प्रेम नाही म्हणून नेम नाही आणि नेम नाही म्हणून प्रेम नाही, अशी आपली स्थिती आहे. त्यावर एकच उपाय तो म्हणजे अट्टहासाने नाम घ्यायचे. मनाचा एक गुण आहे तो असा की प्रथम बळजबरीनं त्या मनाला एखाद्या गोष्टीकडे वळवलं आणि आता यावाचून उपाय नाही, हे एकदा त्याला जाणवलं की मग त्या गोष्टीत गोडी शोधायचा मन आपोआप प्रयत्न सुरू करतं. तेव्हा प्रथम टप्प्यावर जपाला बसल्यावर पहिल्या काही माळा या मनाला बळजबरी करण्यात आणि नामाकडे वळवत राहाण्यात जातात. पण त्यानंतर मन तिकडे वळू लागलं आणि त्याला विशिष्ट संख्येची ओढ लागली की जप वेगानं सुरू होतो. प्रथम अभ्यासाप्रमाणे नेटानं, प्रयत्नपूर्वक, कसाबसा होणारा जप पुढे आपोआप मनात उमटू लागतो. एका जागी बसून माळेवर जास्तीत जास्त जप करण्यामागेही हेतू असतो. एखाद्या भांडय़ावर तुम्ही आंतून आघात केलात की नंतर काहीवेळ त्याचा प्रतिध्वनी आतून घुमत राहातो. त्याचप्रमाणे एकाच जागी बसून जास्तीत जास्त जप केला की नंतर जगाच्या व्यवहारात असतानाही त्या जपाचा अंतध्र्वनी उमटत राहातो. मानसिक जप आपोआप वाढत जातो. एकदा का मानसिक जप वाढत गेला की प्रेम लागलेच. महाराजांनीच एके ठिकाणी म्हटलं आहे की नाम घ्यायला लागलं की जगाची आठवण सहज येते अगदी त्याचप्रमाणे जगाच्या व्यापात असताना नामाची आठवण येऊ लागली की नामाचं प्रेम यायला लागलं आहे हे समजावं. मग व्यवहार करताना त्यावर आपोआप आपल्या व्यवहाराकडेही त्रयस्थपणे पाहायला सुरुवात होते. आपल्या उक्ती आणि कृतीतील विसंगतीही जाणवू लागते. ही विसंगती दूर व्हावी, अशी प्रामाणिक इच्छाही मनात उमटू लागते. आपण स्वतला श्रीमहाराजांचे म्हणवतो पण तसं वागतो का, असा प्रश्न हळूहळू पडू लागतो. हा नामाचाच परिणाम असतो. ३ फेब्रुवारीच्या प्रवचनात श्रीमहाराज म्हणतात: एक साधक मला म्हणाला की, ‘‘अलीकडे मला फार राग येऊ लागला आहे.’’ वास्तविक तो राग आताच येऊ लागला असे नसून पूर्वीपासूनच त्याच्याजवळ होता. परंतु साधन करू लागल्यापासून त्याला त्याची जाणीव होऊ लागली आहे, किंवा क्रोध वाईट आहे हे आता त्याला कळू लागले आहे, इतकेच! म्हणजेच साधन करण्यापूर्वी रागीट माणसाला रागीटपणाची खंतही नसे. तो अवगुण आहे, असा विचारही मनाला शिवत नसे. जसजसं नाम वाढू लागलं तसतसे आपल्यातलेच अवगुण उग्रपणे जाणवू लागले. श्रीमहाराजांचं एक वाक्य आहे, ‘‘जो परमार्थ करायला तयार असेल त्यास अनुभव तयार असतो.’’ (बोधवचने, १६८) आपल्याला वाटेल की हा आत्मसाक्षात्कारासारखा दिव्य अनुभवच असेल. पण तो तर फार पुढचा अनुभव. परमार्थाच्या पहिल्या पायरीपासून अनुभवही सज्ज असतो. हा अनुभव आहे आपल्यातील अवगुणांचा, त्रुटीचा. ज्या मार्गावरून आपण चालू इच्छितो त्या वाटचालीच्या आड आपल्याच स्वभावातल्या कोणत्या गोष्टी आड येतात, याचाही तो अनुभव असतो.