श्रीगोंदवलेकर महाराज सांगतात,‘‘भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल, आणि त्यापासून नुकसान होण्याची भीती नाही. पण हे वाटते तितके सोपे नाही; कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी की, थोडेसे काही आपल्या हातून घडले की, ‘ते मी केले, मी असा चांगला आहे’, अशा तऱ्हेचे विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो.’’ तेव्हा परोपकार या शब्दांतच उपकार आहे आणि उपकाराच्या भावनेने उपकार करणाऱ्याच्या मनाला अहंकार फार लवकर शिवतो. ‘मी होतो म्हणून ते झालं’, असं माणूस कित्येक वर्षांनंतरही हिरिरीने सांगतो. खरा परोपकार किती विशाल असतो? चालताना पडून पाय दुखावला तर हातानं तो चेपल्यावर बरं वाटतं. पण हा काय हाताचा पायावर परोपकार झाला का? जिथे पर काही नाहीच स्वतच आहे तिथे परोपकार कोणता? या भावनेनं आपलेपणानं जी मदत केली जाते त्यात परोपकाराचा भावच असू शकत नाही. इतका व्यापक आणि शुद्ध भाव आपला असत नाही. मग निदान भावना काय असली पाहिजे? श्रीमहाराज सांगतात, ‘‘ज्या ज्या वेळी दुसऱ्याकरिता काही करण्याची संधी मिळेल, त्या त्या वेळी तिचा फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी की, ‘देवा तुझ्या सेवेचा लाभ मला दिलास ही माझ्यावर कृपा झाली. अशीच कृपा करून आणखी सेवा करून घे.’ ही विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही. म्हणून अत्यंत जपून वागणे जरूर आहे. परोपकार याचा सरळ अर्थ पर-उपकार; म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार. यावरून असे लक्षात येईल की, परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते. एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा. जगातल्या सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतवरून असे दिसते की, मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती आणि वस्तुमात्रागणिक सर्व जग निराळे. मनाच्या या ठेवणीमुळेच, जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधीकाळी एखादे काम होण्याचा योग आला तर ‘मी दुसऱ्याचे काम केले’ ही जाणीव होऊन अहंकार झपाटय़ाने वाढू लागतो. म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्वच संतांनी दिली आहे.’’ (प्रवचने, २७ मे) या प्रवचनाचं शीर्षकच आहे ‘निरभिमानी परोपकार ही भगवंताची सेवाच’ आणि या प्रवचनाच्या तळाशी बोधटीप आहे की, ‘जगात परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोकसुद्धा मानाबिनात कोठेतरी अडकल्यावाचून राहणार नाहीत.’ तेव्हा परोपकार हा अभिमानयुक्त असेल, अहंकार पोसणारा असेल तर तो भगवंताची सेवा होत नाही. तो फसव्या सापळ्यासारखा मला अडकवतो. मोठमोठी लाकडं पोखरणारा भुंगा जसा कमळाच्या पाकळ्या चिरून बाहेर पडत नाही, तसे परोपकाराला भगवंताचं अधिष्ठान नसलेले मोठय़ा ताकदीचे लोकही त्या उपकाराच्या बदल्यात मान मिळावा, या ओढीत अडकून क्षुद्र वृत्तीचे होत जातात. आणि वृत्तीचा घात हा तर परमार्थाचाच घात आहे!