कडक थंडीचा त्रास मोठय़ा माणसांप्रमाणे चिमुकल्यांनाही होत आहे. मोठय़ांमध्ये सर्दी-खोकला आणि घशाचा संसर्ग हे प्रमुख आजार दिसत असून लहानग्यांमध्ये मात्र ‘विंटर डायरिया’ म्हणजे विषाणूजन्य हगवणीच्या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या २ ते ३ आठवडय़ांपासून रोज बाह्य़रुग्ण विभागात सुमारे २० टक्के रुग्ण विंटर डायरियाचे बघायला मिळत आहेत, असे निरीक्षण काही बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले.
सहा महिने ते दीड वर्षे या वयोगटात विंटर डायरिया दिसत आहे. रोज बाह्य़रुग्ण विभागात येणारे २० टक्के बालरुग्ण डायरियाने त्रस्त आहेत असे भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. एस. के. ललवाणी म्हणाले, ‘‘‘रोटाव्हायरस’ हा विषाणू ‘विंटर डायरिया’साठी प्रामुख्याने कारणीभूत ठरतो. या डायरियामध्ये सुरुवातीचे १-२ दिवस उलटय़ांचा त्रास होतो. त्यानंतर उलटय़ा होणे थांबून शौचाला पातळ होऊ लागते. हगवणीचा हा त्रास आठवडाभर राहू शकतो. शहरी भागात बरेचसे बालरोगतज्ज्ञ त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांना रोटाव्हायरसची लस देत असल्यामुळे पुढे डायरिया झाला तरी त्याची तीव्रता कमी असते. त्यामुळे ही लस न घेतलेल्या- विशेषत: आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांमधील रुग्णांमध्ये हा आजार दिसत आहे. पुढील १ ते २ वर्षांत राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात ही लस समाविष्ट केली जाण्याची शक्यता आहे. असे असले तरी बाळाच्या बाबतीत स्वच्छता पाळणेही तितकीच महत्त्वाची आहे.’’
डायरिया झाल्यावर ‘ओआरएस’चे पाणी (ओरल रीहायड्रेशन सोल्युशन) द्यावे लागते. तसेच १४ दिवसांसाठी ‘झिंक सायरप’ देखील दिले जाते. त्यामुळे रुग्ण लवकर बरा होतो आणि त्याची प्रतिकारशक्ती वाढण्यासही मदत होते, असेही डॉ. ललवाणी यांनी सांगितले.
रोटा व्हायरससाठी लस उपलब्ध असली तरी हिवाळ्यात लहान मुलांना होणाऱ्या डायरियासाठी ‘अॅडिनोव्हायरस’ आणि ‘एन्टेरोव्हायरस’ (नॉन पोलिओ व्हायरस) हे विषाणू देखील कारणीभूत ठरतात. अॅडिनोव्हायरससाठी लस उपलब्ध नाही, असे बालरोगतज्ज्ञ डॉ. सागर लाड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘कडक थंडी सुरू झाल्यापासून रोजच्या प्रॅक्टिसमध्ये विषाणूजन्य डायरियाचे एक वर्षांपेक्षा कमी वयाचे ७ ते ८ रुग्ण बघायला मिळत आहेत. या डायरियामध्ये बाळाच्या शरीरातील पाणी चटकन कमी होण्याची शक्यता असते. बाळांना वेळोवेळी ओआरएसचे पाणी देणे आणि त्याच्या खाण्या-पिण्याकडे लक्ष ठेवणे गरजेचे ठरते. सतत ७-८ दिवस डायरिया राहिला तर त्याचे रूपांतर ‘लॅक्टोज इनटॉलरन्स’मध्ये होते. आतडय़ाच्या आतील अस्तरात ‘लॅक्टेज’ हे एन्झाइम असते. रोटाव्हायरल डायरियामुळे या एन्झाइमचा नाश होतो. हे एन्झाइम पुन्हा भरून येईपर्यंत बाळाला दूध चालत नाही. त्यावर उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने सोयाबीनचा पूरक द्रवआहार सुरू करता येऊ शकतो.’’
संग्रहित लेख, दिनांक 6th Jan 2015 रोजी प्रकाशित
चिमुकल्यांना त्रास ‘विंटर डायरिया’चा!
गेल्या २ ते ३ आठवडय़ांपासून रोज बाह्य़रुग्ण विभागात सुमारे २० टक्के रुग्ण विंटर डायरियाचे बघायला मिळत आहेत, असे निरीक्षण काही बालरोगतज्ज्ञांनी नोंदवले.

First published on: 06-01-2015 at 03:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Winter diarrhea health doctor