19 October 2019

News Flash

डाळ व कडधान्ये

रोजच्या जेवणात या डाळींचेच वरण जास्त वेळा बनवावे. बाकीच्या डाळीही वापराव्यात, पण त्यांचे प्रमाण कमी असावे.

डाळी व कडधान्यांचा वापर पावसाळ्यात कशा प्रकारे करावा हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. या ऋ तूमध्ये तशी पचनशक्ती कमीच असते, त्यामुळे साहजिकच पचनास सोप्या डाळींचा वापर जास्त करावा मूगडाळ व मसूरडाळ सर्व डाळींमध्ये पचनास सोपी आहे. त्यामुळे या डाळींचा वापर पावसाळ्यात जास्त करावा. त्यायोगे पित्तपण होणार नाही व पचनाच्या तक्रारीही येत नाहीत.

रोजच्या जेवणात या डाळींचेच वरण जास्त वेळा बनवावे. बाकीच्या डाळीही वापराव्यात, पण त्यांचे प्रमाण कमी असावे. पचनाच्या तक्रारी, मंदाग्नी, बद्धकोष्ठता, गॅसेस आदी असणाऱ्यांनी हरभऱ्याच्या डाळीचा वापर कमीत कमी करावा. ज्यांना सतत पित्त होते, आंबट ढेकर येतात, छातीत जळजळ होते अशा व्यक्तींनी तुरडाळीचा वापर कमीत कमी करावा आणि ज्या वेळी करतील त्या वेळी ही डाळ आमसूल घालून शिजवावी. कोणत्याही प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर, गर्भिणी, बाळंतिणी इत्यादींनी मूगडाळीचा वापर जास्तीत जास्त करावा. लहान मुलांना सर्व डाळी तूप घालून द्याव्यात.

त्याचप्रमाणे कडधान्यांमध्येसुद्धा मूग, मसूर जास्त वापरावेत. पचनाच्या तक्रारी असणाऱ्यांनी चणे, हरभरे, छोले, मटकी इत्यादींचा वापर कमी करावा. पावसाळ्यात मूग शिजवून त्याला जिरे, तूप, लसूण, हिंग इत्यादीची फोडणी देऊन पातळसर कढण गरम गरम घ्यावे. सर्व प्रकारच्या व्यक्तींमध्ये व सर्व तक्रारींमध्ये असे कढण अतिशय उपयुक्त आहे. मसूरसुद्धा अवश्य खावे.

मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी सर्व डाळी सालीसकट खाव्यात त्याने रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यास मदत होते. तसेच सर्व कडधान्येसुद्धा खावीत, पण आपल्या पचनशक्तीनुसार डाळ, कडधान्ये तारतम्याने निवडावी.-

-डॉ. सारिका सातव,आहारतज्ञ
dr.sarikasatav@rediffmail.com

First Published on July 16, 2016 1:08 am

Web Title: lentils and pulses