दक्षिण आशियाई देशांच्या हवामानतज्ज्ञांच्या परिषदेतील अंदाज
राज्यातील भीषण दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर आगामी मान्सूनच्या पावसाबाबत दिलासादायक बातमी आहे. दक्षिण आशियाई देशांच्या हवामानतज्ज्ञांच्या काठमांडू (नेपाळ) येथील परिषदेत शुक्रवारी रात्री आगामी मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला, त्यानुसार महाराष्ट्रासह देशाच्या बहुतांश भागात सरासरीइतक्या पावसाची शक्यता आहे. पश्चिम राजस्थान, कच्छ व दक्षिण भारताचा काही भाग वगळता इतरांसाठी सरासरी पावसाचीच शक्यता आहे.
राज्यात आगामी पावसाळा कसा असेल याबाबत सर्वानाच उत्सुकता आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस भारतीय हवामान विभागाचा अधिकृत अंदाज जाहीर होईल. भारतातील पावसाचा अंदाज वर्तवणारे हवामानतज्ज्ञ त्याआधी दक्षिण आशियाई देशांतील तज्ज्ञांसोबत संपूर्ण दक्षिण आशियातील पावसाचा (जून ते सप्टेंबर या काळासाठी) अंदाज जाहीर करतात. त्याबाबत नेपाळची राजधानी काठमांडू येथे गुरुवार व शुक्रवारी परिषद (सॅसकॉफ) झाली. त्यात शुक्रवारी रात्री उशिरा आगामी पावसाचा अंदाज जाहीर करण्यात आला. त्यात सहभागी झालेले नॅशनल क्लायमेट सेंटरचे प्रमुख डॉ. ए. के. श्रीवास्तव यांनी सांगितले की, महाराष्ट्राच्या सर्वच भागात सरासरीइतका पाऊस पडण्याची सर्वाधिक शक्यता आहे. हीच बाब भारतातील बहुतांश भागांना लागू पडते. त्याला अपवाद आहे तो केवळ केरळ, तामिळनाडू, अंदमान-निकोबार बेटे तसेच काश्मीर, दक्षिण राजस्थान व कच्छच्या काही प्रदेशाचा. याशिवाय संपूर्ण पाकिस्तान व श्रीलंकेत सरीसरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.
हा अंदाज खरा ठरला तर दुष्काळी महाराष्ट्राला दिलासा मिळेल. या अंदाजाचे अधिक तपशील येत्या एक-दोन दिवसांत हाती येतील. हा अंदाज आणि भारताच्या मान्सूनसाठी जाहीर केला जाणारा अंदाज यात जास्तीत जास्त साम्य असते. त्यामुळे आपल्या मान्सूनचा अंदाजही या वेळी सरासरीइतकाच असण्याची शक्यता आहे.