[content_full]

“मी मांसाहार सोडून दिला आहे. आजपासून या घरात कुठलाही मांसाहारी पदार्थ शिजलेला मला चालणार नाही!“ संपतरावांनी आल्या आल्या दम दिला आणि घराचा मूडच बदलून गेला. “बाहेरून आणलेला चालेल का,` असा वाह्यात प्रश्न विचारलास, तर थोबाड फोडीन कार्ट्या!“ काहीतरी बोलण्यासाठी तोंड उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या चिरंजीवांनाही त्यांनी झापलं. `तुम्हाला पाणी हवंय का, असं विचारणार होतो,` हे त्याचं वाक्य ओठांतल्या ओठांत विरून गेलं. काही क्षण असेच भयाण शांततेत गेले. काही वेळाने संपतरावांनी पाणी प्यायलं, मग ते काहीसे शांत झालेले वाटले. आता वहिनींनी अंदाज काढण्याचा प्रयत्न सुरू केला. माय-लेकांच्या खाणाखुणाही झाल्या. गेल्या आठवड्यात मांसाहारावरून काही झालं होतं का, आईवडिलांपैकी कुणाचा फोन आला होता का, कुण्या मित्राबरोबर काही भांडण झालं असावं का, अशा सगळ्या शक्यता धुंडाळून झाल्या. काहीच हाताला लागत नव्हतं. मुलगा सिगारेट ओढतो, असा संशय येऊनही काही पुरावे हाती न लागल्यावर एखाद्या बापाची होईल ना, तशी वहिनींची अवस्था झाली होती. मांसाहारावरच्या या बहिष्काराचं मूळ कशात आहे, तेच सापडत नव्हतं. काही वेळ विचार केल्यावर अचानक एक आशेचा किरण दिसावा, तसं त्यांना काहीतरी सुचलं. मुलाला बाजूला बोलावून त्यांनी काल खिम्याचं काही करण्याबद्दल बोलणं झालं होतं का, असं विचारलं. त्यानं होकार भरला आणि वहिनींची ट्यूब पेटली. त्यांनी गुपचुप त्याच्या हातात काहीतरी दिलं आणि त्याला निरोप देऊन बाहेर पिटाळलं. संपतराव त्यांच्या खोलीत जाऊन दार लोटून बसले होते, ते एकदम घरातल्या खिमा भज्यांच्या घमघमाटानंच बाहेर आले. “नाही, सरकारचं धोरण योग्यच आहे, पण खिमा घेतानासुद्धा दुकानदार सुट्या पैशांवरून अडवणूक करतात, याच्याबद्दल काहीतरी करायला हवं सरकारनं!“ संपतराव खिमा भजी तोंडात टाकता टाकता म्हणाले आणि वहिनी आणि मुलगा पोट धरून हसले.

[/content_full]

[row]

[two_thirds]

साहित्य


  • १०० ग्रॅम मटण खिमा
  • एक मोठा कांदा
  • एक नरम पाव
  • एक अंडं
  • अर्धी वाटी बेसन
  • चिकन किंवा कुठलाही नॉन वेज स्पेशल मसाला
  • हळद
  • मीठ
  • तळण्यासाठी तेल

[/two_thirds]

[one_third]

पाककृती


  • प्रथम खिमा स्वच्छ करून एका पातेल्यात घ्या.
  • त्यात एक चमचा चिकन मसाला, बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेलं आलं, पावाचे तुकडे, अर्धी वाटी बेसन, एक फेटलेलं अंड मिसळा.
  • आता चवीनुसार मीठ, हळद टाकून गरजेनुसार पाणी वापरून घट्ट मळून घ्या.
  • कढईत तेल तापवा आणि मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तेलात सोडा.
  • तपकिरी रंग येईस्तोवर तळून घ्या.
  • गरमागरम खिमा भजी सॉस किंवा पुदिन्याच्या हिरव्या चटणीबरोबर सर्व्ह करा.

[/one_third]

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

[/row]