मराठी साहित्यविश्वातील वर्तमान स्थिती-गतीची, घटना-घडामोडींची आस्थेने अन् आस्वादक चिकित्सा करणारे सदर..

काळाचा एकूण विचार केला तर एक वर्ष म्हणजे काहीच नाही तसं फार मोठं. भिंतीवर फडफडणाऱ्या कॅलेंडरचं एक पान उलटतं.. किंवा कॅलेंडरच बदलतं खरं तर. वर्षांचं नाव, आकडा बदलतो. तरीही एक उत्साह आणतंच प्रत्येक वर्ष येताना आपल्यासोबत. प्रत्येक वर्षांच्या प्रारंभी किंवा अखेरीस जवळपास सारेच जण करतात काही ना काही संकल्प. कोऱ्या करकरीत डायरीत सुरुवातीच्या उत्साहात नोंदवलेही जातात ते सुबक नोंदींच्या स्वरूपात. काल रात्री सरत्या वर्षांचं कॅलेंडर बदललंय. नवं कॅलेंडर भिंतीवर झळकू लागलंय आजपासून. तर मग तुम्ही काही ना काही संकल्प केलाच असेल. डायरीत नोंदवलाच असेल तो. किंवा मग आज, उद्या नोंदवणार असाल ते..

loksatta readers reactions loksatta readers opinions loksatta readers response
लोकमानस : श्रमिक ऊर्जा भांडवलाइतकीच महत्त्वाची
special helmets for soldiers
कुतूहल : सैनिकांसाठी खास हेल्मेट..
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
loksatta kutuhal artificial intelligence introduction of computer vision
कुतूहल : संगणकीय दृष्टी म्हणजे काय?

सकाळी जागे होण्यापासून ते रात्री झोपण्यासाठी पाठ टेकण्यापर्यंतच्या काळातील कुठल्या कुठल्या गोष्टींना धरून असतील ते संकल्प. तर मग इथे एक साधा प्रश्न.. रोज काही वाचण्याचा संकल्प केलाय तुम्ही यंदा?

कशासाठी वाचायचं? तर, या प्रश्नाचं उत्तर हुडकायचा प्रयत्न करू या. त्यासाठी एकदम गुगलवर जाल तर इंग्रजीतली वाचक, लेखक यांची अगदी तय्यार उद्धृते मिळतीलच. आणि मराठीत शोधण्याचा प्रयत्न कराल तर विविध वर्तमानपत्रांत ‘आम्ही काय आणि का वाचतो,’ यावर विविध क्षेत्रांतील लोकांच्या लेखवजा प्रतिक्रिया येत असतात, त्या मिळतील. एका मर्यादेपर्यंत हे गुगलबोली, वर्तमानपत्री लिखाण ठीक आहे. पण त्यापल्याड विचार करायचा तर तो आपला आपल्याला, तुमचा तुम्हाला करावा लागेल वाचनाबाबतचा. वाचन म्हणजे त्यात सगळं काही आलं. कथा, कादंबरी, कविता, नाटक, समीक्षा, वैचारिक, आत्मचरित्र, वैज्ञानिक, ललित लेख, सामाजिक विषयांवरील लिखाण.. यापैकी वा यापल्याडचंही काही.. इंटरनेटवरील ब्लॉग वगैरे वगैरे.. आता हा एवढा पसारा, एवढं बाड आपल्या पुढय़ात. या बाडातील शब्दांचे दोन भाग करता येतील. त्यातील एका भागातील शब्द आपण जे म्हणतोय तेच म्हणणारे. आपल्याला परिचित असलेलेच अर्थ समोर मांडणारे. आता आपण जे म्हणतोय तेच जे शब्द आपल्याला सांगतायत ते का वाचायचे? तर आपल्या म्हणण्याला, आपल्यालाही न दिसलेलं अंग असू शकतं, हे कळण्यासाठी. अर्थ जेवढा आपल्याला कळलाय त्याही पलीकडे असतो, असू शकतो, याचं भान येण्यासाठी. आणि या बाडातील दुसऱ्या भागातील शब्द आपल्याला अपरिचित असलेले. आपल्याला माहीत नाही असं काही सांगणारे. निदान त्याकडे अंगुलिनिर्देश करणारे. यातील हा दुसरा भाग खूपच मोठा आणि मोलाचा. कारण तो थेट आपल्या आयुष्याशी, जगण्याशी निगडित असलेला. पुस्तकं ही आपल्याकडे जीवनावश्यक वस्तू नाहीत अजून. म्हणजे संप वगैरे, बंदबिंदच्या काळात पाणी, वीज, औषधे आदी वस्तू, सेवा वगळतात त्यातून; तसं अद्याप पुस्तकांचं झालेलं नाही. बंदच्या काळात पुस्तकांची दुकानं, वाचनालयं यांना सूट नसते. संपाच्या काळात त्यांनाही टाळंच असतं लागलेलं. पुस्तकं जीवनावश्यक वस्तू असतील-नसतील, पण जगण्यास बिलगून असलेली नक्कीच आहेत. निदान असायला हवीत. आपण माणसं केवळ वाऱ्या-हवेवर, खाण्यापिण्यावर, मौजमजेवर जगत नाही. आंतरिक सुख, आंतरिक समृद्धी नावाचा एक प्रकार आपल्या जगण्यासाठी आवश्यक. आपल्या जगण्याची प्रतवारी उंचावण्यात त्याचा हातभार मोठा. ही आंतरिक समृद्धी येणार कशी, जगण्याची प्रतवारी उंचावणार कशी; तर त्यासाठी असंख्य मार्ग आहेत. वाचन हा त्यातील एक सहज हाताशी असलेला हुकमी मार्ग. तंत्रज्ञानाने भोवताल आमूलाग्र बदलून टाकलेला असताना तर हा मार्ग अधिकच सोपा, सुलभ झालेला. शब्द हाताशी असण्याच्या शक्यतांमध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली.

काय करू शकतात हे हाती असलेले शब्द?

परीघ वाढवू शकतात आपल्या आयुष्याचा. खोली वाढवू शकतात आपल्या आयुष्याची. आपल्या आयुष्याचा परीघ किती? तर आपल्याच दिवस-रात्रीएवढा. २४ तासांच्या या काळात जे घडणार त्याबाहेर जाणं तसं आपल्याला कठीणच. हा मर्यादित परीघ भेदायचा असेल तर आपल्या वर्तुळाबाहेर नजर टाकायला हवी. ती नजर टाकण्याएवढी सवड असेल आणि त्याने नजर सजग, शहाणी होणार असेल तर प्रश्नच नाही. मात्र, तेवढी सवड नसेल तर वर्तुळ भेदण्यासाठी साहित्यासारखा उत्तम आधार नाही.

तर, या विधानाच्या वळणावर आपण वळू या आपल्या मराठीकडे.

आपल्या महाराष्ट्राची लोकसंख्या १३ कोटींपेक्षा अधिक. त्यातील मराठी बोलणाऱ्यांची संख्या आठ-साडेआठ कोटीच्या आसपास. महाराष्ट्रातील साक्षरतेचं प्रमाण ८३ टक्कय़ांच्या आसपास. म्हणजे आपल्या देशातील काही राज्यं वगळता हे प्रमाण खूपच बरं असं म्हणायला हवं. आता हे सगळेच साक्षर लोक रोज काही ना काही वाचतात, असल्या भलत्या भ्रमात नाही आपण. जे कुणी वाचणारे आहेत त्यांच्यासाठी लिहिण्याची परंपरा मराठीत कधी सुरू झाली? कर्नाटकमधील श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या भव्य प्रतिमेखाली कोरलेली ‘श्री चामुंडराजे करवियले..’ ही ओळ बहुतांच्या मते मराठीतील पहिली लिखित ओळ मानली जाते. आपल्या मराठी भाषेच्या उत्पत्तीबाबत विविध मतप्रवाह आहेत. त्या मतप्रवाहांमुळेच मराठीच्या जन्मकाळाबद्दलही वेगवेगळे मतप्रवाह आहेत. त्याच्या खोलात जाणे हा आजचा येथील हेतू नाही; आणि यापुढेही नसेल तो तसा..

येथील हेतू असेल तो मराठीचा जन्म, मराठी साहित्याचा जन्म, त्याची जडणघडण, त्याचा विकास या बाबींचे भान ठेवून, मराठी साहित्यातील आजच्या घटितांकडे पाहणे. ही घटितं विविध प्रकारची. कोण काय लिहितंय, कोण काय वाचतंय, कोण काय बोलतंय, कुठे काय घडतंय, कुठे काय बिघडतंय, अशी. त्यावरून समासातून टिपणी होईल ती- काय लिहायला हवं, काय वाचायला हवं, काय बोलायला हवं, काय घडायला हवं, काय घडायला नको, यावर. ही ‘हवं-नको’ची भाषा ‘समासातून’ का करायची?

तर समास असतो तटस्थ; तरीही पानावरील मजकुराशी आंतरिक जवळीक राखलेला. काही लिहायचे राहिले, दुरुस्ती सुचली तर लिहिता येते समासात. एखादी गोष्ट जोडून घ्यावीशी वाटली तर खुणांच्या साह्यने तेही करण्याची मुभा देतो समास. पानावरील मजकुरातील एखादी गोष्ट ठळक करायची असेल, तर तशीही खुलावण करण्याची उदारता देतो समास. मजकुरातील एखादी गोष्ट भावली तर त्यावरही चार अक्षरं लिहिण्यास वाव देतो समास. आपल्या राज्याला, देशाला भूसीमा असल्या तरी अशा सीमा भाषेने आपल्यावर घालून घेऊ  नयेत. आजच्या काळात तर नाहीच नाही. त्यामुळे शेजारीपाजारी राज्यांतील भाषांची, साहित्याची घसट होणारच, आणि होतेच आहे आपल्या मराठीशी. तशीच ती होणार परदेशांतील भाषांचीही, तेथील साहित्याचीही. दोन जण शेजारी शेजारी उभे राहिले की कुणाची उंची किती आहे, कोण धडधाकट आहे, कोणाचा रुबाब अधिक आहे, हे दिसतेच नजरेला. आपसूक तुलना होतेच त्यांची. तर, प्रसंगपरत्वे तीही होईलच ‘समासातून’!

पण या समासातील नोंदी वाचण्याआधी ज्या पानावर त्या नोंदी आहेत, त्या मुळातून वाचायला हव्यात आधी.

त्यासाठीच एक आर्जवी सांगणे आजच्या दिवसाचे औचित्य साधून.. वाचते व्हा. वाचते असाल तर अधिक वाचते व्हा.. वाचते राहा..

राजीव काळे rajiv.kale@expressindia.com