पुण्याच्या मावळ मधील भाजपाचा बालेकिल्ला उध्वस्त करत, ५७ पैकी ४५ ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवल्याचा दावा राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. तर, ५७ ग्रामपंचायती पैकी ३५ जागा जिंकून मावळ मधील भाजपाचा बालेकिल्ला राखला असल्याचं भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे यांनी म्हटलं आहे. यामुळे आता मावळमध्ये नेमकं वर्चस्व कोणाचं असणार? असा प्रश्न सामान्यांना पडला आहे.

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ५७ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक पार पडली आहे. यापैकी आठ ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित ४९ ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. त्याचा निकाल आज लागला असून महाविकास आघाडीला यश मिळालं असल्याचं स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी म्हटलं आहे. शिवाय, भाजपाचा बालेकिल्ला उध्वस्त केला असल्याचं सांगत ५७ पैकी ४५ ग्रामपंचायतीत महाविकास आघाडी विजयी झाली असल्याचा दावा देखील त्यांनी केला आहे.

५७ पैकी ४५ ग्रामपंचायतींवर विजयी मिळत महाविकास आघाडीने मावळमधील भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला उध्वस्त केला आहे. ८० टक्के ग्रामपंचायती महाविकास आघाडीच्या ताब्यात आल्या आहेत. कामशेत, उर्से, शिवन, गहुंजे या गेल्या काही वर्षांपासून भाजपाच्या ताब्यात होत्या. त्या महाविकास आघाडीने जिंकल्या आहेत. असं आमदार शेळके यांनी म्हटलं आहे.

तर, आमदार शेळके यांना प्रत्युत्तर देत भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे म्हणाले की, ५७ ग्रामपंचायती पैकी ४५ जागा महाविकास आघाडीने जिंकल्याचा दावा आमदार शेळके यांनी केला आहे. आम्ही सविस्तर माहिती घेतली, तर असं लक्षात आलं की, ५७ पैकी ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. राहिलेल्या ४९ ग्रामपंचायती पैकी ३५ ग्रामपंचायती भाजपाने जिंकलेल्या आहेत. त्यांची यादी देखील माझ्याकडे आहे. मावळ हा अद्यापही भाजपाचा बालेकिल्ला आहे. हे या निवडणुकीने सिद्ध केले आहे. तर बिनविरोध झालेल्या ८ पैकी ४ ग्रामपंचायतीत भाजपाचे वर्चस्व आहे. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिवाय, भाजपाने आपला बालेकिल्ला राखल्याचा प्रतिदावा देखील त्यांनी केला आहे.