scorecardresearch

Firangi movie review : कुठे ‘भुवन’.. कुठे ‘मंगा’!

किंबहुना, चित्रपटाच्या नावाशी इमान राखत कथा लिहिली असल्याने ती थोडी वेगळी ठरते.

RatingRatingRatingRatingRating
Firangi movie review : कुठे ‘भुवन’.. कुठे ‘मंगा’!
प्रेक्षकांच्या आणि चित्रपटगृह मालकांच्या प्रश्नाला कपिल शर्माने ‘फिरंगी’ हा आपला चित्रपट उत्तरादाखल ठेवला आहे.

‘पद्मावती’ नसल्यामुळे या आठवडय़ात काय?, या प्रेक्षकांच्या आणि चित्रपटगृह मालकांच्या प्रश्नाला कपिल शर्माने ‘फिरंगी’ हा आपला चित्रपट उत्तरादाखल ठेवला आहे. भन्साळींच्या चित्रपटाएवढा जबरदस्त नाही, पण या आठवडय़ात प्रेक्षकांचे किमान मनोरंजन करू शकेल एवढी क्षमता ‘फिरंगी’ या चित्रपटात आहे. ब्रिटिशकालीन भारताची पाश्र्वभूमी असलेली पण हलकीफुलकी कथा आणि तेवढेच ताकदीचे कलाकार यामुळे हा चित्रपट अगदीच नीरस ठरत नाही.

ब्रिटिशकालीन भारतातली कथा, एक गोरा अधिकारी, पंजाबमधली छोटी छोटी गावे आणि तिथले गावकरी हे चित्र पाहिल्यानंतर आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान’ आठवल्याशिवाय राहत नाही हे खरे असले तरी तिथला ‘भुवन’ आणि इथला ‘मंगा’ (कपिल शर्मा) यांच्यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. किंबहुना, चित्रपटाच्या नावाशी इमान राखत कथा लिहिली असल्याने ती थोडी वेगळी ठरते. मंगा हा गावातील बेकार तरुण. मित्राच्या लग्नाच्या निमित्ताने दुसऱ्या गावात आलेला मंगा तिथे सरगीच्या (इशिता दत्त) प्रेमात पडतो. गावातले हे लग्न संपता संपता सरगीचेही आपल्यावर प्रेम आहे हे त्याला कळून चुकते. खरेतर, या दोघांच्या प्रेमाला आडकाठी येईल असे काहीच कारण नसतानाही मंगाला अचानक गोऱ्या अधिकाऱ्याचा नोकर होण्याची संधी मिळते. आणि इथेच त्यांच्या प्रेमात माशी शिंकते. देशी ‘हिरो’ सरगीच्या गांधीवादी आजोबांच्या मते ‘फिरंगी’ ठरतो. इथून पुढे हा चित्रपट फक्त नायक-नायिकेच्या प्रेमक थेपुरता मर्यादित राहत नाही. त्या अनुषंगाने तत्कालीन ब्रिटिश भारतात असलेले दोन मतप्रवाह एक गोऱ्यांच्या सुधारणेला मानणारा आणि दुसरा गांधीजींच्या विचारांनी प्रेरित होऊन गोऱ्यांना ‘चले जाव’ म्हणून सांगणारा..ठळकपणे दिसतात. त्या वेळी ब्रिटिश अधिकाऱ्यांना हाताशी धरून आपली गंगाजळी भरण्यात मग्न असलेल्या स्वार्थी, लोभी संस्थानिकांचा चेहराही यात दिसतो. अर्थात, आपल्या ‘फिरंगी’ नायकाला त्याच्या देशी मुळांकडे घेऊन जाणारी, त्याच्यातील स्वाभिमान जागवणारी ही कथा हलक्याफुलक्या पद्धतीनेच मांडली गेली असल्याने मंगा, त्याची गावकरी टीम विरुद्ध इंग्रज अधिकारी आणि राजा ही लढाई मनोरंजक पद्धतीने समोर येते.

वेगळी कथा आणि त्या कथेला साजेशा कलाकारांची फौज दिग्दर्शक राजीव धिंग्रा यांनी चित्रपटात उभी केली आहे. त्यामुळे अभिनयाच्या पातळीवरही चित्रपट सरस ठरतो. कपिल शर्मा आणि इशिता दत्ता ही मुख्य जोडी पडद्यावर उठून दिसते, या दोघांचा रोमान्स हा चित्रपटाचा केंद्रबिंदू नाही. त्यामुळे गाणी आणि प्रेमकथा गरजेपुरतीच येतात. कपिल शर्माचा अभिनय खूप सुंदर वगैरे नाही, पण राजेश शर्मा, इनामुलहक, कुमुद मिश्रा, अंजन श्रीवास्तवसारख्या कसलेल्या कलाकारांनी चित्रपटात मजा आणली आहे. पण चित्रपटाच्या लांबीला दिग्दर्शकाने थोडा आवर घातला असता तर तो आणखी आटोपशीर ठरला असता. पूर्वार्ध संपेपर्यंत काहीच घडत नाही. उत्तरार्धातही अगदी शेवटी शेवटी हिरो आपला बेत गावक ऱ्यांच्या मदतीने तडीस नेतो तोवर चित्रपट खूप लांबला आहे. पण या आठवडय़ात काहीच नाही असे म्हणण्याएवढा हा चित्रपट नीरस ठरत नाही हेही तितकेच खरे!

चित्रपट समीक्षण – रेश्मा राईकवार

मराठीतील सर्व चित्रपट समिक्षण ( Movie-review ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-12-2017 at 10:07 IST
ताज्या बातम्या