देखील पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. त्याबरोबरच दागिन्यांना पॉलिश करून घेताना नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले. पोलिसांनी हा संदेश वॉट्स अॅपवर टाकल्यानंतर तो काही वेळातच अनेक ग्रुपवर पोहोचला याची माहिती अनेकांना झाली. याबाबत डॉ. सोळुंके यांनी शहरात शनिवारी दिवसभरात एकही दागिने पॉलिश करून फसवणूक केल्याचा प्रकार घडला नसल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Feb 2015 रोजी प्रकाशित
वॉट्स अॅपवरून चोरटय़ांची माहिती नागरिकांपर्यंत!
वॉट्स अॅपचा पोलिसांना देखील कामाच्या दृष्टीने किती फायदा होऊ शकतो याचा अनुभव शनिवारी पुणे पोलिसांना आला.

First published on: 15-02-2015 at 03:10 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whats app crime police gang