कडक उन्हाळा सुरु झाला आहे आणि बाजारात कैरी सहज उपलब्ध होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकांच्या घरात कैरीचा आता अनेक पदार्थ्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वापर सुरु झालाय. अनेकांना मीठ, मसाला लावून कैरी खायला आवडते. तर काहीजण मोठ्याप्रमाणात कैऱ्या उपलब्ध असतील तर त्यापासून लोणचं, मुरांबा, आमसूल अशा गोष्टी बनवून ठेवतात. पण आज आम्ही तुम्हाला कैरीपासून तयार होणारा एक चटपटीत पदार्थ सांगणार आहोत. जो तुम्ही अगदी पोळी भाकरी, खिचडी भाताबरोबर आवडीने खाऊ शकता. आज आपण कैरीपासून चटपटीत आंबट गोड कढी कशी बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत…
साहित्य
२ कैऱ्या
२ चमचे गुळ
१ चमचा चण्याचं पीठ
पाणी
चिमूटभर मेथी, मोहरी
१०, १२ कढीपत्त्याची पानं
२ हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा हिंग
१ छोटा चमचा हळद
चवीनुसार मीठ
कोथिंबीर
कृती
कैरीची चटपटीत कढी बनवण्यासाठी सर्वप्रथम दोन कैऱ्या कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्या, चांगल्याप्रकारे वाफवल्यानंतर त्याचे देठ आणि साल काढून टाका, यानंतर सुरी किंवा चमच्याच्या साहाय्याने कैरीचा सर्व गर एका प्लेटमध्ये काढून घ्या. यानंतर मिक्सरच्या मोठ्या भांड्यात कैरीचा गर, गुळ आणि चण्याच्या डाळीचे पीठ आणि थोडे पाणी टाकून पेस्ट बनवा.
यानंतर गॅसवर एका कढईत तेल चांगल्याप्रकारे गरम करा. यानंतर मेथी, मोहरी, कढीपत्ता, हिरव्या मिरच्यांची चांगली फोडणी द्या. यानंतर त्यात हिंग आणि हळद टाकून परतून घ्या. आता मिक्सरला वाटलेली कैरीची पेस्ट टाका आणि आवश्यकतेनुसार पाणी टाका. यानंतर चवीपुरते मीठ घाला. कढीला चांगल्या प्रकारे उकळली आली की गॅस बंद करा. शेवटी त्यावर थोडी कोथिंबीर टाका. अशाप्रकारे कैरीची चटपटीत कढी तयार झाली.