जेवताना पापड, कुरडई, सांडगे आपण नेहमी खातो पण ते तयार करण्यासाठी महिलांना खूप आधीपासून तयारी करावी लागते.
उन्हाळ्याची चाहूल लागताच महिला वर्गाची वाळवण करण्याची तयारी सुरू होते. विविध प्रकारचे वाळवण महिला करतात. विविध प्रकारचे पापडही करतात आणि वर्षभर साठवून ठेवतात. उपवासासाठी खाता येतील असेही काही वाळवणाचे प्रकार आहेत जसे, बटाट्याचे वेफर्स, बट्ट्याचा कीस, उपवासाचे पापड. आज आम्ही तुम्हाला उपवासासाठी खाता येईल अशा वाळवणाच्या पदार्थाची रेसिपी सांगणार आहोत. उपवासासाठी वर्षभर खाता येईल अशा उपवासाच्या चकलीची रेसिपी सांगणार आहोत. याला साबुदाणा बटाटा चकली असेही म्हणतात. हे रेसिपी अत्यंत सोपी आहे. ज्यांनी कधी वाळवण बनवले नाही असे नवशिके लोकही ही चकली बनवू शकतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण ही चकली आवडीने खातात. चला तर मग जाणून घेऊ या कुरकुरीत साबुदाणा बटाटा चकली कशी तयार करायची.
साबुदाणा बटाटा चकली साहित्य
५०० ग्रॅम साबुदाणा
५०० ग्रॅम बटाटा
१ टीस्पून मीठ
२ चमचे लाल मिरची पावडर
६ कप गरम पाणी
हेही वाचा – पुण्यातील व्यक्तीला वॉटर प्युरिफायरमध्ये सापडल्या ‘लाल अळ्या’, व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले पुणेकर
साबुदाणा बटाटा चकली कृती
१) प्रथम साबुदाणा धुवून घ्या.
२) ६ कप किंवा वाटी पाणी गरम करा.
३) धुतलेल्या साबुदाण्यामध्ये गरम पाणी टाका आणि काही तास तसेच राहू द्या.
४) त्यानंतर बटाटे उकडून, साल काढून किसून घ्या.
५) त्यात भिजवलेला साबूदाणा, लाल तिखट, मीठ टाकून एकत्र करा.
६) चकलीच्या साच्यामध्ये पीठ टाकून बटाट्या चकल्या करून घ्या.
७) कडकडीत उन्हात चकल्या वाळवून घ्या.
८) चकली नीट वाळली की तळून पाहा. कुरकुरीत चकलीचा आस्वाद घ्या.
९) वर्षभर टिकण्यासाठी वाळलेल्या साबुदाण्याच्या चकल्या हवा बंद डब्यात ठेवा.