अनेकदा निरोगी राहण्यासाठी डॉक्टरांकडून सफरचंद खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण सफरचंद खाल्ल्याने शरीरास अनेक आवश्यक पोषक तत्व सहज मिळतात, जे तुम्हाला विविध आजारांपासून दूर ठेवण्यास मदत करतात. सफरचंदात जीवनसत्वे आणि खनिजे असतात, ज्यामुळे शरीराला ऊर्जा मिळते, पचनशक्ती मजबूत होते आणि लठ्ठपणाही कमी होतो. पण, जर तुम्हाला कच्चे सफरचंद खायला आवडत नसेल तर तुम्ही सफरचंदपासून जाम बनवून खाऊ शकता. यात हिवाळ्यात सफरचंद मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने तुम्ही घरीच सफरचंद मुरांबा बनवू शकता. अगदी १० मिनिटांत तयार होणारी ही रेसिपी दोन महिन्यांपर्यंत स्टोर करून ठेवू शकता.

सफरचंदाचा मुरांबा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

१) १ किलो सफरचंद
२) १ किलो साखर
३) २ लिंबू
४) अर्धा चमचा वेलची पूड

सफरचंदाचा मुरांबा बनवण्याची कृती

सर्वप्रथम सफरचंद धुवून स्वच्छ पुसून घ्या, त्यानंतर साले काढून घ्या. सफरचंद पाण्यात ठेवा ज्यामुळे ते काळे पडत नाही. आता एका मोठ्या भांड्यात सर्व सफरचंद बुडतील इतकं पाणी घ्यावं.

ते पाणी उकळू लागल्यावर त्यात एक-एक करून सर्व सफरचंद टाकावे आणि मऊ होईपर्यंत शिजवा. सफरचंद १५ मिनिटांनंतर मऊ झालेत की नाही हे तपासावे, यानंतर गॅस बंद करा.

आता साखरेचा पाक बनवण्यासाठी एक भांड्यात एक किलो साखर घ्या, त्यात ३ ते ४ कप पाणी घालून गॅसवर ठेवा. त्यात वेलची पूड घाला आणि साखर विरघळली की सफरचंद पाण्यातून काढून तयार सिरपमध्ये घाला. मुरंबा बनवण्यासाठी तुम्हाला दोन तारी पाक तयार करावा लागेल, जो मधापेक्षा थोडा पातळ असेल. आता पाकात भिजवलेल्या सफरचंदात लिंबाचा रस घाला आणि दोन दिवस असेच राहू द्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तुम्ही अधूनमधून मुरंबा ढवळत राहा, जेणेकरून साखरेचा पाक पूर्णपणे शोषला जाईल आणि सफरचंद गोड होतील. अशाप्रकारे स्वादिष्ट सफरचंद मुरंबा खाण्यासाठी तयार आहे.