चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून फरार झाल्यानंतर महिलेच्या वेशात राहणाऱ्या पतीला पाच वर्षांनंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांना अटक करण्यात यश आले आहे. चंदननगर येथील आंबेडकर नगर येथे डिसेंबर २००८ मध्ये ही घटना घडली होती.
प्रकाश उर्फ मुन्ना हनुमंत कुटके (वय ३५, रा. आंबेडकर नगर, चंदननगर) असे अटक केलेल्या व्यक्तींचे नाव आहे. या घटनेत लक्ष्मी उर्फ उपमा हनुमंत कुटके (वय ३०) हिचा खून करण्यात आला होता. कुटके याने लक्ष्मीबरोबर विवाह केल्यानंतर काही दिवसात चारित्र्याचा संशय व घरगुती कारणावरून त्यांच्यात भांडणे होत असत. डिसेंबर २००८ मध्ये कुटके याने लक्ष्मीच्या चारित्र्यावर संशय घेऊन चाकूने वार करून तिचा खून केला. तेव्हापासून तो फरार होता, अशी माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या पाच वर्षांपासून कुटके फरारी होता. गुन्हे शाखेच्या युनिट चारचे पोलीस कर्मचारी दीपक खरात यांना कुटके हा कल्याण येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण वालतुरे यांच्या पथकाने कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात सापळा लावला. त्या वेळी त्यांना आरोपी हा महिलेच्या वेशामध्ये येत असल्याचे दिसून आले. पोलीस कर्मचारी अर्जुन भांबुरे, ज्ञानेश्वर भारती, गणेश देशपांडे आणि खरा यांनी चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीचा खून केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यानंतर खून केल्यानंतर तो कल्याणला गेला. या ठिकाणी स्वत:ची ओळख लपविण्यासाठी महिला वेशात राहून तृतीयपंथीच्या टोळीत सहभागी झाला. काही दिवस त्याने या ठिकाणी घरकामही केले आहे.