पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे येथे एकाने सख्ख्या चुलत भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सतीश गुलाबराव सोनवणे असं मयत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी दीपक सोनवणेला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश गुलाबराव सोनवणे (वय ४० रा.सोनवणे वस्ती) आणि दीपक सोनवणे (वय ४५) हे दोघे सख्खे चुलत भाऊ शेजारीशेजारी राहत होते. गेल्या काही दिवसांपासून अंगणातील सांडपाण्याच्या मुद्यावरुन दोघांमध्ये वाद सुरु होते. सतीशच्या घरातून येणारे सांडपाणी दीपकच्या घरापुढे साचत होते. अंगणात होणारी अस्वच्छता आणि हे पाणी घराच्या भींतीमध्ये झिरपत असल्याच्या कारणावरुन दोघांच्यात वादाला सुरुवात झाली. बुधवारी रात्री याच कारणावरुन दोघांच्यात जोरदार भांडण झाले. यात दीपकने टोकाचे पाऊल उचलत सतीशवर कोयत्याने वार केले. यात सतीशचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस निरीक्षिक सुनील पिंजन अधिक तपास करत आहेत.