Sunday Special Non Veg Dish: आपल्याकडे रविवार आणि नॉन व्हेज असं समीकरण बहुतांश घरांमध्ये असतं. सुट्टीच्या दिवशी घरच्यांसह चमचमीत नॉन व्हेज खाण्याची मज्जाच काही और असते. शनिवारी रात्री उद्या जेवणामध्ये काय बनणार हे ठरत असते. त्याशिवाय सकाळी उठून बाजारातून चिकन/ मटण कोण आणणार ही ड्युटी सुद्धा लागते. रविवारच्या दुपारी मस्त जेवण करुन घरातल्या लोकांबरोबर गप्पा मारल्याने आठवड्याचा थकवा नाहीसा होतो. पण काही वेळेस रविवारी जेवणात काय बनवू असा प्रश्न घरात्या गृहिणीला पडतो. तेच ते पदार्थ खाऊन घरातले सगळेजण कंटाळले असतात. अशा वेळी काहीतरी वेगळं ट्राय करायचं असेल, तर तुम्ही महाराष्ट्रीयन स्टाईल चिकन लिव्हर चिली बनवू शकता.

‘चिकन लिव्हर चिली’ साहित्य –

१. पाव किलो चिकनचे लिव्हर
२. २ चमचे आले-लसूण पेस्ट
३. कोथिंबीर पेस्ट
४. लिंबूरस
५. ५-६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून)
६. २ सिमला मिरची (उभे काप करून)
७. १ कांदा (मोठे तुकडे करून)
८. अर्धा वाटी कांद्याची पात
९. १ चमचा सोयासॉस
१०.तेल, चवीनुसार मीठ, १ चमचा गरम मसाला

चिकन लिव्हर चिलीची पाककृती

१. चिकनच्या लिव्हरला आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर पेस्ट व लिंबूरस लावून अर्धा तास मॅरीनेट करत ठेवा

२. पातेल्यात तेल गरम करून त्यात बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या परतवून घ्या.

३. आता त्यात मॅरीनेट केलेले लिव्हर घालून शिजू द्या. थोडेसे पाणी घाला.

४. त्यातील पाणी आटल्यावर त्यात कांदा, सिमला मिरची व चिरलेली कांद्याची पात घालून परता.

हेही वाचा >> रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी कच्च्या पपईची भाजी; गृहिणींनो एकदा नक्की ट्राय करा

५. त्यात सोयासॉस व मीठ घालून एक वाफ येऊ द्या.

६. चिकन लिव्हर चिली गरमागरम सर्व्ह करा.