News Flash

९९. धर्म-अधर्म

स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म हा व्यवहारात आलाच पाहिजे, धर्माची प्रत्येक आज्ञा आचरणात उतरलीच पाहिजे, असं नमूद केलं.

| May 21, 2014 01:01 am

स्वामी स्वरूपानंद यांनी आपल्या वडिलांना लिहिलेल्या पत्रात धर्म हा व्यवहारात आलाच पाहिजे, धर्माची प्रत्येक आज्ञा आचरणात उतरलीच पाहिजे, असं नमूद केलं. पण जो व्यवहारात आणायचा तो खरा धर्म कोणता? हाच प्रश्न मांडताना स्वामीजी लिहितात, ‘‘धर्म व्यवहारात आणायचा तर खरा धर्म कोणता, हे मनुष्यानं शोधलं पाहिजे. ज्यानं समाजाचं धारण-पोषण होतं तो धर्म, अशी धर्माची कसोटी ठेवली तर आज आमचा धर्म नष्ट झाला आहे असेच आपल्या प्रत्ययाला येईल. आमचं वैभव गेलं, संपत्ती गेली, कीर्ति नष्ट झाली, लौकिक धुळीला मिळाला आणि आम्ही परक्यांचे गुलाम होऊन राहिलो. संतोष, समाधान, आनंद, शौर्य, धैर्य, दानत, परोपकारवृत्ती, औदार्य, दया, प्रेम, सत्यनिष्ठा सर्व काही आम्ही गमावून बसलो आणि शरीराने दुर्बल आणि दरिद्री बनून मनाने भ्याड, कमकुवत आणि नादान झालो. आम्ही माणुसकी तरी कुठे ठेवली आहे? मनुष्यत्वाचा अभिमान बाळगण्याजोगे आम्ही काय मिळविले आहे? आहार, निद्रा, भय, मैथुनादि विकार पशूंप्रमाणेच आम्हालाही आहेत. मनुष्यत्वाचा विशेष जो धर्म तो तर कुठे दृष्टीलाच पडत नाही. मग आपण संध्या करतो, वैश्वदेव करतो, अभिषेक करतो, सत्यनारायण पूजतो, एकादशी-उपासतापास करतो, नेमधर्म, व्रतवैकल्ये करतो, तुळशीचा पूजा, पिंपळाची पूजा, जन्माष्टमी, रामनवमी, दासनवमी, हनुमानजयंती, दत्तजयंती, गणेशचतुर्थी करतो. स्तोत्र-पारायणं करतो. हा आमचा धार्मिक आचार नव्हे की काय? या सर्व गोष्टी आपण करतो मग धर्म नाहीसा झाला, असे कसे म्हणता येईल? अशी शंका कोणीही साहजिकच विचारील, पण त्याला स्पष्ट सांगायची वेळ आली आहे की, हा धर्म नव्हे. हे तर धर्माचे कलेवर आहे. आतील आत्मा केव्हाच निघून गेला आहे. प्राण नाहीसा झाला आहे. हात आहेत, पाय आहेत, नाक, तोंड, डोळे सर्व काही आहे मग तुम्ही मृत शरीराला जिवंत का म्हणत नाही, असा प्रश्न करण्यासारखेच हे हास्यास्पद आहे. धर्माचे शरीर म्हणजेच आपले हे बाह्य़ धार्मिक आचार. पण आज त्यांची किंमत मृत देहाइतकी. त्यात प्राणशक्ती, चैतन्यशक्ती ओतली पाहिजे. ती ओतताना कदाचित हे शरीर म्हणजे ही बाह्य़ांगे, हे धार्मिक आचार व धार्मिक रूढी व धार्मिक क्रिया हे सर्व बदलावेही लागेल व ते बदलावे लागेल म्हणून काही मोठीशी भीती बाळगण्याचे कारण नाही. कारण त्यामुळे धर्म जिवंत होणार आहे. आपण अग्नीत अन्नाची आहुती देऊन विश्वात्म्याला शांत करीत असतो, पण आपल्या सभोवार सहस्रावधी माणसे अन्नावाचून उपाशी तडफडत असताना आपणास प्राप्त झालेल्या अन्नातील अंशभाग त्यांना समर्पण करून अवशिष्ट भाग आपण भक्षण करणे, हाच खरा वैश्वदेव आणि हाच खरा यज्ञ आहे.. व्रत म्हणून सत्यनारायण करायचा आणि व्यवहारात पावलोपावली असत्याची बाजू उचलायची. सत्याची आराधना आणि असत्याचा अवलंब! किती परस्परविरोध हा! धर्म आणि व्यवहार असा विरोधी असतो काय? व्यवहारात आपण एकदा तरी सत्य बोललो तरी ती सत्यनारायणाची पूजाच आहे!’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 21, 2014 1:01 am

Web Title: 99 religion no religion
टॅग : Religion
Next Stories
1 मान्सूनसाठी उकाडय़ाच्या पायघडय़ा..
2 चोरांच्या बोंबा..
3 गॉर्डन विलिस
Just Now!
X