‘झिरो’ जर हिट ठरला नाही तर कदाचित मला पुढील सहा ते दहा महिने काम मिळणार नाही, असं शाहरुख काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत म्हणाला होता. त्याच्यासारख्या सुपरस्टारच्या डोक्यात हा विचार का बरं आला असेल याचं उत्तर ‘झिरो’ पाहिल्यावर मिळतं. बॉलिवूडमध्ये एक काळ असा होता जेव्हा चित्रपट हे कथानकावर नाही तर त्यात काम करणाऱ्या हिरोच्या स्टारडमवर चालायचे, सुपरहिट व्हायचे. मात्र आता तो काळ गेला. प्रेक्षकांची आवड आता बदलत चालली आहे. प्रेक्षक हे चांगला आशय असणाऱ्या चित्रपटाच्या शोधात असतात आणि याच आशयची कमतरता ‘झिरो’मध्ये आहे.

शाहरुख, अनुष्का, कतरिना अशी तगडी स्टारकास्ट असतानाही या चित्रपटात बऊआची ‘जादू’ चालल्यासारखं वाटतं नाही. ‘झिरो’त रोमँटिक हिरो शाहरुखनं साकारलेली भूमिका ही त्यानं साकारलेल्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. शाहरूख या चित्रपटात काहीतरी वेगळं करतोय त्यामुळे चाहत्यांना त्याच्या ‘झिरो’कडून फार अपेक्षाही आहे. मात्र ‘झिरो’ हा प्रेक्षकांची पूर्णपणे निराशा करणारा चित्रपट आहे असं म्हटलं तर अजिबात चुकीचं ठरणार नाही. पण शाहरूखनं केलेला एक वेगळा प्रयोग, हे चित्रपट पाहण्याचं एकमेव कारण नक्कीच ठरु शकतं, त्यामुळे तुम्ही शाहरुखचे ‘जबरा फॅन’ असाल तर ‘झिरो’ या एकमेव कारणासाठी तुमच्या ‘मस्ट वॉच’च्या यादीत हवाच !

Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Shani Vakri 2024
३६५ दिवस ‘या’ ४ राशींना शनिदेव करणार मालामाल? शनि जूनमध्ये वक्री अवस्थेत बलवान होताच होऊ शकतात लखपती
Budh Vakri 2024
आजपासून ‘या’ ५ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? बुधदेवाच्या कृपेने उत्पन्नात होऊ शकते प्रचंड वाढ
Chaitra Navratri 2024 From Gudhi Padwa Lakshmi Blessing These Four Zodiac Signs
चैत्र नवरात्रीपासून ‘या’ ४ राशींच्या कुंडलीत राहील माता लक्ष्मी; १ वर्ष चहूबाजूंनी कमावतील धन, आरोग्यही सुधारणार

कथानक काय
मेरठमध्ये राहणारा बऊआ सिंग म्हणजेच शाहरुख शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलाय. पण याचं दु:ख करत बसणाऱ्यापैकी तो नाही. मित्रांसोबत टावाळक्या करणं, वडिलांच्या जीवावर मज्जा करणं आणि त्याची सर्वात आवडती अभिनेत्री बबिता कुमारी (कतरिना कैफ)सोबत रोमान्स करण्याची स्वप्न रंगवणं यात ३८ वर्षांचा बऊआचं आयुष्य छान जात असतं. सारं काही सुरळीत सुरू असताना चांगल्या मुलीशी लग्न करुन संसार थाटण्याचं भूतही ४ फूट २ इंच बऊआच्या डोक्यात थैमान घालू लागतं.

कित्येक मुलींना नकार दिल्यानंतर बऊला एक मुलगी आवडते. ही मुलगी म्हणजे दिव्यांग पण अत्यंत हुशार संशोधक आफिया (अनुष्का) होय. जेमतेम दहावीपर्यंतही न शिकलेल्या बऊआला आपला जीवनसाथी म्हणून निवडण्यात आफियाला काडीमात्र रस नसतो. पण अत्यंत फिल्मी स्टाईलनं बऊआ तिच्या हृदयात जागा मिळवण्यास यशस्वी होतो. या दोघांमध्ये गोष्टी बऱ्याच पुढे जातात. कोणीतरी खोटी सहानभूती न दाखवता आपल्यावर खरंच प्रेम करतंय ही भावना हुशार आफियाला सुखावून जाते, बऊआशी लग्न करण्यास ती होकारही देते.

तर दुसरीकडे बऊआच्या जीवनात आणखी एक नाट्यमय घटना घडते. जिच्यासाठी बऊआ ठार वेडा असतो अशा बबिताचा बऊआच्या आयुष्यात प्रवेश होतो. प्रेमभंगाच्या दु:खात बुडालेली अभिनेत्री बबिता मेरठमध्ये प्रमोशनसाठी येते, तिच्या गाडीचा बऊआ पाठलाग करतो. मागे येणाऱ्या बऊआला मद्यधुंद अवस्थेत असलेली बबिता पाहते, गाडी थांबवते आणि त्याचं चुंबनही घेते. बऊआसाठी या साऱ्या गोष्टी अकल्पनीयच असतात. लग्नाच्या एक दिवस आधी या साऱ्या गोष्टी घडतात. या घटनेनं आफियाशी लग्न करण्याचा त्याचा विचार क्षणार्धात बदलतो. ‘आपलं आयुष्य कोकिळेसारखं आहे, जिला फक्त स्वच्छंदी जगणं माहिती आहे. घरटं थाटण्याचं पिल्लांचं संगोपन करण्याचं स्वप्न तिचं नसतं तसंच काही आपलंही आहे’, असं आफियाला सांगत बऊआ लग्नमंडपातून पळून जातो. अशी ही पूर्वार्धातली कथा. यातला बऊआ आपल्या अभिनयानं मन जिंकायला यशस्वी होतो. आपली भूमिका प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न करणारी आणि त्यासाठी विशेष मेहनत घेणारी अनुष्काही थेट हृदयाला भिडते. मात्र या सगळ्यात चित्रपटाचं कथानक मात्र पूर्णपणे हरवून जातं.

बऊआची गोष्ट घेऊन सुरू झालेला हा चित्रपट उत्तरार्ध सुरू होताच रटाळपणाची वाट धरतो. बऊआ मेरठहून बबिताची भेट घेण्यासाठी मुंबईत येतो. त्या एवढ्याश्या पण सर्वांहून वेगळ्या असलेल्या बऊआला मनोरंजनासाठी बबिता ठेवून घेते, मात्र बोट दिलं की हात पकडायला जाणाऱ्या बऊआची वृत्ती पाहून बबिता लाथ मारून त्याला हाकलवून देते आणि इथेच बऊआला जाणीव होते खऱ्या प्रेमाची. आफियावरच्या प्रेमाची. मग काय बऊआ मुंबईवरुन थेट अमेरिका गाठतो.

तिथे आफिया मंगळ मोहिमेच्या स्वत:च्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असते. बऊआ पुन्हा फिल्मी स्टाईलनं तिला पटवण्याचा प्रयत्न करतो मात्र प्रेमभंगाची जखम ताजी असलेली आफिया त्याला उभंही करत नाही. तिथेच आपल्याला एक मुलगी असल्याचं बऊआला समजतं. मग तिच्याच मंगळयान मोहिमेत स्वत:चं योगदान देण्याचं दहावीही न शिकलेला बऊआ ठरवतो. अत्यंत प्रतिष्ठित अंतराळ संस्थेत बऊआ जातो, तिथल्या सगळ्या चाचण्या यशस्वी पार पाडतो आणि मंगळावर जायलाही सज्ज होतो. प्रेमापासून सुरू झालेली बऊआची गोष्ट मंगळावर कधी जाऊनही पोहोचते हेच कळत नाही. कथानकातला हा गोंधळ पचायला खूपच जड जातो, चित्रपटाची कहाणी नेमकी काय होती आणि दिग्दर्शक आनंद एल. राय यांना काय सांगायचे होते हे दोन प्रश्न डोक्यात ठेऊनच प्रेक्षक सिनेमागृहाबाहेर पडतो. कितीही विचार केला तरी उत्तर ‘झिरो’च असं काहीसं होतं.

ट्रेलरमध्ये जितकी उत्सुकता हा चित्रपट पाहण्याबद्दल असते तितकाच भ्रमनिरास चित्रपट पाहिल्यावर होतो. शारीरिक व्यंग घेऊन जन्मलेल्या या बऊआकडे चक्क आकाशातले तारे पाडण्याची अनोखी जादूही असते हे तर अगदीच अकल्पनीय. रोमान्स, प्रेमभंग, मसाला, कल्पना, जादू या सगळ्याचं ‘कॉकटेल’ असलेला ‘झिरो’ बेचव कथानकामुळे सर्वच गोष्टींची मज्जा घालवतो अन् अपेक्षेचा फुगा फुटून पुन्हा ‘झिरो’च शिल्लक राहतो.

अनुष्का, कतरिना, शाहरुखच्या त्रिकुटाबरोबरच आर. माधवन, अभय देओल, श्रीदेवी, आलिया, दीपिका, सलमान खान, करिष्मा कपूर, जुई चावला असे बडे कलाकार पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसले आहेत. पण, तगडी स्टारकास्ट आणि तिन्ही कलाकारांनी जीव ओतून केलेली मेहनत या साऱ्या गोष्टी भरकटलेल्या कथानकामुळे खूपच गौण वाटू लागतात. एकंदरितच काय तर ‘झिरो’ पाहण्यासाठी ‘झिरो अपेक्षा’ ठवून गेलं तर सोयीस्कर ठरेल असाच रिव्ह्यू एका वाक्यात सांगता येईल.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com