स्वातंत्र्योत्तर सहा दशकातील स्त्रियांच्या सर्जनशक्तीचा आविष्कार तीन खंडांमध्ये वाचकांसाठी खुला होत आहे. १९५० ते २०१० या गेल्या साठ वर्षांतील कथा, कादंबरी आणि कविता या वाङ्मयप्रकारांचा यामध्ये वेध घेण्यात आला असून यातील पहिले दोन खंड पूर्णत्वास गेले आहेत.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या शाश्वती स्त्री-सर्जनशक्ती विकास केंद्राने हा त्रिखंडात्मक प्रकल्प हाती घेतला आहे. या केंद्राच्या संचालक आणि प्रसिद्ध कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांनी या तीनही खंडांचे संपादन केले आहे. पद्मगंधा प्रकाशनतर्फे या प्रकल्पाचे खंड वाचकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यातील ‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी’ हा पहिला खंड आला असून ‘स्त्री-लिखित मराठी कथा’ हा खंड प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
‘स्त्री-लिखित मराठी कादंबरी’ या खंडामध्ये कमल देसाई, ज्योत्स्ना देवधर, आशा बगे, निर्मला देशपांडे, गौरी देशपांडे, तारा वनारसे, रोहिणी कुलकर्णी, अंबिका सरकार, शांता गोखले, सानिया आणि कविता महाजन या अकरा कादंबरीकारांचा समावेश आहे. त्यांच्या साहित्याचे वैशिष्टय़ आणि त्यातील पदर उलगडणारे लेख मंगला आठलेकर, डॉ. अश्विनी धोंगडे, सिसिलिया काव्र्हालो, डॉ. नीलिमा गुंडी आणि प्रभा गणोरकर यांनी लिहिले आहेत. तर, ‘स्त्री-लिखित मराठी कथा’ या खंडामध्ये कमल देसाई, विजया राजाध्यक्ष, रोहिणी कुलकर्णी, आशा बगे, गौरी देशपांडे, सानिया, ऊर्मिला पवार, मेघना पेठे, नीरजा, प्रतिमा जोशी आणि मोनिका गजेंद्रगडकर या कथाकारांचा अंतर्भाव करण्यात आला आहे. त्यांच्या कथांचे वैशिष्टय़ उलगडणारे लेख समाविष्ट करण्यात आले आहेत.
डॉ. अरुणा ढेरे म्हणाल्या,‘‘ स्वातंत्र्योत्तर कालखंडातील लेखिका भोवतालाकडे, कुटुंबाकडे, स्वत:कडे कशा पाहतात, त्यांचा लेखिका म्हणून प्रवास आणि त्यांचे योगदान याचा वेध घेतला आहे. लेखिका म्हणून त्यांचे जग आहे का, भारतीय पातळीवर मराठी लेखिकांचे जग काय आहे, या जगाच्या मर्यादा आणि वैशिष्टय़ांचा गंभीर शोध घेण्याचा प्रयत्न आहे. त्यांच्यासाठी लेखन हे अभिव्यक्तीचे साधन आहे, की जीवनशोधाचे माध्यम, समाजाशी लढण्याचे हत्यार, की सामाजिक कोंडीचे सांत्वन या बाबींनी हा शोध घेतला आहे. या खंडात अकरा लेखिकांच्या कथेसह त्यांच्या मुलाखतींचाही समावेश आहे.’’