[content_full]
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एक आटपाट नगर होतं. तिथे चंद्रसेन राजा राज्य करत होता. राजाला दोन राण्या होत्या. एक होती आवडती, एक नावडती. दोघींनाही एकेक मुलगा होता. आवडतीच्या मुलाचं नाव होतं कणीक. नावडतीच्या मुलाचं नाव होतं मैदा. दोन्ही मुलं राजाचीच, पण मैद्याला कायम नावं ठेवली जात. तो स्वतः तर आळशी आहेच, पण लोकांनाही आळशी बनवतो, त्यांचं वजन वाढवतो, त्यांची पोटं बिघडवतो, त्यांना वाईट सवयी लावतो, अशा तक्रारी वाढल्या होत्या. स्वतः राजासुद्धा आता मैद्याचा द्वेष करायला लागला होता. केवळ त्याच कारणामुळे मैद्याची आई म्हणजे राजाची दुसरी राणीसुद्धा नावडतीची अधिक नावडती व्हायला लागली होती. पहिल्या राणीचा, म्हणजे आवडतीचा मुलगा कणीक मात्र मजेत राहत होता. त्याची सगळी कोडकौतुकं पुरवली जात होती, त्याच्या गुणांची तारीफ होत होती. त्याच्याशिवाय कुणाचं पान हलत नाही, असं सारखं बोललं जात होतं. रोज जेवताना त्याची गरज लागले, त्याच्यामुळे कुणाला अपाय होत नाही, उलट भरपूर ताकद मिळते, ऊर्जा येते, उत्साह मिळतो, असा गुणगौरव होत असल्यामुळे कणीक आणि त्याची आई आवडती, दोघंही खूश होते. कळत नकळत राजासुद्धा कणकेचीच तारीफ करत होता. मैद्यावर अन्याय होतोय, हे राजाला कळत होतं, पण वळत नव्हतं. एके दिवशी मैद्यानं ठरवलं, की राजाला आपलं महत्त्व पटवून द्यायचं. अर्थात, त्याचा कणकेवर राग नव्हता, की राजावर नव्हता. सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याचीच त्याची वृत्ती होती. त्यानं असा पदार्थ शोधून काढला, की ज्यात कणीक आणि मैदा दोघांचीही गरज लागेल. पदार्थ तयार झाला आणि राजासमोर सादर करण्यात आला. राजाला तो प्रचंड आवडला आणि यापुढे प्रत्येक आनंदाच्या प्रसंगी तोच केला जाईल, असं फर्मान राजानं काढलं. कणीक आणि मैदा, दोघांपासूनही बनणारा हा पदार्थ होता, चटपटे कुरकुरे. चला मग, रेसिपी बघूया?
[/content_full]
[row]
[two_thirds]
साहित्य
- दीड वाटी मैदा
- अर्धी वाटी कणीक
- एक वाटी कढीपत्त्याची पाने
- चवीनुसार दोन ते तीन हिरव्या मिरच्या व मीठ
- एक टेबलस्पून चाट मसाला
- तळण्यासाठी गरजेनुसार तेल
[/two_thirds]
[one_third]
पाककृती
- सर्वप्रथम कढीपत्याची पाने धुवून, पुसून कोरडी करून घेऊन मिक्सरमध्ये घालावीत.
- त्यातच हिरव्या मिरच्या व थोडे मीठ घालून जाडसर भरड वाटून घ्यावे.
- नंतर एका परातीत मैदा, कणीक व वरील कढीपत्त्याचे मिश्रण आणि चवीनुसार मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे.
- अर्ध्या तासानंतर पीठ एकसारखे करून त्याचे चार गोळे करावेत. नंतर हे गोळे पाटावर पातळ लाटावेत.
- एका कढईत तेल चांगले तापवून घ्यावे व लाटलेल्या पोळीचे कातण्याने किंवा सूरीने पातळ पातळ काप करावेत.
- तापलेल्या तेलात हे काप खमंग तळून घ्यावेत व वरून चाट मसाला भुरभुरावा. गार झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवावे. चटकदार चटपटीत कुरकुरे तयार.
[/one_third]
[/row]