दत्ता जाधव

पुणे : अमेरिकेत मुख्य पाणीपुरवठा यंत्रणेने गाठलेला तळ, युरोपातील बहुतांश देशांत पडलेला भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटा यांमुळे कृषी उत्पादनात मोठी घट होण्याची चिन्हे असून त्याचे दुष्परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत. आफ्रिका खंडातील २२ दशलक्ष लोकांना उपासमारीला सामोरे जावे लागण्याच्या भीतीसह २०२२-२३मध्ये जगात अन्नधान्यांची दरवाढ, टंचाई निर्माण होण्याची शक्यता विविध अहवालांतून व्यक्त केली जात आहे.

‘वल्र्ड इकॉनॉमिक फोरम’ आणि अमेरिकेच्या ‘नॅशनल एरोनॉटिक्स अ‍ॅण्ड स्पेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन’ने (नासा) जाहीर केलेल्या माहितीनुसार अमेरिकेतील सुमारे २५ दशलक्ष लोकांना पाण्याचा पुरवठा करणाऱ्या ‘लेक मीड’ या जलाशयाने तळ गाठला आहे. अशी स्थिती १९३७ नंतर प्रथमच निर्माण झाली आहे. कमी पाऊस आणि उष्णतेच्या लाटांमुळे अमेरिकेतील दुष्काळाची तीव्रता वाढत आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्निया, टेक्सास, ओरेगॉन, नेवाडा, उटाह आणि न्यू मेक्सिको या राज्यांमध्ये दुष्काळाची परिस्थिती सर्वात गंभीर आहे. अमेरिकेच्या कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार दुष्काळाचा अमेरिकेच्या कृषी आणि पशूधनावर विपरीत परिणाम होणार आहे. दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटेमुळे गवतांच्या कुरणांचे मोठे नुकसान झाल्यामुळे पशुधनाचे उत्पादन कमी होऊ शकते. अन्न प्रक्रिया आणि कृषी सेवा क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होऊन प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर अन्नाच्या किमती वाढू शकतात.

युरोपीय कमिशनने युरोपातील दुष्काळ ऑगस्ट २०२२, या नावाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे,की युरोपातील अनेक देशांना वर्षांच्या सुरुवातीपासून दुष्काळाच्या झळा बसत आहेत. जुलै, ऑगस्ट महिन्यात या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. युरोपातील नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. पिण्याचे पाणी, शेतीसाठीेचे पाणी आणि जलविद्युत क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. अन्नधान्यांसह मका, सोयाबीन आणि सूर्यफूलाच्या उत्पादनावर मोठा परिणाम होणार आहे. बीबीसी, सीएनबीसी या वृत्तवाहिन्यांसह अनेक संस्था हा पाचशे वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ असल्याचे सांगत आहेत. ऱ्हाईन, डॅन्यूब, ओडर, लोरी, पो, वाल या प्रमुख नद्यांसह अनेक नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. संपूर्ण युरोपात आगामी वर्षांत अन्नधान्यांची टंचाई निर्माण होणार आहे.

चीन ६१ वर्षांतील भीषण दुष्काळाचा सामना करीत आहे. यांगत्से नदीचा प्रवाह रोडावला आहे. नदीकाठावरील भात, मक्याचे पीक अडचणीत आले आहे. यांगत्से आशियातील सर्वात मोठी नदी असून, नदीवरील जलविद्युत प्रकल्प बंद झाले आहेत. सिचुआन, हुबेई, हुनान, जिआंग्शी, अनहुई, चोंगाकिंग या प्रांतांना दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. शांघायसह अन्य प्रमुख शहरातील दिवे रात्री बंद केले जात आहेत, इतण्या भीषण वीज टंचाईला चीन सामोरे जात आहे. टेस्ला, टोयाटो सारख्या अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी विजेअभावी आपले प्रकल्प बंद केले आहेत.

आफ्रिकेची अन्नसुरक्षा धोक्यात ?

अमेरिका, चीन आणि युरोपातील समृद्ध देशांकडून अन्नधान्यांची मागणी वाढली तर जागतिक अन्नधान्य बाजारातील समतोल ढासळू शकतो. चीनमध्ये गहू, तांदूळ उत्पादन कमी झाल्यास त्याचा जागतिक बाजारावर मोठा परिणाम होणार आहे. रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात तेजीत असलेल्या अन्नधान्यांच्या दराचा भडका उडू शकतो. या दरवाढीचा सर्वाधिक विपरीत परिणाम गरीब आफ्रिकी देशांना बसणार आहे. ‘द गार्डियन’ने दुष्काळामुळे आफ्रिकेतील २२ दशलक्ष लोकं उपासमारीच्या उंबरठय़ावर असल्याचे म्हटले आहे.

दुष्काळ आणि उष्णतेच्या तीव्र लाटांमुळे संपूर्ण युरोप आणि अमेरिकेचा काही भाग होरपळून निघत आहे. चीनलाही झळा बसत आहेत. अति थंडी आणि अति उष्णता, अशी अवस्था युरोपात आहे. त्यामुळे स्थानिक आणि पर्यायाने जागतिक वातावरणात बदल होत आहे. युरोपातील दुष्काळ जास्त चिंताजनक आहे. प्रत्येक दुष्काळात पहिला बळी शेती क्षेत्राचाच जातो.

– अक्षित संगोमला, संशोधक, सेंटर फॉर सायन्स अँण्ड एनव्हायर्नमेंट, नवी दिल्ली

परिस्थिती काय?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेत पाणीपुरवठा करणाऱ्या मोठय़ा धरणांनी तळ गाठला आहे. १९३७ नंतरची सर्वात भीषण टंचाई अमेरिकेत निर्माण झाली आहे. युरोपात गेल्या पाचशे वर्षांतील सर्वात मोठा भीषण दुष्काळ पडला आहे. युरोपातील प्रमुख नद्या कोरडय़ा पडल्या आहेत. चीन ६१ वर्षांतील सर्वात भीषण दुष्काळ आणि उष्णतेच्या लाटांचा सामना करीत आहे.