13 August 2020

News Flash

दिसणे आणि पाहणे

डोळे सर्वानाच असतात; नजर फार कमी जणांना असते.

डोळे सर्वानाच असतात; नजर फार कमी जणांना असते. त्यातही पाहण्याची प्रक्रिया ही जाणीवपूर्वक करावी लागते.

डोळे उघडले की, समोर असलेल्या गोष्टी आपल्याला दिसू लागतात. पण गोष्टी जाणवण्यासाठी त्या पाहाव्या लागतात. म्हणूनच तर म्हणतात की, डोळे सर्वानाच असतात; नजर फार कमी जणांना असते. त्यातही पाहण्याची प्रक्रिया ही जाणीवपूर्वक केलेली असते. दिसणे आणि पाहणे यातील फरक जाणवून देणारे आणि आपण वेगळ्या नजरेने पाहायला शिकवणारे असे एक प्रदर्शन अलीकडेच पार पडले. हे प्रदर्शन एका दुमजली इमारतीमध्ये पार पडले. ‘दिसणे आणि पाहणे’ असेच त्याचे शीर्षक होते. वरकरणी किंवा प्रथमदर्शनी त्यात कदाचित वेगळे काहीच वाटणार नाही. असेही वाटू शकेल की, हे असे आपण आपल्या घरी किंवा एखाद्या हॉटेलमध्येही पाहातो किंवा पाहिलेले असते. यात कला ती काय? पण आपण त्यातून कलावंताला काही सूचित करावयाचे आहे काय, याचा विचार आपण सुरू करतो. अनेक गोष्टींचा म्हणजेच, गोष्टी तशा असण्याचा विचार करू लागतो. त्या तशा का आहेत याचा विचार करतो. त्या तिथेच असण्यामध्ये काही वेगळेपण आहे का किंवा त्या वास्तूशी त्यांचा संबंध आहे का याचा विचार करू लागतो.. या दुमजली इमारतीतील काही भाग हॉटेल, कॅफे किंवा निवासीही असावा असे वाटू लागते.. अर्थात  त्यावेळेस आपण नकळत कलाकृतीमध्ये शिरलेलो असतो. हेच तर समकालीन कलाकृतींचे यश असते.

एक बादली भरलेली, बहुधा आतमध्ये साबणाचे पाणी असावे कारण वरच्या बाजूस फेस दिसतो. अर्थात बादली प्रत्यक्षात असली तर तो फेस हा अ‍ॅक्रेलिक सिलिकॉनचा आहे. नंतर अशा आणखी भरलेल्या काही वस्तू तिथेच पाहायला मिळतात.. एक कचऱ्याचा डबा, एक वाडगा. या गोष्टी त्याच्या आतील गोष्टींनी भरलेल्या आहेत की, त्या वस्तूने आतील गोष्ट पकडून ठेवली आहे? दुंजा हझरेग आपल्याला विचार करायला लावतो. रॉजर्सच्या कलाकृतीबाबतही असेच काहीसे होते. बियांच्या टरफलांप्रमाणे भासमान होणाऱ्या कोशातून बाहेर आलेले असंख्य कीटक, पण बहुधा ते मृत असावेत. खोलीच्या बरोबर मधोमध आणून ठेवलेला फ्रिझर, एका बाजूला इलेक्ट्रिक किटली आणि जुना आरसादेखील. काय सुचवायचे असेल या कलावंताला? मनातल्या मनात असंबद्ध वाटेल अशा एका संवादाला सुरुवात होते. हाच तर उद्देश नसावा?

जस्टिन स्टिफन्सने काही रेखाटने केली आहेत, ती भिंतीवर टांगलेली आहेत आणि खालच्या बाजूस काही मासिके, साप्ताहिकांचे अंक असेच अस्ताव्यस्त पडलेले दिसतात, त्याच्या मुखपृष्ठावर कलावंताने जलरंगाने काही चितारलेले दिसते. हे चित्रकाम अगदी सहज केलेले आहे की, आतमध्ये असलेल्या मजकुराशी त्याचे काही देणेघेणे असावे?  जी. कुंगची छायाचित्रे वरती जाणाऱ्या जिन्याशेजारी पाहायला मिळतात. या सर्व छायाचित्रांमधील खोली (डेप्थ) जाणवावी अशी असते. जिने किंवा पायऱ्या म्हणजे स्थानांतरण. मग ही छायाचित्रे त्याच्याशेजारीच असण्याला काही वेगळा अर्थ आहे का? कलावंताला इथली खोली जाणवून द्यायचीय की, स्थानांतरण की, दोन्ही?  आता आपण समोर दिसणाऱ्या वस्तू आणि आपल्या डोक्यात येणारे विचार याची एक वेगळी संगती लागते आहे का याचा विचार अजाणतेपणे करू लागतो. सारा रोझची कलाकृती म्हणजे काय तर तिथेच असलेल्या एका बेसिनच्या बाजूस ठेवलेले तांब्यामधून साकारलेले लिंबू. आता हे काय नवीन? तिने आणखी काही अशाच वस्तू बाजूला ठेवलेल्या दिसतात. महत्त्वाचे म्हणजे खिडकीतून येणाऱ्या बाहेरच्या प्रकाशानुसार आतमध्ये असलेला प्रकाश स्वयंचलीत पद्धतीने कमी-अधिक होत असतो. ती जागा म्हणजेच खोली, तिचा आकार, प्रकाश आणि आतमध्ये असलेल्या वस्तू यांचे काही वेगळे नाते असावे का? असा विचार मनात आल्यानंतर आपण पुन्हा एकदा संपूर्ण प्रदर्शन त्यातील सर्व दालनांसह नव्याने पाहातो आणि मग लक्षात येते की, यातील प्रत्येक कलाकृतीचे त्या वास्तूशी घनिष्ट नाते आहे, ते पाहायचेच राहून गेले होते. आपण मगाशी केवळ वस्तू पाहात होतो. अखेरीस झालेला महत्त्वाचा उलगडा म्हणजे ती दुमजली इमारत हादेखील या प्रदर्शनाचाच एक महत्त्वाचा भाग होता! केवळ आत होते ते म्हणजे वस्तू किंवा कलाकृती म्हणजेच प्रदर्शन नव्हते तर इमारतीसह सर्व वस्तू म्हणजेच एक मोठे प्रदर्शन होते!
विनायक परब –  @vinayakparab
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2016 1:35 am

Web Title: dunja herzog
Next Stories
1 वास्तवाचा आभास!
2 उणिवांमधील सौंदर्य!
3 स्वातंत्र्य अन् संवादाचे ओझे(?)!
Just Now!
X