खेळाडूंच्या आयुष्यावर साकारण्यात आलेल्या चित्रपटांना नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळते. त्यातच आता आणखी एका चित्रपटाची भर पडली आहे. तो चित्रपट म्हणजे शाद अली दिग्दर्शित ‘सूरमा’. दिलजीत दोसांज, तापसी पन्नू, अंदग बेदी यांच्या महत्त्वाच्या भूमिका असणारा हा चित्रपट हॉकी या खेळातील एका अशा ताऱ्याविषयी सांगून जातो, ज्याविषयी फार कमीजणांना माहिती असेल. मुळात फार कमीजणांना माहित असणं ही एक शोकांतिकाच आहे. पण, तरीही शाद अलीच्या प्रयत्नांना यात यश आलं आहे हे मात्र तितकंच खरं.

हॉकीपटू संदीप सिंगच्या कारकिर्दीतील चढउतार आणि त्याच्या वाट्याला आलेल्या यशाभोवती ‘सूरमा’चं कथानक फिरतं. यामध्ये त्याच्या आयुष्यात आलेला प्रेमाचा बहर आणि त्याच प्रेमामुळे संदीपच्या आयुष्याला मिळालेली कलाटणी या साऱ्यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. ऐन तारुण्यात हॉकी या खेळाकडे फक्त आणि फक्त एक खेळ म्हणून पाहणारा संदीप (दिलजीत दोसांज) हरप्रीतच्या (तापसी पन्नू)च्या प्रेमात पडतो. त्यानंतर याच प्रेमाखातर तो हॉकीकडेही गांभीर्याने पाहू लागतो. हरप्रीतच त्याच्याच दडलेल्या खेळाडूला खऱ्या अर्थाने ओळखते आणि त्याच्या कौशल्याला आणखी खुलवून आणते. पुढे जाऊन हॉकीसाठी संदीप सर्वस्व पणाला लावतो.
‘सूरमा’ घडवण्यासाठी दिग्दर्शकाने घेतलेली मेहनत चित्रपट पाहतावना लक्षात येते. त्यासोबतच त्या वेळची परिस्थिती आणि समाज या सर्व गोष्टी मांडताना त्याने बरेच बारकावेही टीपल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. दिलजीत आणि तापसीची ऑनस्क्रीन केमिस्ट्री या साऱ्यामध्ये जमेची बाजू ठरत आहे. खेळाचा आधार घेत कथानकाला भावनिक जोड देण्याची कला शादला चांगली अवगत असल्याचं ‘सूरमा’ पाहताना लक्षात येत आहे. चित्रपटात सहाय्यक कलाकार मंडळींनीही त्यांच्या भूमिकांना न्याय दिला आहे. त्यामुळे कोणाकडेही प्रेक्षकांचं दुर्लक्ष होणार नाही. ‘उडता पंजाब’ या चित्रपटातून दिलजीत दोसांजच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली होती. आपल्या अभिनयाचा आलेख तसाच उंचावत या चित्रपटासाठी त्याने घेतलेली मेहनत स्पष्टपणे दिसत आहे. रुपेरी पडद्यावर संदीप सिंग साकारणाऱ्या दिलजीत दोसांजच्या चाहत्यांचा आकडा या चित्रपटानंतर आणखी वाढेल यात वाद नाही. त्याच्या हॉकी खेळण्यापासून ते व्यक्तीरेखेचं महत्त्वं जाणून घेण्याच्या कलेकडे अजिबात दुर्लक्ष होत नाही.

तापसी पन्नूनेही तिच्या वाट्याला आलेली भूमिका अगदी चोखपणे बजावली आहे. तर, संदीपच्या मोठ्या भावाच्या भूमिकेत झळकणारा अभिनेता अंगद बेदीसुद्धा विशेष लक्ष वेधत आहे. चित्रपटाच्या संगीताविषयी सांगावं तर काही गाणी कथानकाच्या गरजेनुसार आपल्या भेटीला येतात. पण, एका खेळाडूच्या संघर्षगाथेला जोड देण्यासाठी म्हणून असणारी ही गाणी मनाचा फारसा ठाव घेत नाहीत. हॉकी या खेळात आपलं असं वेगळं अस्तित्व निर्माण करणाऱ्या संदीप सिंगच्या आयुष्य़ावर आधारित चित्रपट साकारण्यात आल्यामुळे त्याची संघर्षगाथा प्रेक्षकांपर्यंत अगदी सुरेखपणे पोहोचेल हे खरं. त्यामुळे कौटुंबिक मूल्य, देश आणि खेळाप्रती असणारं प्रेम आणि जिद्द या साऱ्या गोष्टी एकाच ठिकाणी पाहायच्या असतील तर अडथळ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘सूरमा’ हा चित्रपट नक्की पाहा.