पी. चिदम्बरम

करोना साथीत अनेकांनी आप्तेष्ट गमावले, तर आणखी अनेकांनी रोजगार गमावले. सामान्य माणसावर झालेला परिणाम ‘आधीच करोना साथ, त्यात आर्थिक हलाखी’ असा होता. देशाच्या अर्थकारणाबाबत मात्र, ‘आधीपासूनचीच आर्थिक घसरण, त्यात करोना साथ’ असा प्रकार घडत असून त्याचे दुष्परिणाम चालू आर्थिक वर्षांतही दिसतील आणि ते गंभीर असतील, याचीच चिंता आहे..

‘कोविड १९’चा अनुभव हा संसर्ग झालेल्या व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांसाठी भयावह होता यात शंका नाही. लक्षणे असोत, नसोत, कमी लक्षणे असोत, तुम्ही विलगीकरणात असाल किंवा कोविड केंद्रात असाल, रुग्णालयात तुम्हाला प्राणवायू लावला गेला असेल, कदाचित अतिदक्षता विभागातही दाखल केले गेले असेल या सर्वाना जीवनात मृत्यूच्या भीतीचा अनुभव आला असेल. एकूण मृत्युदर हा दोन टक्क्यांवर गेला होता, संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीने हीच प्रार्थना केली की, मृत्यू पावणाऱ्यात आपला समावेश असू नये.

जगात साथीच्या रोगाच्या काळात जीवन जगणे हे ज्यांना संसर्ग झाला त्यांना जितके वाईट होते तितकेच ते संसर्ग न झालेल्यांनाही वाईट आहे. प्रत्येक दिवशी काही ना काही वाईट बातमी येत आहे. कुठल्या तरी कुटुंबातील सदस्य, कुणी परिचित, कुणी मित्र, ज्या व्यक्तीचे तुम्ही तोंड भरून कौतुक करीत होतात ती व्यक्ती यांच्या मृत्यूच्या बातम्या येत असताना प्रत्येकाच्या मनात एकच भीतीचा प्रश्न होता, आता माझी तर वेळ येणार नाही आणि केव्हा. हा अनुभव सर्वासाठीच वाईट होता. डॉक्टर्स, परिचारिका, निमवैद्यकीय कर्मचारी, रुग्णालयात काम करणारे कर्मचारी यांच्यासाठीही हा कटू अनुभवच होता. अनेक जण त्यांच्या कुटुंबीयांना दु:ख व अनिश्चिततेच्या खाईत लोटून हे जग सोडून गेले.

कोविड १९चा हा अनुभव पंतप्रधान, गृहमंत्री, इतर मंत्री, नोकरशहा यांनाही वाईटच होता. ते त्यांनाही माहिती आहे व तुम्हालाही माहिती आहे; त्यामुळे त्यावर मी येथे फार काही लिहिणार नाही.

परंतु करोनाची दुसरी लाट हे आपण आपल्या आयुष्यात सामना केलेले सर्वात मोठे संकट होते, असा कुणाचा समज झाला असेल तर ते खरे नाही कारण अजून बरीच संकटे आहेत.

खचितच वाईट स्थिती

आतापर्यंत जो अनुभव आपण घेतला आहे त्यावरून आपल्यासाठी एक गोष्ट अनिश्चित नाही ती म्हणजे. आर्थिक परिस्थिती. देशातील लोकांची आर्थिक अवस्था मेटाकुटीस आलेली आहे. ती असणे अपेक्षित होते त्यापेक्षा वाईट झाली आहे. यातून असमानता वाढेल व जास्तीत जास्त लोक गरिबीत लोटले जातील. अनेक जण कर्जाच्या सापळ्यात सापडतील. त्यांचे दु:ख अपरिमित असेल.

राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेची सकल राष्ट्रीय उत्पन्नाची गेल्या तीन वर्षांतील किमती स्थिर धरून आकडेवारी पाहिली तर ती पुढीलप्रमाणे आहे :

२०१८-१९       :  १,४०,०३,३१६ कोटी रु.

२०१९-२०२० :  १,४५,६९,२६८ कोटी रु.

२०२०-२०२१ : १,३४,०८,८८२ कोटी रु.

राष्ट्रीय सांख्यिकी संघटनेच्या २०१९-२०च्या माहितीनुसार सकल राष्ट्रीय उत्पन्न साथ-वर्षांच्या आधीच्या वर्षीच्या तुलनेत अवघे ४ टक्के वाढले पण २०२०-२१ या पहिल्या करोना वर्षांमध्ये ते ८ टक्क्यांनी कमी झाले. आता (आर्थिक वर्ष २०२१- २२ मध्ये) आपण करोनाच्या दुसऱ्या वर्षांतून मार्गक्रमण करीत आहोत आणि नवीन दैनंदिन संसर्ग ४ लाख १४ हजार २८० तर दैनंदिन मृत्यू ४५२९ अशी आकडेवारी आपण पाहिली आहे. उपचाराधीन रुग्णांची संख्या २४ लाख २३ हजार ८२९ होती. २०२१-२२चा विचार केला तर, सकल राष्ट्रीय उत्पन्न कमी होणार की सपाट होणार, याची चिंता वाढते.

याला अपवाद म्हणजे फक्त सरकारने प्रसृत केलेल्या अंदाजांचा. याही परिस्थितीत काही जण सकारात्मक वाढीचा अंदाज करीत आहेत. अनेक अर्थशास्त्रज्ञ याबाबत साशंक आहेत. म्हणजेच आपण २०२१-२२ या वर्षांत शून्य वाढ गृहीत धरणे चांगले; तरी फलश्रुती त्यापेक्षा चांगली असावी अशी अपेक्षा करू या.

उत्पन्नात घट

एकूण राष्ट्रीय उत्पन्नाचा संख्यात्मक अंदाज बांधला तर आर्थिक परिस्थितीवर अधिक प्रकाश पडू शकतो. आर्थिक वर्ष २०१९-२०२० मध्ये आपण २.८ लाख कोटींचे उत्पन्न गमावले. करोनाच्या २०२०-२०२१ या पहिल्या करोना वर्षांत ते ११ लाख कोटींनी गमावले. शून्य वाढ गृहीत धरली व किमती स्थिर मानल्या तरी २०२१-२२ मध्ये ते १३४ लाख कोटी राहणार आहे. भारत ही वाढती अर्थव्यवस्था असायला पाहिजे हे गृहीत धरले व ५ टक्के माफक वाढ गृहीत धरली तर, मात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नात ६.७ लाख कोटींची खोट दिसून येईल. त्यामुळे तीन वर्षांत आपल्याला एकूण २० लाख कोटी रुपयांचा फटका बसला, हे कबूल करावे लागेल.

गेल्या तीन वर्षांत उत्पन्नातील घट याचा अर्थ अनेकांचे रोजगार गेले. अनेकांनी उत्पन्न गमावले, दैनंदिन रोजगार गमावला. अनेकांनी घर गमावले, अनेकांची गुंतवणूक तोटय़ात गेली. अनेकांचे शिक्षण खुंटले, आरोग्यसेवेचे तर विचारायलाच नको.

असे अनेक फटके या साथीने दिले आहेत. सीएमआयईने (सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी) म्हटले आहे की, २६ मे २०२१ रोजी बेरोजगारीचा दर ११.१७ टक्के होता. त्यात शहरी बेरोजगारीचा दर १३.५२ टक्के तर ग्रामीण बेरोजगारीचा दर १०.१२ टक्के होता. आपण २०२०-२१ मध्ये पगारदारांचा विचार करता एक कोटी नोकऱ्या गमावल्या आहेत.

दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात करोनाचा प्रसार जास्त झाला. त्यामुळे लहान शहरे व खेडी यांना फटका बसला. माहितीतून असेही दिसून येते की, शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतर झाले आहे. कृषी क्षेत्रात ९० लाख रोजगार वाढले असले तरी ते कायम किंवा नियमित रोजगार नाहीत. शेतीवर आधीच मनुष्यबळाचा ताण अधिक आहे. जास्त लोक शेतीवर विसंबून आहेत. एकीकडे ही बेरोजगारी वाढत असताना कर्मचारी सहभाग दर हाही कमी होत गेला हे सीएमआयइंच्या अहवालावरून दिसत आहे.

गरिबीत वाढ

ज्यांचे रोजगार गेले त्यांनी उत्पन्न व पैसा गमावला. रिझव्‍‌र्ह बँकेच्या मे २०२१च्या वार्तापत्रानुसार ‘मागणीत झालेली घट’ हा मोठा धक्का होता. लोकांनी खर्चात हात आखडता घेतला. जी काही पुंजी आहे ते राखून ठेवू लागले. बाजारातल्या प्रत्येक रस्त्यावर कमी-अधिक प्रमाणात हेच चित्र होते. सीएमआयइंचे व्यवस्थापकीय संचालक महेश व्यास यांनी म्हटले आहे की,  ९० टक्के कुटुंबांमध्ये गेल्या १३ महिन्यांत उत्पन्न कमी झाले.

अझीम प्रेमजी विद्यापीठाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचा विचार या संदर्भात करू. त्यांच्या मते अनेक कुटुंबांवर उधार उसनवारीची वेळ आली, काहींना मालमत्ता विकाव्या लागल्या. अन्नामध्ये कपात करावी लागली. गरीब कुटुंबांना त्यांच्या उत्पन्नाच्या तुलनेत अधिक कर्जे काढावी लागली. अझीम प्रेमजी विद्यापीठाच्या या अहवालानुसार मे २०२१ मध्ये २३ कोटी लोक दारिद्रय़रेषेखाली लोटले गेले. याचा अर्थ त्यांना दिवसाला ३७५ रुपयेही मिळत नव्हते. २००५-२०१५ या काळात परिस्थिती वेगळी होती  त्या वेळी २७ कोटी लोक दारिद्रय़ाच्या खाईतून बाहेर आले होते असे जागतिक बँकेची माहिती आपल्याला सांगते.

करोनाच्या दोन वर्षांचा विचार केला तर आपल्याला ठोस अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक असलेले सर्व घटक नकारात्मक दिसतात. आर्थिक परिस्थितीचा लोकांच्या रोजीरोटीवर वाईट परिणाम झाला. आधीच करोना साथ व त्यात आर्थिक हलाखीची स्थिती असा संकटांचा दुहेरी डोंगर एकदम अंगावर कोसळला. मी ही परिस्थिती वर्णन केली आहे ती गंभीर आहेच, पण २०२१-२२ या आर्थिक वर्षांत याच सगळ्या घटनाक्रमात आणखी आर्थिक संकटे आपल्यासाठी वाढून ठेवलेली असतील असे मला वाटते. ती संकटे आतापेक्षा गंभीर असतील यात शंका नाही.

लेखक भारताचे माजी अर्थमंत्री आहेत.

संकेतस्थळ : pchidambaram.in

ट्विटर : @Pchidambaram_IN