Kaala Movie Review: ‘थलैवा’ म्हणा, ‘कबाली’ म्हणा किंवा ‘काला’ kaala. ही सर्व नावं एकाच व्यक्तीशी निगडीत आहेत. ती व्यक्ती म्हणजे सुपरस्टार रजनीकांत. आपल्या दमदार अभिनयाच्या बळावर लोकप्रियतेचं शिखर गाठणाऱ्या रजनीकांत यांचा ‘काला’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. एका कलाकाराप्रती प्रेक्षकांच्या ज्या काही भावना असतात त्या सर्व भावना लक्षात घेत त्याच अनुशंगाने दिग्दर्शक पी. रंजितने ‘काला’ हा चित्रपट साकारला आहे. एक सर्वसामान्य व्यक्ती आणि समाजातील सर्वसामान्यांप्रती असणारी जबाबदारी पार पाडण्यासाठीची त्याची धडपड ‘काला’च्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हक्काच्या भूखंडावर सर्वसामान्यांना त्यांच्या जागा मिळाल्याच पाहिजेत या एका धाग्यावर चित्रपटाचं कथानक पुढे जातं. तामिळनाडूतून मुंबईत आलेल्या जनतेचा जगण्यासाठीचा संघर्ष आणि त्यांच्या मार्गात अडथळे निर्माण करणारे राजकारणी ही नेहमीचीच कथा रजनीकांत यांच्या ‘काला’तून मांडली आहे.

मुंबईच्या धारावीमध्ये या चित्रपटाचं कथानक खुलतं आणि आकारास येतं. मुख्य म्हणजे ‘काला’ इथेच घडतो असं म्हणायला हरकत नाही. झोपडपट्टी, तिथल्या सर्वसामान्यांच्या व्यथा आणि त्यांच्या रोजच्या जगण्यामध्ये विविध मार्गांनी अडचणी निर्माण करणाऱ्या राजकारण्यांच्या कुटनितीची उदाहरणंही पीए. रंजितने दाखवली आहेत. मुख्य म्हणजे सध्याच्या सरकारच्या काही धोरणांचा आधार घेत ‘काला’मधून त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र चालवलं आहे, असं म्हणायला हरकत नाही.

Kaala Movie Review: ‘काला’ची सुरेख ओळख या चित्रपटातून करुन देण्यात आली आहे. कथानकाला त्यावेळी खऱ्या अर्थाने वेग येतो जेव्हा धारावीमध्ये त्याच्या नावाला वजन प्राप्त होतं आणि त्याच्या वाकड्यात शिरण्याची कोणाचं धाडसही होत नाही.
चित्रपटाचा पूर्वार्ध हा अस्सल अॅक्शनपटाला साजेसा, रजनीकांत पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांना हवाहवासा आहे. ज्यामध्ये भावभावनांचा खेळ, हाणामारी, चित्रपटाच्याच भाषेत म्हणायचं झालं तर ‘डायलॉगबाजी’ या साऱ्याचा मेळ साधण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे. पण, कथानकावर आणि चाहत्यांच्या मनावर असणारी दिग्दर्शकाची ही पकड उत्तरार्धात मात्र सैल पडकाना दिसते. कारण, बऱ्याच अॅक्शनपटांप्रमाणे आता पुढे काय होणार, याविषयी प्रेक्षक सहजपणे तर्क लावू शकत आहेत.

पाहा : kaala video : ‘काला’साठी चेन्नईत अशी साकारली धारावी

‘काला’चं आणखी एक आकर्षण म्हणजे अभिनेते नाना पाटेकर. नाना आणि रजनीकांत यांच्यातील दृश्य म्हणजे चाहत्यांसाठी पर्वणीच. म्हणजे अस्सल पैसा वसूल दृश्य म्हटलं तरीही वावगं ठरणार नाही. हिंदी आणि मराठी बोलणारे रजनीकांत पाहून आपल्या चेहऱ्यावरही स्मितहास्य खुलून जातं. चित्रपटातील प्रत्येक कलाकाराच्या वाट्याला आलेली भूमिका ही तितक्याच प्रभावीपणे निभावण्यात आली आहे. त्यामुळे कथानक जरी त्याच धाटणीचं वाटलं तरीही फक्त आणि फक्त ‘काला’च्या स्टारकास्टसाठी आणि रजनीकांत यांच्या आणखी एका रुपासाठी चाहत्यांनी चित्रपटगृहाची वाट धरली आहे हे खरं.