‘सक्षम ती-समर्थ ती’ यामधील ‘ती’ खूप महत्त्वाची आहे. तिचा जन्माला येण्याचा प्रवास सुखकर व्हावा, तिच्या जन्माचं स्वागत व्हावं इथपासून तिचं शिक्षण, तिचं करिअर आणि तिची सामाजिक आणि आर्थिक सुरक्षितता या सगळ्या पातळीवर शासकीय यंत्रणा ही कायम तिच्याबरोबर आहे हे तिला सांगणारं, तिच्यापर्यंत पोहोचणाऱ्या साऱ्या वाटांचा परिचय करून देणारं असं एक समृद्ध व्यासपीठ हवं होतं, माहितीच्या दऱ्या मिटवणाऱ्या या सेतूची गरज ‘लोकसत्ता चतुरंग’च्या माध्यमातून काही प्रमाणात पूर्ण झाली. या निमित्ताने मुली आणि स्त्रियांसाठी असणाऱ्या शासकीय योजनांची माहिती राज्यभरातील स्त्रियांपर्यंत पोहोचवण्याची संधी मिळाल्याचे समाधान खूप मोठे आहे.

‘खूप काही तिच्यासाठी’पासून झालेली या सदराची सुरुवात नंतर विभाग आणि विषयानुसार विस्तारत गेली. ग्रामीण आणि शहरी भागातील स्त्रिया आणि मुलींसाठीचा यात सहभाग राहील, याचा विचार झाला आणि हा संवाद अधिक प्रवाही होत गेला. तिच्यासाठी शासकीय नोकरीतील असो किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण असो, शिक्षण आणि उच्च शिक्षणातील संधी असो, शिष्यवृत्त्या, हॉस्टेलची सोय असो, स्वंयरोजगारासाठी प्रशिक्षण, कौशल्यविकास आणि आर्थिक साहाय्याची उपलब्धता असो या सगळ्या गोष्टींची माहिती देताना अनेक प्रतिक्रिया आल्या. कुणी म्हणालं, आम्हाला ही माहिती एमपीएससी आणि यूपीएससीसारख्या स्पर्धात्मक परीक्षेसाठी खूप उपयुक्त ठरते आहे. कुणासाठी ‘मेरी रिक्षा सबसे निराली’ म्हणणाऱ्या रिक्षाचालक योगिता मानेंचा अनुभव प्रेरणादायी होता. संघर्षांला न घाबरता स्वयंरोजगाराची वाट चोखाळण्याची हिंमत मिळाली.

एस.टी महामंडळाच्या बसस्थानकांमधील उपाहारगृहे महिला बचतगटांना देण्याचा निर्णय झाला आणि अनेक बचतगटांतील स्त्रियांनी त्यासंबंधी विचारणा केली. स्त्रियांना ऑटोरिक्षा परवान्यांमध्ये ५ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय झाला आणि त्याचा लाभ घेत अनेक स्त्रियांनी ऑटो रिक्षा चालवण्याचं आगळंवेगळं क्षेत्र निवडून स्वयंरोजगाराची वाट स्वीकारली. ‘नियमित उत्पन्नाचे मीटर डाऊन’ या लेखानंतर आला. परिवहन विभागाने आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना ऑटो रिक्षा परवाने देण्याचा निर्णय ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना’ यातून घेतला होता. त्याचा आधार घेत मी नांदेड येथील कोंडाबाई मारोती सूर्यवंशी या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नीला मिळालेल्या ऑटो परवान्याची माहिती लेखात दिली होती. या लेखानंतर त्यांचे उत्पन्न नियमित सुरू झाले हे महत्वाचे.

‘नोकरदार नव्हे व्यावसायिक’ लेखातून मुद्रा बँक योजनेतून मिळणाऱ्या कर्जाविषयीची माहिती दिली. नाशिकच्या दीपिका शिळवणेची यशकथा यात दिली आणि प्रतिक्रियांचा पाऊस पडला. अर्थात प्रतिक्रिया संमिश्र होत्या. काहींनी कर्जासाठी अर्ज करून कर्ज मंजूर झालं नसल्याचं म्हटलं होतं तर काहींनी कर्ज मिळाल्यानंतर आपण उद्योग कसा सुरू केला हेदेखील सांगितलं. अशोक मोडक यांनी या लेखाचं स्वागत करताना या योजनांचा जास्तीत जास्त प्रभावीपणे प्रचार झाला तर अनेकांच्या जीवनात आनंदाची पहाट उगवेल, असं जेव्हा म्हटलं.

महिला आर्थिक विकास महामंडळ, उमेद अर्थात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, महिला व बालविकास विभाग, कृषी आणि पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विभाग यांसारख्या विभागांनी तर स्त्री सक्षमीकरणाची धुरा अतिशय सक्षमपणे आपल्या खांद्यावर घेतली आहे. पशुसंवर्धन विभागाच्या प्रत्येक योजनेत स्त्रियांना ३० टक्के प्राधान्य आहे. फलोत्पादन कार्यक्रमात स्त्रिया हिरिरीने पुढे येत आहेत हे ‘फलोत्पादनातून सक्षमीकरण’ या लेखानंतर दिसून आले. आधुनिक शेती करू इच्छिणाऱ्या, फलोत्पादनातून स्वंयरोजगार शोधणाऱ्या अनेक स्त्रियांनी त्यात रस दाखवला. १२ वीपर्यंत मुलींना मोफत शिक्षण आहे तर उच्चशिक्षणातही ३० टक्के आरक्षण आहे. मुलींसाठी शासकीय वसतिगृहे राज्यात स्थापन करण्यात आली आहेत. ‘माझी कन्या भाग्यश्री’च्या माध्यमातून जन्माला येणाऱ्या मुलीचं स्वागत करताना तिला आर्थिक आणि सामाजिक सुरक्षितता दिली जात आहे. महाराष्ट्रात १२५ तालुक्यात ‘महाराष्ट्र मानव विकास मिशन’ काम करत आहे. या मिशनमार्फत स्त्रिया आणि मुलींसाठी अनेक योजना राबविल्या जातात. या सर्व विषयांचा ऊहापोह विविध लेखांमधून घेतल्यानंतर अनेक प्रतिक्रिया आल्या. ‘पर्यटनातून रोजगार’ हा वन विभागाच्या होम स्टे संकल्पनेवरील आधारित लेख वाचून आमचं ही घर पर्यटनस्थळाजवळ आहे, आम्ही ते या योजनेत कसं नोंदवू शकतो, अशी विचारणा झाली. ‘सामाजिक सुरक्षिततेसाठी विमा’ या लेखात पंतप्रधान सुरक्षा विमा योजना, जीवनज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजनेची माहिती दिली, ती अनेकांनी इतरांपर्यंत पोहोचवली.

कौशल्य विकासातून रोजगार संधी याची माहिती देताना शासन, यूएनडीपीच्या सहकार्यातून राज्यात राबविल्या जाणाऱ्या ‘दिशा’ प्रकल्पाची माहिती दिली. त्याचा उपयोग निश्चितच झाला. ठाण्याचे जयेंद्र कुलकर्णी यांनी स्त्रियांचे शिक्षण आणि कौशल्यविकास यावर आपण काम करत असून स्त्रिया आणि मुलींच्या योजनांविषयी आणखी माहिती देण्याबाबत विनंती केली. काहींनी शिष्यवृत्ती कशी मिळवता येईल, वसतिगृहात प्रवेश मिळवायचा तर कुणाशी संपर्क करायचा अशी विचारणा केली.

आदिवासी पाडय़ांमध्ये मुलांच्या शिक्षणासाठी आणि आरोग्यासाठी काम करणाऱ्या दीपक कदम यांनी आदिवासी बांधवांसाठी असणाऱ्या योजनांची माहिती देण्याची विनंती केली.  मला वाटतं ‘सक्षम मी समर्थ मी’ या सदराचं यशच या प्रतिक्रिया आणि संवादातून स्पष्ट झालं आहे. गरजवंत स्त्रिया आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या स्वंयसेवी संस्थांपर्यंत शासकीय योजनांची माहिती पोहोचवण्यात या सदराचे मोठे योगदान आहे. फक्त शासकीय मदत घेताना येणाऱ्या अडचणीही शासकीय पातळीवरूनच दूर होऊन त्याचा लाभ जास्तीत जास्त स्त्रियांना विनासायास व्हावा, असे वाटते.

या पूर्ण लेखमालेतून प्रकाशाचे कवडसे घेत कुणाच्या प्रयत्नांना यशाचे तेज मिळाले असेल, कुणाचं आयुष्य उभं राहिलं, कुणाच्या सावरण्याच्या प्रयत्नांना यश मिळालं असेल तर त्याचं सारं श्रेय या सदराला आहे. आज या लेखमालेतील हा शेवटचा लेख असला तरी स्त्री सक्षमीकरणाचा- संरक्षणाचा विचार प्रचंड सामर्थ्यांने यानंतरही अधिक गतीने पुढे जावा. एवढीच अपेक्षा.

डॉ. सुरेखा मुळे

drsurekha.mulay@gmail.com

(सदर समाप्त )