03 June 2020

News Flash

स्त्रीप्रश्नाच्या चर्चेची सुरुवात..

युरोपीय सभ्यतेचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या  योजनेचा भाग म्हणून वसाहतवाद्यांनी स्त्री-प्रश्नाची चर्चा केली

संग्रहित छायाचित्र

 

उमेश बगाडे

स्त्रीप्रश्नाच्या चर्चेवर पाश्चात्त्य प्रभाव होता हे खरे आणि वगरेन्नतीची जाणीव त्यामागे होती हेही ठीक, परंतु जातिसुधारणेच्या चौकटीत किंवा राष्ट्रवादाच्या परिघात राहूनच भारतीय, महाराष्ट्रीय स्त्रियांच्या प्रश्नांची चर्चा सुरू झाली आणि तिलाही शास्त्रार्थाचा आधार शोधण्यात पहिली काही वर्षे खर्च झाली..

युरोपीय सभ्यतेचे प्रभुत्व प्रस्थापित करण्याच्या  योजनेचा भाग म्हणून वसाहतवाद्यांनी स्त्री-प्रश्नाची चर्चा केली. हिंदू धर्मशास्त्रे, प्रथा व परंपरा यांची कठोर चिकित्सा करत स्त्रियांवर होत असलेल्या अन्याय व अत्याचाराचे विवरण त्यांनी केले. त्यांनी हिंदू धर्माला असंस्कृत व मागास ठरवले. स्वस्त्रियांना उदार आश्रय व सुरक्षितता देऊ न शकणाऱ्या हिंदू पुरुषांवर दुबळेपणाचा आरोप त्यांनी केला. त्या तुलनेत ब्रिटिश राजवट आणि ख्रिश्चन धर्म यांची स्त्रियांसंबंधातली उदारता त्यांनी अधोरेखित केली.

वसाहतवादाने सुरू केलेल्या या लिंगभावात्मक राजकारणाला प्रतिसाद म्हणून इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींनी स्त्रीसुधारणेच्या प्रश्नाला हात घातला. त्यांनी ब्राह्मण व तत्सम उच्च जातींच्या आत्मतत्त्वाचे जडत्व स्वीकारून जाती-सुधारणेच्या चाकोरीत, वैदिक परंपरेत शक्य होईल त्या कुटुंबसुधारणा करण्याची भूमिका घेतली. वसाहतवादी चिकित्सेचा प्रतिवाद करण्याच्या क्रमात राष्ट्रवादी तत्त्वचौकट स्त्रीसुधारणेमागे कार्य करत राहिली. १८४१ च्या ‘ओरिएण्टल ख्रिश्चन स्पेक्टेटर’मध्ये स्त्री-शिक्षणाचा पुरस्कार करणारा दादोबा पांडुरंग तर्खडकरांनी लिहिलेला लेख त्याची साक्ष देतो. या लेखात दादोबांनी स्त्रीसुधारणांची राष्ट्रीय पुनरुत्थानाशी सांगड घातली. भारतविद्येच्या ज्ञानमीमांसेच्या आधारे प्राचीन काळाची प्रबुद्ध व विकसित अशी प्रतिमा त्यांनी उभी करून त्याआधारे स्त्रियांची स्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले. पुढे मुस्लीम आक्रमणानंतर स्त्रियांना बंदिस्त करणाऱ्या रूढींचा प्रसार होऊन स्त्रियांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाल्याचे सांगितले. स्त्री-शिक्षणाचा अभाव भारताच्या ऱ्हासाला कारणीभूत असल्याचे सांगत राष्ट्रीय अस्मितेच्या चौकटीत स्त्रीसुधारणांचे प्रवर्तन त्यांनी केले.

वर्गोन्नती आणि स्त्री-सुधारणा

स्त्री-सुधारणेमागे मुख्यत: वर्गोन्नतीची प्रेरणा काम करत होती. पाश्चात्त्य वर्गसमाजातील शिक्षित आधुनिक स्त्री, पती-पत्नीला खुलेपणा देणारे गृहविश्व आणि विभक्त कुटुंबपद्धती यांचे आकर्षण ती निर्माण करत होती. त्याचे प्रतिबिंब स्त्री-सुधारणांचा पुरस्कार करणाऱ्या ‘दर्पण’मधील १८३७ च्या लेखामध्ये आढळते. ‘परुशुरामक्षेत्रस्थ ब्राह्मण’ या टोपण नावाने लिहिलेल्या लेखात युरोपीय व भारतीय स्त्रीची तुलना करण्यात आली.  शिक्षित युरोपीय स्त्रीला हंसिनी, तर अशिक्षित भारतीय स्त्रीला बकिनी (बगळी) ठरवून स्त्री शिक्षणाचे महत्त्व त्यात प्रतिपादण्यात आले. नवशिक्षितांमध्ये निर्माण झालेले आधुनिक स्त्रीचे आकर्षण वर्गोन्नतीच्या दिशने वाटचाल करू लागले होते, हेच या लेखातून स्पष्ट होते.

वर्गोन्नती जातीच्याच पायाने साध्य केली जात असल्याने स्त्री-शिक्षण, विधवा पुनर्विवाह यांसारख्या सुधारणाही जाती-सुधारणेच्या वाटेने जात राहिल्या. विधवाविवाह प्रतिबंधाची रूढी जातिश्रेष्ठत्वाचे निदर्शक बनून मुख्यत: ब्राह्मण जातींमध्ये पाळली जात होती. म्हणून ब्राह्मण जातीच्या शुद्धतेला या रूढीमुळे बाधा निर्माण होत असल्याचा तर्क नवशिक्षितांनी पुढे केला. ‘परुशुरामक्षेत्रस्थ ब्राह्मणा’ने आपल्या लेखात ब्राह्मण जातीला काळिमा फासणाऱ्या बालविधवांच्या दुराचाराचे कारण समूळ नाहीसे करण्यासाठी पतीशी संबध न आलेल्या विधवेचा पुनर्विवाह करण्याचा मार्ग पुरस्कारला.

जातीसुधारणेचा पाश

जाती सुधारणेच्या कक्षेत स्त्री-प्रश्नाची मांडणी करण्याच्या संकटामुळे ब्राह्मण जातीच्या पारंपरिक विचार पद्धतीचे सातत्य कायम राहिले. शास्त्रार्थ करण्याचा पारंपरिक मार्ग नवशिक्षितांनी स्त्री- सुधारणांचा पुरस्कार करण्यासाठी अवलंबला. वर्ण-जात-लिंगभावाच्या उतरंडीला सांभाळणाऱ्या शुद्धीच्या तर्कशास्त्राचा त्यांनी त्यांच्या युक्तिवादात मोठय़ा प्रमाणात उपयोग केला.

ब्राह्मणी पितृसत्तेने घडवलेली पातिव्रत्याचा आत्यंतिक आदर्श सांगणारी स्त्रीधर्माची कल्पना, स्त्रियांना दुर्गुणी ठरवणारी स्त्री-स्वभावाची कल्पना व स्त्रीला व्यभिचारी ठरवणारी ‘स्त्रीचरित’ ही संकल्पना या तिन्हींचा उपयोग त्यांनी स्त्री-सुधारणेच्या युक्तिवादात केला. स्त्रियांचे उत्तमा, मध्यमा व अधमा असे तीन प्रकार करून उत्तमा व मध्यमा प्रकारच्या स्त्रीला पातिव्रत्याचे शिक्षण देण्यासाठी स्त्री-शिक्षण गरजेचे असल्याचा युक्तिवाद तैलंग ब्राह्मणाने ‘दर्पण’मधील लेखात केला. त्यानेच स्त्रियांच्या कामी स्वभावावर नियंत्रण करण्यासाठी विधवाविवाह गरजेचा असल्याचा युक्तिवादही पेश केला.

जातीसुधारणेच्या मार्गाने शक्य होईल त्या सुधारणा करण्याच्या सुधारकांच्या भूमिकेमुळे आधुनिकतेची वाट अवरुद्ध होत राहिली. स्त्री-पुरुष समानतेची आणि स्त्रियांच्या मानवी अधिकारांची जाण त्यांच्या विचारातून प्रगट झाली खरी; पण पारंपरिक विचारपद्धतीच्या जंजाळात अडकल्याने त्याचा पाठपुरावा करणे त्यांनी सोडून दिले. ‘ईश्वराने ही पृथ्वी स्त्री-पुरुषांना समान रीतीने उपभोगण्यासाठी निर्माण केली आहे,’ या थॉमस पेन यांच्या उक्तीचा प्रतिध्वनी लोकहितवादींच्या लेखनात आढळत असला, तरी त्याचा व्यवहार पुढे नेण्याची कल्पना मात्र दिसत नाही.

सुधारणा हव्यात, पण..

जातीची पारंपरिकतेच्या साहाय्याने वर्गीय आधुनिकता प्राप्त करण्याचा तिढा नवशिक्षितांमध्ये तार्किक गोंधळाची स्थिती निर्माण करत होता. त्याचे स्पष्टीकरण बाळकृष्ण लक्ष्मण बापट यांच्या ‘विधवाविवाहखंडन’ या ग्रंथात पाहायला मिळते. त्यात त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा पुनर्विवाहाच्या युक्तिवादाचे खंडन करणारे युक्तिवाद पेश केले आहेत.  नवरा असताना स्त्रिया व्यभिचार करतात त्याविषयी काय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित करून- विधवाविवाहाने व्यभिचार, गर्भपात, आदी अनर्थ दूर होतील, या सुधारकांच्या युक्तिवादाचे त्यांनी खंडन केले आहे. विद्यासागर अनुकूल तेवढेच शास्त्रार्थ मान्य करतात; शिवाय त्यांनी लावलेले शास्त्राचे अर्थही संशयास्पद आहेत, अशी टीका त्यांनी केली आहे. अनादी रूढी बदलणे मूर्खपणाचे आहे; शास्त्राचे प्रमाण सुधारणेसाठी देणे निष्फळ होय, असा अभिप्राय त्यांनी व्यक्त केला आहे.

मात्र, बापट सुधारणाविरोधी नव्हते. त्यांना विधवाविवाहाची सुधारणा हवी होती. परंतु  आधी बालविवाहाची चाल बंद झाली पाहिजे, घटस्फोट स्वयंवर, एकपत्नी पद्धती अशा सुधारणा झाल्या पाहिजेत, असे ते म्हणतात. त्यांच्या मते, सुधारक ज्या न्यायाने व युक्तीने सुधारणा करू पाहत आहेत ते न्याय व युक्ती सर्वथैव अयोग्य व निर्जीव झालेल्या आहेत. श्रुतीस्मृती सर्व घरी बांधून ठेवून ‘मन:पूतसमाचरेत्’ या जोरावर जे आपणास यथान्याय दिसते त्या सुधारणा कार्यास आरंभ करावा, असे त्यांचे म्हणणे आहे.

विधवा पुनर्विवाह व स्त्री-शिक्षणाच्या क्षेत्रात नवशिक्षित पुरुषांचे कर्तेपण सर्वात अधिक कार्यरत राहिले. विष्णुशास्त्री पंडितांपासून महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्यापर्यंत अनेकांनी या कामी आयुष्यभर खटपट केली. स्त्री-सुधारणेच्या कार्यातील पुरुषांची कृतिशीलता स्त्रियांना दुय्यम अशा अनुसरण करण्याच्या भूमिकेतच ठेवत असल्यामुळे सुधारक कर्त्यां पुरुषांकडून आपल्या पत्नीला शिकवण्याच्या प्रयत्नात जुलूम होत राहिला. रमाबाई रानडे आणि आनंदीबाई जोशी यांच्या आठवणींमध्ये याची नोंद आढळते.

नवशिक्षितांच्या जात-वर्गीय अधिवासामध्ये शिक्षित गृहिणीची गरज असल्यामुळे स्त्री-शिक्षणाला गृहिणीकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले. मुलांचे पालनपोषण, पती व त्याच्या कुटुंबाची सेवा, पैपाहुण्यांचा सांभाळ, स्वयंपाकाचे काम व घरकामाचे व्यवस्थापन, कुटुंबाचे हिशेब, नोकरांची देखरेख अशा अनेकविध जबाबदाऱ्या सांभाळणारे शिक्षण स्त्रियांना दिले जाऊ लागले. शिवणकाम, पाककला, घरगुती औषधोपचार अशा कौशल्यांचे ज्ञान दिले जाऊ लागले. त्यासाठी पाश्चात्त्य वर्गीय समाजातील गृहिणीकरणाचे पाठ अंगिकारले जाऊ लागले. अर्थातच, ब्राह्मणी पितृसत्तेने घडवलेले पतिव्रतेचे मूल्य गृहिणीकरणाच्या योजनेत केंद्रवर्ती राहिले. स्त्रियांच्या गृहिणीकरणाच्या प्रकल्पाला राष्ट्रवादी चर्चाविश्वाची साथ मिळाली. राष्ट्रासाठी लढणारे शूरवीर घडवण्यासाठी वीरमाता, राष्ट्रीय लढय़ात त्याला साथ देणारी वीरपत्नी शिक्षित असली पाहिजे, या धारणेतून स्त्री-शिक्षणाचा विस्तार होत राहिला.

स्त्री-स्वत्वाचा तत्त्वविचार

स्त्री-सुधारणेचे कर्तेपण ब्राह्मण बुद्धिजीवींनी स्वत:कडे घेतल्यामुळे पुरुषी इच्छांच्या जंजाळात स्त्री-सुधारणाविचार अडकला. त्यामुळे स्त्रियांच्या वाटय़ाला अंकित स्वत्वाची भूमिका आली आणि स्त्री-स्वातंत्र्याचे भान खुरटलेले  राहिले. या पुरुषकेंद्री सुधारणाविचारात ना धर्म व परंपरेच्या चिकित्सेची मूलगामी दृष्टी होती, ना ब्राह्मणी पितृसत्तेला समजून घेण्याची धडपड होती.

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात पंडिता रमाबाई व ताराबाई शिंदे यांच्या आत्मानुभवाच्या चिंतनातूनच ब्राह्मणी पितृसत्तेची कोंडी फुटली. दोघींनीही स्त्रियांना गुलाम करणाऱ्या ब्राह्मणी चर्चाविश्वाचा वेध घेतला. पुरुषधार्जिण्या धर्मशास्त्रांनी चालवलेला स्त्रियांवरील अन्याय उघड केला. स्त्रियांना अधीन करणाऱ्या सत्तासंबंधांचे, विचारपद्धतीचे खंडन केले. स्त्रियांच्या अधिकाराची बंडखोरी जाहीर करून त्यांनी स्त्रियांच्या कर्तेपणाला चालना दिली आणि स्त्री-मुक्तीची वाट खुली केली..

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहासाचे प्राध्यापक आहेत. ईमेल : ubagade@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2020 12:03 am

Web Title: article on beginning of the discussion of feminism abn 97
Next Stories
1 नीतीविचारांची घुसळण
2 प्लेगची साथ आणि मध्यमवर्ग
3 जातीच्या आत्मकल्पनांचा वसाहतकालीन गुंता
Just Now!
X