हिवाळ्यात हवामान बदलामुळे आपली रोगप्रतिकारकशक्ती कमकुवत होऊ लागते. त्यामुळे अनेकांना सर्दी, ताप, खोकल्याचा त्रास होऊ लागतो. अशावेळी बऱ्याचदा शरीरात उष्णता टिकवून ठेवणारे पदार्थ खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे थंडीच्या दिवसात अनेकजण सुका मेवा, गूळ, तूप, तीळ आणि शेंगदाणे खाणे पसंत करतात. वर्षानुवर्षे आपले आजी-आजोबाही हिवाळ्यात तीळ, सुका मेवा आणि गूळ यांपासून बनवलेल्या पदार्थांचे सेवन करायचे, कारण या पदार्थांमुळे शरीरात उष्णता टिकून राहते आणि रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते. त्यामुळे आजी-आजोबा हिवाळ्यात आजारी पडल्याचे तुम्ही फार कमी वेळाच ऐकले असेल. त्यामुळे आम्ही तुम्हाला पूर्वीपासून आजी बनवत आलेल्या पौष्टिक चिक्कीची रेसिपी सांगणार आहोत.

इम्युनिटी बूस्टर चिक्की बनवण्यासाठी साहित्य

१) १५० ग्रॅम भाजलेले शेंगदाणे
२) वेलची पावडर
३) तूप
४) चिक्की गूळ
५) सुका मेवा
६) खसखस
७) तीळ
८) बेकिंग सोडा

इम्युनिटी बूस्टर चिक्की बनवण्याची कृती

इम्युनिटी बूस्टर चिक्की बनवण्यासाठी एका पॅनमध्ये ड्रायफ्रुट्स, खसखस, तीळ आणि शेंगदाणे टाकून चांगले भाजून घ्या. सर्व भाजल्यानंतर सुका मेवा आणि शेंगदाण्यांचे बारीक तुकडे करा. आता एका कढईत तूप आणि गूळ घाला. गूळ वितळण्यासाठी चमच्याने सतत ढवळत राहा, म्हणजे गूळ खाली चिकटणार किंवा जळणार नाही. गूळ वितळला की त्यात बेकिंग सोडा टाकून चांगला फेटा.

गुळाचा पाक चांगला फेटून घेतल्याने चिक्की कुरकुरीत आणि मऊ होते. गुळाचा पाक तयार झाला की त्यात सर्व भाजलेला सुका मेवा, तीळ, खसखस, शेंगदाणे आणि वेलची पूड घालून मिक्स करा. आता एका ट्रेमध्ये तूप लावून गूळ आणि ड्रायफ्रुट्सपासून बनवलेली चिक्की नीट सेट करा. ट्रेमध्ये चिक्की पसरवल्यानंतर लगेच चाकूच्या साहाय्याने कापून घ्या, अन्यथा थंड झाल्यावर चिक्कीचा आकार नीट कापता येणार नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चिक्की बनवताना ‘या’ गोष्टी ठेवा लक्षात

गुळाचा पाक बनवताना त्यात पाणी घालू नये, नाहीतर पाक चांगला होणार नाही. सुका मेवा आणि तीळ भाजताना एक चमचा तूप घातल्यास चव चांगली येईल. ड्रायफ्रुट्समध्ये तुम्ही तुमच्या आवडीचे इतर ड्रायफ्रुट्स वापरू शकता. तुम्ही त्यात भाजलेले केशर टाकू शकता, बेकिंग सोडा घालून गूळ जितका जास्त फेटून घ्याल तितकी चिक्की मऊ आणि कुरकुरीत होईल.