‘‘मला खरे तर इंग्रजी कवी होऊन पुढे नोबेल पारितोषिकापर्यंत पोहोचायचे होते! पण वयाच्या २१ व्या वर्षी महाभारत वाचता वाचता अचानक ‘ययाती’ लिहायला सुरुवात केली. त्या नाटकातील पात्रेच जणू मला नाटक सांगत होती आणि मी लिहून घेत होतो! असा अनुभव पुन्हा कुठल्याही नाटकाच्या वेळी आला नाही. ययाती प्रकाशित झाले आणि माझ्या जीवनाची दिशाच बदलली!’’.. नाटककारच व्हायचे, असे ठरवल्यानंतरचे गिरीश कर्नाड यांचे कलाजीवन त्यांच्या प्रकट मुलाखतीतून उलगडले.
‘राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय’ आणि ‘आशय सांस्कृतिक’तर्फे आयोजित ‘समग्र गिरीड कर्नाड महोत्सवा’च्या समारोपप्रसंगी सरोज देशपांडे यांनी अनुवादित केलेल्या ‘वेडिंग अल्बम’ आणि प्रदीप वैद्य यांनी अनुवादित केलेल्या ‘उणे पुरे शहर एक’ या कर्नाड यांच्या नाटकांचे प्रकाशन ज्येष्ठ रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांच्या हस्ते झाले. ज्येष्ठ रंगकर्मी विजया मेहता, नाटय़समीक्षक माधव वझे, ‘आशय’चे सचिव सतीश जकातदार, वीरेंद्र चित्राव, ‘पॉप्युलर’ प्रकाशनाच्या अस्मिता मोहिते या वेळी उपस्थित होत्या. डॉ. सदानंद बोरसे यांनी कर्नाड यांच्याशी संवाद साधला.
कर्नाड म्हणाले, ‘‘नाटकात दोन तासांच्या अवधीत बऱ्याच गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडायच्या असतात. ही मला सर्वात आव्हानात्मक गोष्ट वाटते. त्यामुळेच नाटककार व्हावेसे वाटले. ‘शिरसी’ला राहताना आमच्या घराभोवती घनदाट जंगल होते, वीज नव्हती. करमणुकीचे दुसरे साधनच नसल्याने मी गोष्टींच्या आणि ‘यक्षगान’सारख्या लोककलांच्या सान्निध्यात वाढलो. ‘हयवदन’मध्ये जेव्हा मी यक्षगानचा वापर केला, तेव्हा मला काहीच वेगळी तयारी करावी लागली नाही. तसाच महाविद्यालयात केवळ प्रथम श्रेणी मिळवण्याच्या उद्देशाने, आवडत नसतानाही गणित शिकलो. गणितातील शिस्तीचा नाटककार म्हणून फायदा झाला. सत्यदेव दुबे यांच्या ‘पीडे’मुळे मी वयाच्या ७१ व्या वर्षी ययाती पुन्हा लिहिले. ‘हे नाटक चांगले आहे, पण इमॅच्युअर्ड आहे’, असे ते म्हणत! दुसऱ्यांदा ययाती लिहिताना मी माणूस म्हणून अधिक प्रगल्भ झालो होतो. माझा भाऊ वसंत कर्नाड उत्तम गात असे. तो धोंडूताई कुलकर्णीचा शिष्य होता. तबल्याची साथ करायचो; पण मी गाण्यात कधी अडकलो नाही. मराठीमध्ये होतात तशा नाटय़स्पर्धा कन्नडमध्ये होत नाहीत याची खंत वाटते. माझ्या हयवदन, तुघलक या नाटकांना कन्नडपेक्षाही मराठी रंगभूमीकडून अधिक मागणी होते.’’
  म्हातारा न इतुका ..!
अमृतमहोत्सवानिमित्त गिरीश कर्नाड यांचा डॉ. श्रीराम लागू आणि विजया मेहता यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी कर्नाड यांनी मिश्किलपणे, ‘मला मराठी नाटकांचे आणि नाटय़संगीताचे फार प्रेम आहे. या प्रसंगाला चपखल बसेल असे एक नाटय़गीत आठवते. ‘म्हातारा न इतुका अवघे पाऊणशे वयोमान’ ही ओळ कर्नाड यांनी गुणगुणताच त्याला प्रेक्षकांनी दिलखुलास दाद दिली.