|| उमेश बगाडे

महाराष्ट्रात जात-वर्ग जाणिवेच्या पलीकडे जाऊन प्रबोधनाचे प्रयोग झाले; परंतु वैचारिकता आणि समाजाची घडण यांचे नाते दुपेडी असते. विचारांतला बदल पाहायचा, तर समाजातला बदलही पाहावाच लागेल आणि समाजातील बदलांच्या अभ्यासानंतर वैचारिक बदल जोखून पाहता येईल. त्यासाठीच हे नवे पाक्षिक सदर..

Construction of Ram temple is due to Narendra Modi Raj Thackeray role
मोदींमुळेच राम मंदिराची उभारणी, राज ठाकरे यांची भूमिका ; मनसे महायुतीच्या प्रचारात
What Raj Thackeray Said About Sanjay Raut?
राज ठाकरेंचा संजय राऊतांना टोला, “कावीळ झालेल्यांना जग पिवळं दिसतं, आत्ताच तुरुंगातून..”
MP Supriya Sule criticized the leaders who left NCP
“रिश्ता तोडना आसान है, निभाना मुश्किल है…” राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर खासदार सुप्रिया सुळेंची घणाघाती टीका
election material making work increase due to parties splits
पक्षफुटींमुळे प्रचार साहित्याला ‘अच्छे दिन’; झेंडे, टोप्या, फेटे निर्मितीस सुरुवात, चिन्हे जास्त असल्याने कामात वाढ

 

वासाहतिक आधुनिकतेमुळे बाह्य़ विश्वाकडे पाहण्याची आणि स्वत:च्या आत्मस्थितीकडे पाहण्याची महाराष्ट्रीय समाजाची नजर बदलली. इतिहासाचे काही अभ्यासक त्याला ‘प्रमाणशास्त्रीय खंड’ (एपिस्टेमॉलॉजिकल ब्रेक) म्हणतात. महाराष्ट्राच्या विचारविश्वामध्ये त्यामुळे मोठी घुसळण सुरू होऊन प्रबोधनपर्वाला सुरुवात झाली.

वासाहतिक प्रभावातून सुरू झालेल्या सामाजिक स्थित्यंतरातूनच नव्या विचारांचे पाऊल पुढे पडले. ब्रिटिश राजवटीच्या राजकीय, प्रशासकीय आर्थिक गरजेतून नव्या मध्यमवर्गाचा उदय झाला. तो गुंतागुंतीच्या सामाजिक ताण्याबाण्यात आकाराला आला. वर्ग ही संस्था प्राय: संपत्ती, मिळकत, व्यवसाय, शिक्षण या आधारावर सामाजिक स्तरीकरण घडवते. तिची अनेक वैशिष्टय़े जातिसंस्थेच्या विरोधी असतात. वर्ग हे खुले व समावेशक असतात. त्यात नव्या सभासदाला त्यात प्रवेश मिळू शकतो. जात ही बंदिस्त असते; जातीत बाहेरच्यांना प्रवेश नसतो. असा विरोधाभास असला तरी आपल्याकडे वर्ग जातिव्यवस्थेच्या प्रभावातच घडले आणि जातीजातींमधील तणावपूर्ण संबंधातच वाढले. त्यामुळे इथल्या मध्यमवर्गाला निखळ वर्गाचे स्वरूप प्राप्त होऊ शकले नाही. जातीचे आंतरिक स्वत्व धारण करूनच ते उदयाला आले आणि नांदले. महाराष्ट्रातील विचारमंथनाचे रूप उदय पावणाऱ्या मध्यमवर्गाच्या स्थितिगती यानुसारच आकार घेत राहिले. या पाश्र्वभूमीवर मध्यमवर्गाला घडविणारी महाराष्ट्रातील समाजप्रक्रिया समजून घेणे आवश्यक ठरते.

मध्यमवर्गाचा उदय

महाराष्ट्रात वा भारतात उदय पावणारा मध्यमवर्ग हा प्राय: इंग्रजी शिक्षित बुद्धिजीवींचा होता. तो इंग्रजी शिक्षण घेतलेला, वासाहतिक प्रशासनामध्ये अधिकारी व कारकुनाच्या नोकऱ्या करणारा, प्रशासनाला साहाय्यभूत कंत्राटदार, दुभाषिक, लेखनिक अशी कामे करणारा, उद्योग व कारखान्यांमध्ये संचालक, इंजिनीयर, व्यवस्थापक, कारकून म्हणून पदे भूषवणारा आणि शिक्षक, वकील, पत्रकार असे नवे पांढरपेशे व्यवसाय करणारा हा वर्ग होता.

हा मध्यमवर्ग मुंबईत कसा उदयाला आला याचे वर्णन माडगावकरांनी ‘मुंबईचे वर्णन’ या ग्रंथात केले आहे. मध्ययुगापासून परंपरेने इंग्रज राज्यकत्रे-व्यापारी यांच्यासाठी दुभाषाचे काम करणारे सारस्वत ब्राह्मण नोकरदार व कारकुनाच्या रूपात वसाहतकाळात नवे बुद्धिजीवी म्हणून आकाराला आले. सोनारांनी सोन्याच्या व्यवसायातून स्वत:ची भरभराट केली. काहींनी पारंपरिक व्यवसायाबरोबर सावकारी करून स्वत:ची वर्गोन्नती घडवली, तर काहींनी इंग्रजी शिकून सरकारी व सावकारी कचेऱ्यांत नोकऱ्या करायला सुरुवात केली. इंग्रजी शिक्षित नोकरदार बनण्यात पाठारे प्रभूंनी आघाडी घेतली होती. त्याशिवाय व्यापारी जातीचे काही लोकही इंग्रजी शिकून बुद्धिजीवी मध्यमवर्गाचे भाग बनू लागले होते. ‘रेशमाचा व्यापार करणारे पंजाबमधील खत्री इंग्रजी अमदानीत मुंबईत आले, त्यांनी रेशमाच्या व्यापाराबरोबर शिंपी काम व सावकारीचे कामही सुरू केले. पण पुढे रेशमाचा व्यापार थंडावल्यावर इंग्रजीचे शिक्षण घेऊन सरकारी व सावकारी कचेऱ्यांत कारकुनी करण्यास सुरुवात केली.’

ब्राह्मण, प्रभू, सोनार, बनिया यांच्याबरोबरच पारशी, मुस्लीम अशा जाती व धर्मातूनही इंग्रजी शिक्षित नोकरदार-व्यावसायिकांचा मध्यमवर्ग मुंबईत निर्माण होत राहिला. त्यामुळे मुंबईच्या मध्यमवर्गाचे स्वरूप काही अंशी बहुधर्मी-बहुजातीय-बहुप्रांतीय (कॉस्मोपॉलिटन) असे आकार घेत राहिले. महाराष्ट्राच्या अन्य भागांत मात्र मुख्यत: ब्राह्मण व तत्सम जातीतूनच हा मध्यमवर्ग उदयाला येत राहिल्यामुळे त्याचे स्वरूप ब्राह्मणबहुल वा ब्राह्मण जातीच्या सांस्कृतिक व्यवहाराने जडावलेले राहिले. निम्न जातींमधून अपवादानेच वा कमी संख्येने शिक्षित बुद्धिजीवी उदयाला येत असल्यामुळे ब्राह्मणबहुलता हे वासाहतिक काळामधील मध्यमवर्गाचे खास वैशिष्टय़ राहिले.

जातिसंस्थेच्या विपरीत वर्गव्यवस्थेतील प्रवेश सर्वासाठी खुला असला तरी भारतात जातीच्या बंदिस्तपणाचे कुंपण वर्गव्यवस्थेवर पडत राहिले. त्यामुळे भारतातील मध्यमवर्गाच्या उदयाची व जडणघडणीची प्रक्रिया मोठी गुंतागुंतीची राहिली. मध्यमवर्गाचे स्वरूपही त्यामुळे संदिग्धतेच्या व व्यामिश्रतेच्या उंबरठय़ावर टेकलेले राहिले. परिणामी, उच्च जाती व वर्गाची लक्षणे व ओळख मध्यमवर्गात संयुक्तपणे एकमेकांना प्रभावित करत नांदत राहिली.

या काळात भारतात उदय पावणारा नवा बुद्धिजीवी मध्यमवर्ग एका आर्थिक स्तरात उभा राहताना दिसत नाही. हजारो रुपयांची प्राप्ती करणारा उच्चपदस्थ सरकारी अधिकारी आणि जेमतेम कामगाराइतका पगार घेणारा कारकून हे दोन्ही बुद्धिजीवी म्हणून स्वत:ला मध्यमवर्गात उभे करताना दिसतात. उत्पन्नाची विषमता मध्यमवर्गात स्तरभेद निर्माण करत होती. मात्र ती वर्गीय ओळखीला एकमेव आधार ठरत नव्हती. आर्थिक स्तरापेक्षा बुद्धिजीवीपण हे मध्यमवर्गाच्या ओळखीचे मध्यवर्ती लक्षण ठरत होते. समाजाचे वैचारिक, सामाजिक-सांस्कृतिक नेतृत्व करणारा बुद्धिजीवी म्हणून सर्व आर्थिक स्तरांतील पांढरपेशांमध्ये एक समूहभान व एकतेचे सूत्र नांदत होते. बुद्धिजीवी म्हणून जातीय पारंपरिकतेच्या वारशातून प्राप्त होत असलेले भान त्यांच्या मध्यमवर्गीय ओळखीला घेरून राहत होते.

महाराष्ट्रातील नवा मध्यमवर्ग प्रामुख्याने पारंपरिक बुद्धिजीवी जातींतून म्हणजे ब्राह्मण, कायस्थ व तत्सम जातींतून आला होता. वर्गाचे नवे सामाजिक रूप व वैशिष्टय़ धारण करताना त्यांच्या पारंपरिक बुद्धिजीवी म्हणून अस्तित्वात असलेल्या जातीच्या ओळखीशी, हितसंबंधाशी, वारशाशी एकवाक्यता ठेवूनच तो उभा राहिला होता. नव्या वर्गीय भूमिकेतून समाजाचे वैचारिक, सामाजिक-सांकृतिक धुरीणत्व करताना जातिप्रभुत्वाचे पारंपरिक स्थान व भान यांचा उपयोग तो करत होता. तो, भारतातील अभिजन वर्गाचा म्हणजे शहरातील भांडवलदार, व्यापारी, उच्चपदस्थ सनदी अधिकारी व ग्रामीण भागातील श्रेष्ठी जमीनदार, सावकार आणि अंमलदार यांनी बनलेल्या राजकर्त्यां वर्गाचा भाग असूनही बुद्धिजीवी या सामाजिक-सांस्कृतिक ओळखीच्या कक्षेत स्वतंत्रपणाने उभा होता. तो प्रामुख्याने नागरी ओळख घेऊन उभा राहत असला तरी ग्रामीण भागातील जुजबी इंग्रजी जाणणाऱ्या, शिक्षकी, भिक्षुकी असा पेशा करणाऱ्या, वडिलोपार्जति शेती, सावकारी करणाऱ्या शिक्षित घटकांबरोबर जात-वर्गीय एकवाक्यतेत उभा होता.

पाश्चात्य व्याख्या अपुऱ्या

बुद्धिजीवी वर्गाच्या जातीय पृष्ठभूमीमुळे निखळ आर्थिकतेच्या निकषावरची मध्यमवर्गाची व्याख्या भारताला पूर्णाशाने लागू पडत नाही. आर्थिकतेबरोबर सामाजिक-सांस्कृतिक वैशिष्टय़ांची कसोटी मध्यमवर्गाला समजून घेण्यासाठी अधिक उपयोगी ठरू शकते. मॅक्स वेबर यांनी प्रतिपादलेली ‘शिक्षण, पांढरपेशे व्यवसाय, सामाजिक दर्जा, उपभोगाची खास संस्कृती’ ही मध्यमवर्गाची वैशिष्टय़े भारतातील या नव्या मध्यमवर्गाला सर्वार्थाने लागू पडणारी आहेत.

वेबरने नमूद केलेली ही मध्यमवर्गाची वैशिष्टय़े वर्गसमाजाच्या आधीपासूनच उच्चभ्रू जातींच्या आत्मखुणा म्हणून भारतात परंपरेने अस्तित्वात होती आणि जातीच्या या आत्मखुणा नव्या बुद्धिजीवी मध्यमवर्गाची वैशिष्टय़े म्हणून प्रगट होत राहिल्या.

वेबरप्रमाणे पिरे बोर्दो यांचे सिद्धांतनही भारतातील मध्यमवर्गाचे अनन्य स्वरूप समजून घेण्यासाठी उपयोगाचे ठरते. मार्क्‍स आणि वेबरप्रमाणे आर्थिक संबंधाआधारे वा बाजार संबंधाआधारे वर्गाची व्याख्या करण्यास बोर्दो यांनी विरोध केला. सामाजिक संबंधांचे जाळे, शिक्षण, सांस्कृतिक सवयी, आर्थिक साधनसंपन्नता अशा व्यक्तीला अधिकारसंपन्न करणारे साधनस्रोत वर्गाचा आधार असल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले. व्यक्तीचे विचार, दृष्टिकोन, अभिव्यक्ती आणि कृती यांची घडण करणाऱ्या सामाजिक संदर्भाना, जीवनरीतीला, वर्तनाला संचालित करणाऱ्या सामाजिक रचनांना वर्गसीमा ठरवण्याची भूमिका बोदरे यांनी घेतली. बोर्दो सांगतात ते हे वर्गसीमेचे आधार भारतात परंपरेने जातिसीमेचे आधार म्हणून कार्य करत राहिले होते. ब्राह्मण व तत्सम जातींकडे संपत्ती, ज्ञान, सामाजिक दर्जा, संपर्क, आत्मविश्वास वगैरे साधनस्रोत होते व सामाजिक व्यवहारात स्वामित्व, शुद्धत्व, सन्मान प्रदान करणारा विचार व वर्तनशैलीचा अधिवास (हॅबिटस) त्यांच्यापाशी होता. वर्गोतद्भवाच्या प्रक्रियेत उच्चभ्रू जातीचे साधनस्रोत व अधिवास वर्गीय अस्तित्वाचा आधार बनत राहिला. या काळात, जातीय साधनस्रोतांच्या आधारे वर्गाच्या साधनस्रोतांना आत्मगत करण्याचा व त्यावर ताबेदारी ठेवण्याचा प्रयत्न झाला. त्यातून जातीच्या अस्तित्वखुणा वर्गीय ओळखीमध्ये अभिन्नपणे गुंतू लागल्या. भारतातील मध्यमवर्गाला जात-वर्गीय संमिश्रतेचे स्वरूप त्यामुळे प्राप्त होत राहिले.

जात-वर्गाची ही संमिश्रता वासाहतिक काळातील मध्यम वर्गाच्या घडणीचे मुख्य वैशिष्टय़ राहिले. जाती व वर्गाची वैशिष्टय़े, संघटन तत्त्वे, दर्जा पद्धती, सामाजिक अभिसरणाच्या पद्धती आणि त्यांचा पूरकतेचा व विरोधाचा संबंध  एकत्रितपणे मध्यमवर्गाच्या व्यवहारात प्रगट होत राहिला. एका बाजूला जातिसमाजातील इच्छा व प्रेरणांनी वर्गव्यवहाराला प्रभावित केले तर दुसऱ्या बाजूला, वर्गसमाजातील इच्छा व प्रेरणांनी जातीच्या व्यवहाराला प्रभावित केले. त्यातून जात-वर्गाच्या एकवट रूपात नव्या मध्यमवर्गाचे स्वरूप विकसित होत राहिले.

लेखक ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठा’त इतिहास विभागाचे प्रमुख आहेत. ईमेल : ubagade@gmail.com