Summer Special Valvan Mirchi Recipe : उन्हाळ्यात वाळवणीचे विविध पदार्थ तयार केले जातात. विशेषत: महाराष्ट्रात पापड, कुरडया, फेण्या, आंब्याचं साटं असे अनेक पदार्थ उन्हाळ्यात तयार करून ठेवले जातात. वर्षभर टिकणाऱ्या या पदार्थांमध्ये अनेक जण आजही ‘वाळवण मिरच्या’ हा वाळवणीचा पदार्थ आवर्जून करतात. या तळलेल्या वाळवण मिरच्या जेवणाची चव आणखी वाढवतात. ताक-भात किंवा वरण-भाताच्या जोडीला ही वाळवण मिरची खाल्ली तरी पोट भरल्यासारखं वाटतं. त्यामुळे यंदा उन्हाळ्यात तुम्हीसुद्धा ही वाळवण मिरची तयार करून ठेवा आणि वर्षभर याचा आनंद घ्या. चला जाणून घेऊ वाळवण मिरच्या बनवण्याची सोपी रेसिपी…
वाळवण मिरची बनविण्यासाठी लागणारे साहित्य
१) लांबट तिखट मिरच्या- पाव किलो
२) दही- अर्धी वाटी
३) धणे पावडर- दोन चमचे
४) जिरे पावडर- एक चमचा
५) हळद- अर्धा चमचा
६) मीठ- दोन चमचे
वाळवण दही मिरची बनविण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यात सर्व मिरच्या चांगल्या प्रकारे धुवा आणि मग त्या मधून उभ्या कापून घ्या, त्यानंतर त्यात दही, धणे पावडर, जिरे पावडर, हळद, मीठ टाकून घ्या. मीठ थोडं जास्त टाका. तयार झालेले हे सर्व मिश्रण मिरच्यांमध्ये चांगल्या प्रकारे भरून घ्या. तुम्हाला वाटल्यास तुम्ही हे मिश्रण एकेका मिरचीमध्ये भरु शकता. त्यानंतर एक मोठं ताट घेऊन, त्यात सर्व मिरच्या व्यवस्थितरीत्या ठेवा आणि तीन दिवस उन्हात सुकवा. तीन दिवसांनी मिरच्या मस्त कुरकुरीत होतील.
अशा प्रकारे तयार झालेल्या मिरच्या तुम्ही पाहिजे तेव्हा तेलात तळून वरण-भात किंवा दही-भात कशा बरोबरही खाऊ शकता. या मिरच्या चवीला इतक्या मस्त असतात की, जेवणाबरोबर त्या खाण्यात एक वेगळी मजा असते. तुम्ही उन्हाळ्यात अशा प्रकारे वाळवण मिरच्या बनवा. मग वर्षभर त्या मिरच्या जेवणाचा मस्तपैकी आनंद घेत खाऊ शकता.
(क्रेडिट – @aaichirecipe Instagram अकाउंट)