19 March 2019

News Flash

हिवाळ्यातील आहार

मूतखडा किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग हे त्यापैकीच एक आहे.

हिवाळा म्हटला की सर्दी, खोकला, संधीवात, दमा इत्यादी अनेक आजारांची यादी डोळ्यांसमोर येते, पण हिवाळा म्हटलं की हेच आजार अशी आपली धारणा असते. शिवाय दुसरे काही आजार हिवाळ्यात होऊ शकत नाही असे आपणांस वाटते. पण आहारविहारातील साध्या बाबींकडे दुर्लक्ष केल्याने हिवाळ्यात न होऊ शकणारे आजारसुद्धा आपणास त्रास देऊ शकतात.

मूतखडा किंवा मूत्रमार्गाचा संसर्ग हे त्यापैकीच एक आहे. थंड वातावरणामुळे पाणी पिण्याची भावना कमी होते. पाणी कमी प्यायले गेल्यामुळे मूत्रमार्गाच्या समस्या उद्भवतात. उन्हाळ्यात घामाद्वारे पाणी शरीराबाहेर जास्त पडल्याने पाण्याची कमतरता होते. तर हिवाळ्यात शरीराबाहेर जास्त पाणी पडत नाही, पण पाण्याचे ग्रहण कमी होते. वरील व्याधी या ऋ तूमध्ये त्रास देऊ नये म्हणून पिण्याच्या/पातळ पदार्थाचे प्रमाण वाढविणे हा एकमेव उपाय यावर आहे. पुढील उपाययोजना हिवाळ्याच्या दृष्टिकोनातून आपण करू शकतो.

  • पाणी भरपूर प्यावे. पण ते कोमट करून प्यायले तर कदाचित आपण थंडीत पिण्याच्या पाण्याचे प्रमाण वाढवू शकतो.
  • गरम सूप, गरम डाळीचे पाणी इत्यादी पदार्थाच्या जेवणात अवलंब करावा. ज्यायोगे पचनशक्तीही चांगली राहते व पातळ पदार्थ शरीराला आवश्यक प्रमाणात मिळू शकतात.
  • ताजे पदार्थ ताक, मिरपूड टाकून दुपारच्या वेळेत घेऊ शकतो. सर्दी, खोकला किंवा अ‍ॅलर्जी आदी गोष्टी ध्यानात घेऊन ताकाचे प्रमाण किंवा अंतर्भाव (आहारातील) ठरवावे.
  • पचनशक्ती चांगली असल्याने कच्च्या भाज्यांचा ज्यूससुद्धा उपयुक्त ठरतो तोसुद्धा जिरे/मीरपूड घालून घ्यावा.
  • कडधान्यांचे सूपसुद्धा लसूण, हिंग, जिरे, मिरे, घालून घेऊ शकतो किंवा मुगाचे कढण.
  • चिकन सूप-गरम असताना हळद घालून घ्यावे.
  • दूध हळद, सुंठ घालून उकळून घ्यावे.

डॉ. सारिका सातव, आहारतज्ज्ञ

dr.sarikasatav@rediffmail.com

 

First Published on December 24, 2016 12:40 am

Web Title: healthiest winter foods 2