श्रीगोंदवलेकर महाराज यांच्या बोधाच्या अनुषंगाने आपण एकूणच पैसा या विषयाचा मागोवा घेणार आहोत. परमार्थ आणि पैसा, साधकाच्या जीवनातलं पैशाचं स्थान, पैसा मिळविण्यासाठी धडपडावं की नाही, साधकानं गरिबीतच आनंद मानावा का, असे अनेक मुद्दे आपल्या मनात येतात. त्या सर्वाचाच मागोवा घ्यायचा आपण प्रयत्न करू. पैसाविषयक या चिंतनाची सुरुवातच आहे ती श्रीमहाराजांच्या वाक्यानं.. ‘‘पैसा मिळवणे हे हलक्या माणसाचे काम आहे. आपले खरे काम भगवंत मिळवणे हे आहे!’’ पैशाशिवाय काही चालत नाही पण पैशाइतकी वाईट वस्तू नाही, असंही श्रीमहाराज सांगतात. या दोन वाक्यांच्या अनुषंगाने आपण पैशाचा मागोवा आता घेऊ. पैशाचा आज जगण्यावर मोठाच प्रभाव आहे. पैशाची भाषा हीच खरी विश्वभाषा बनली आहे. श्रीगुरुदेवांचं एक भजनच आहे. त्यातली दोन कडवी पाहा.
भयो जग परधान एहिं कलयुग में पैसा।।
पैसा गुरू बाकी सब चेला। सारे जगत में पैसे का खेला।।
भयो बडम बलवान।। एहिं कलयुग में पैसा।।
या कलियुगात जगामध्ये प्रधान काय असेल, मुख्य काय असेल तर तो पैसा आहे! अहो पैसा हाच आज जगद्गुरू झाला आहे आणि बाकी सारेच त्याचे भक्त आहेत. जगात पैशाचाच खेळ आहे. पैसाच सर्वात बलवान झाला आहे.
ई पैसा सब नाच नचावै। साधू सन्तहूँ पाछे घुमावै।।
भयो आज भगवान।। एहिं कलयुग में पैसा।।
हा पैसाच सगळ्यांना नाचवतो आहे. आज साधुसंत म्हणून ज्यांचा लौकिक आहे तेदेखील या पैशामागे फरपटत आहेत. आज या जगात पैसा हाच भगवान झाला आहे!
तेव्हा पैशाच्या या व्यापक आणि सार्वत्रिक प्रभावातून कुणीही सुटलेलं नाही. अध्यात्माच्या मार्गावर वाटचाल करणाऱ्यांनाही पैसा मोहवितो आहे. या पाश्र्वभूमीवर महाराज सांगतात, ‘‘पैसा मिळवणे हे हलक्या माणसाचे काम आहे. आपले खरे काम भगवंत मिळवणे हे आहे!’’ आता या वाक्याचा खरा रोख काय, हे वाक्य कुणाला उद्देशून आहे, हे जाणणं महत्त्वाचं आहे. ज्यांना पैशाशिवाय दुसरा कोणताही विचार सुचत नाही, त्यांना हे वाक्य लागू नाही. त्यांना डोळ्यासमोर ठेवून श्रीमहाराज हे वाक्य बोलत नाहीत. जे भौतिकातील काहीतरी प्राप्त व्हावे म्हणून देवाचं काहीबाही करीत आहेत, त्यांनाही उद्देशून हे वाक्य नाही. मग हे वाक्य कुणासाठी आहे? या वाक्यातच ते स्पष्ट नमूद आहे. हे वाक्य आपल्या माणसाला उद्देशून आहे! श्रीमहाराज जेव्हा आपले काम  म्हणतात तेव्हा हे वाक्य ते ज्यांना आपलं मानतात किंवा जो त्यांना आपलं मानतो असं म्हणतो, त्याला उद्देशून आहे. श्रीसद्गुरू कोणाला आपलं मानतात? जो शुद्ध आध्यात्मिक लाभासाठी प्रयत्न करतो किंवा करू इच्छितो, त्यालाच सद्गुरू आपलं मानतात. ज्याला ते आपला मानतात त्याचे परम आत्मकल्याण हाच त्यांचा एकमात्र संकल्प असतो!